घरमुंबईसुट्टीच्या काळात बेकायदा बांधकामे तेजीत

सुट्टीच्या काळात बेकायदा बांधकामे तेजीत

Subscribe

विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच सुुरु झालेल्या दिवाळी सुट्टीचा फायदा उचलत मीरा भाईंदर शहरात सरकारी जागांवर मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे उभी राहिल्याचे उजेडात आले आहे. विशेष म्हणजे महापालिका अधिकारी, अतिक्रमण विभाग आणि महसूल खात्याकडून जाणिवपूर्वक दुर्लक्ष झाल्याने यात संशय व्यक्त केला जात आहे.

निवडणुका आणि सुटट्या असल्या की बेकायदा बांधकामे राजरोसपणे केली जातात ही बाब आता तशी नवी नाही. यामागे सरकारी यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींचा असलेला आशिर्वादही लपून राहिलेला नाही. त्यात यावेळी तर विधानसभा निवडणुकीचे दीड दोन महिने निवडणुक कामात व्यस्तता आणि दिवाळीची सुट्टी याचे निमित्त महापालिका आणि महसूल प्रशासनाला मिळाले. यातील अनेकांचे भूमाफियांशी थेट संबंध असल्याने मग बेकायदा बांधकांना तेजी आली. त्याचबरोबर अनेक इमारतींमधील वाढीव बेकायदा बांधकामेही केली गेली.

- Advertisement -

मीरा भाईंदर महापालिकेच्या प्रभाग समिती क्र. 1 भाईंदर – मुर्धा ते उत्तन ; प्रभाग समिती क्र. 2 जय अंबे नगर ते बजरंग नगर, गणेश देवल नगर, शास्त्री – नेहरु नगर ; प्रभाग समिती क्र. 3 भाईंदर पुर्व परिसर, प्रभाग समिती क्र. 4 भाईंदर पुर्व ते घोडबंदर आणि प्रभाग समिती क्र. 6 पेणकरपाडा ते काजुपाडा आदी परिसरात मोठया प्रमाणात बेकायदा बांधकामांचे पेव फुटले आहे. यामधील प्रभाग समिती क्र. 6 व 1 बेकायदा बांधकामांसाठी प्रसिद्ध आहे. या दोन्ही ठिकाणी लाच घेताना रंगेहाथ पकडले गेलेल्या चंद्रखांत बोरसे व सुनिल यादव या अधिकार्‍यांनाच आयुक्त बालाजी खतगांवकर यांनी प्रभाग अधिकारी म्हणुन नेमल्याने याचे लागेबांधे चर्चेचा विषय ठरला आहे. खाजगी आणि सरकारी जमिंनींसह कांदळवन, सीआरङोड, नाविकास क्षेत्र आदी ठिकाणी सर्रास भराव करुन बेकायदा बांधकामे केली जात आहेत.

विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकी वेळीही मोठया प्रमाणात झालेली बेकायदा बांधकामे महापालिकेने तोडली नसून प्रसिध्दी माध्यमांनी टिकेची झोड उठवल्यानंतर जी नाममात्र कारवाई केली त्यातील बहुतांश बांधकामे परत झालेली आहेत असा आरोप नागरीकांनी केला आहे. या प्रकरणात प्रभाग अधिकार्‍यांसह बेकायदा बांधकामांना जबाबदार असणार्‍यांना आयुक्त आणि वरिष्ठ अधिकारीच सातत्याने संरक्षण देत आल्याने मोठया प्रमाणात चालणार्‍या भ्रष्टाचाराची पाळेंमुळें अनेक बडया अधिकारी, नेते व लोकप्रतिनिधींपर्यंत पोहचल्याचा आरोप करण्यात येत आहे.

- Advertisement -

यंदाच्या निवडणुक कामात महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी पुर्णपणे व्यस्त होते. पण या काळात शहरात जी बेकायदा बांधकामे झाली आहेत ती तोडली जातील. यात जर अधिकारी – कर्मचार्‍यांनी कसुर केली असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
—डॉ. सुनील लहाने, अतिरिक्त आयुक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -