भाकरी परतताना तवा परतला!

संपादकीय

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या आपल्या आत्मचरित्रात्मक पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या वेळी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा करून भूकंप घडवला. त्यामुळे पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते हादरून गेले. पवारांनी दिलेल्या धक्क्यातून कसे सावरायचे हे कळेनासे झाल्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित असलेले अनेकजण ओक्साबोक्सी रडू लागले. पवारसाहेब, राजीनामा मागे घ्या, अशी आर्जवे करू लागले. अगदी ज्येष्ठ नेत्यांनाही अश्रू अनावर झाले. पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण कार्यकर्ते शरद पवारसाहेबांनी राजीनामा मागे घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, अन्न-पाणी घेणार नाही, अशी भूमिका घेतली. पवारांचा राजीनाम्याचा निर्णय आणि त्यांच्या पक्षातील नेते, कार्यकर्त्यांच्या उमटलेल्या तीव्र प्रतिक्रिया यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

शरद पवार यांनी आता आपल्या वयाची ऐंशी वर्षे पार केली आहेत. त्यामुळे वयोमानानुसार माणूस थकत जातो, त्यामुळे त्याला नेहमीची दगदग झेपेनाशी होते. त्यामुळे या पूर्वीही काही राजकीय नेत्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतलेली आहे, पण शरद पवार आणि दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तुलना अशा राजकीय निवृत्ती घेणार्‍या नेत्यांसोबत होऊ शकत नाही. कारण त्या दोन्ही नेत्यांनी आपल्या पक्षांची स्थापना केली होती. त्यांच्या करिश्म्यावर त्यांचे पक्ष वाढले, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षांना राजकीय मजल मारता आली. शरद पवार यांनी जशी आज पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती जाहीर करून पक्षातील लोकांना धक्का दिला, तसाच धक्का शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर राज्यभरातून शिवसैनिकांचे जथ्थे मातोश्रीवर आले. त्यांना अश्रू अनावर झाले होते.

साहेब, राजीनामा मागे घ्या, नाही तर आम्ही इथून हटणार नाही, असे साकडे घातले. जी परिस्थिती आज पवारांच्या राजीनाम्यानंतर दिसत आहे, तशीच त्यावेळी दिसत होती. शिवसेनाप्रमुखांनी राजीनामा देण्याचे धक्कातंत्र दोनदा वापरले होते. पण त्यांनी दोन्ही वेळा आपला राजीनामा मागे घेतला. आपण शिवसैनिकांच्या आग्रहाखातर आणि प्रेमाखातर राजीनामा मागे घेतला, असे त्यांनी नंतर सांगितले असले तरी बाळासाहेब नसतील, तर शिवसेना नाही, अशी शिवसेनेची स्थिती होती. आज बाळासाहेबांच्या पश्चात शिवसेनेची काय अवस्था झालेली आहे, हे सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. त्यांचे उत्तराधिकारी असलेले त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांच्याकडे आज पक्ष आणि चिन्ह दोन्हीही उरलेले नाही.

शरद पवारांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर नेते आणि पदाधिकार्‍यांचा जो आक्रोश उठलेला आहे, त्यामागे शिवसेनेची जी आज अवस्था झाली आहे, तशी आपल्या पक्षाची होणार नाही ना, अशी भावना असू शकते. राजकीय पक्ष हे लोकांच्या हितासाठी काम करत असले तरी अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांचे भवितव्य हे मुख्य नेत्याच्या निर्णयाशी निगडित असते. अनेकांच्या भावनेसोबतच आर्थिक व्यवहार या निर्णयाशी जोडलेले असतात. पवारांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या पक्षातील अनेक अल्पसंख्याक कार्यकर्त्यांनी यापुढे आम्ही कुणाकडे जायचे असा टाहो फोडला. त्यातून त्यांच्या मनातील भीती व्यक्त होताना दिसत होती. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन अजित पवार आणि सुप्रिया सुळे या पवारांच्या कुटुंब सदस्यांनी कार्यकर्त्यांना धीर देऊन पवारांनी घेतलेल्या निर्णयाविषयी माहिती दिली.

पक्षाचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी स्वत: शरद पवारांनी एक समिती नेमली आहे. ती समिती निर्णय घेईल. सध्या पवारांनी आपला राजीनामा मागे घ्यावा, ही सगळ्याच नेते आणि कार्यकर्त्यांची मागणी असल्यामुळे या समितीतले नेते पक्षातील दुसर्‍या कुणाचे नाव पक्षाच्या अध्यक्षपदासाठी जाहीर करतील, याची शक्यता अगदीच धूसर आहे. त्यामुळे याच समितीच्या निर्णयानुसार शरद पवार यांच्याकडेच पुन्हा अध्यक्षपद देऊन ते पुन्हा नव्या दमाने कामाला लागतील, असेच वाटते. शरद पवार यांनी आपल्या ६० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत असे अनेक धक्के त्यांच्या पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांनाच नव्हे तर जनतेलाही दिले आहेत. त्यामुळे पवार आणि धक्कातंत्र हे काही नवीन नाही, हे सर्वसामान्य जनतेलाही माहीत आहे.

शरद पवारांचे वय झाले, त्यामुळे त्यांचा प्रभाव ओसरलेला आहे, असा प्रचार देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ ची राज्यातील विधानसभेची निवडणूक लढवताना केला, इतकेच नव्हे तर त्यावेळी राष्ट्रवादीतील अनेक नेते पक्ष सोडून गेले होेते, तरी पवारांनी राज्यभर जिद्दीने प्रचार केला आणि पुढे फडणवीसांवर बाजू पलटवली. त्यामुळे पवारांचे वय झाले आहे, त्यामुळे ते राजकारणातून निवृत्त होतील, असे मानण्याला जागा नाही. अलीकडे काही दिवसांमध्ये अजित पवार हे भाजपमध्ये जाणार अशा चर्चांनी जोर धरला होता. भाजपचे नेतेही त्यांच्या स्वागताच्या तयारीसाठी पायघड्या घालून तयार होते. त्यावेळी शरद पवार हे शांत होते, जेव्हा पवार शांत असतात तेव्हा ती वादळापूर्वीची शांतता असते, असे त्यांनी बरेचदा दाखवून दिले आहे. पवारांच्या खास विश्वासातील असलेले संजय राऊत यांनी भाकरी परतताना तवा परतला, असे म्हटले आहे. पण तो काही वेळासाठीच असेल. कारण आता शरद पवारांनी आपल्या निर्णयावर विचार करण्यासाठी दोन तीन दिवस द्या, असे कार्यकर्त्यांना सांगितले आहे.