घरमुंबईडोंबिवलीत नागरी वस्तीत बेकायदा धाबा

डोंबिवलीत नागरी वस्तीत बेकायदा धाबा

Subscribe

धाब्यांमुळे कुत्र्यांचा त्रास

पश्चिमेतील महाराष्ट्रनगरमधील भरवस्तीत अनधिकृतपणे धाबा सुरू करण्यात आला असून, हा धाबा मध्यरात्री अडीचपर्यंत सुरू असतो. तसेच धाब्यावर सर्रासपणे दारूच्या पार्ट्या होत असतात. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे. भरवस्तीत असणार्‍या हा अनधिकृत धाब्यावर त्वरित कारवाई करावी अन्यथा कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास पालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणा जबाबदार राहील, अशी तक्रार वजा सूचना शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक वामन म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त गोविंद बोडके आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे केली आहे.

पश्चिमेतील प्रभाग क्रमांक 51 महाराष्ट्रनगर परिसरातील म्हात्रे वाडी परिसरातील नागरी वस्तीत गेल्या दोन महिन्यांपासून अनधिकृतपणे धाबा सुरू करण्यात आला आहे. सायंकाळी सात वाजता धाबा सुरू होतो तो मध्यरात्री अडीचपर्यंत सुरू असतो. धाब्यावर दारू पिणारे यांच्यात आपसात भांडणेही होत असतात. तसेच वेस्टेज अन्न हे उघड्यावर टाकले जाते. त्यामुळे आजुबाजूला कुत्र्यांचा वावर वाढला आहे. कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडीने वावरत असतात. त्यामुळे याठिकाणाहून नागरिकांना चालणेही मुश्कील होते. या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेतल्याचे प्रकारही घडले आहेत.

- Advertisement -

नगरसेवकाला चावला कुत्रा
नगरसेवक म्हात्रे यांच्या पायाचा लचकाही तिथल्या कुत्र्याने ताडल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे त्यांनी रेबीजचे इंजेक्शन घेऊनही त्यांची जखम बरी झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, असे म्हात्रे यांचे म्हणणे आहे. या अनधिकृत धाब्याविषयी नागरिकांनी अनेकवेळा तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना त्रासदायक ठरणार्‍या नागरी वस्तीतील धाब्यावर व तिथल्या मोकाट कुत्र्यांंवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक म्हात्रे यांनी पालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -