घरमुंबईगुटखा तोंडात, बंदी खिशात

गुटखा तोंडात, बंदी खिशात

Subscribe

राज्य सरकारने गुटखा तसेच पानमसाल्यावर बंदी आणली असली तरी त्याची छुप्या पद्धतीने विक्री होत आहे. अन्न व औषध विभागाने (एफडीए) विविध ठिकाणी केलेल्या कारवाईवरून हे वारंवार दिसून आले आहे. केवळ पान टपरीवर नव्हे तर जनरल स्टोअर्स, शाळा व महाविद्यालयाच्या आसपासही गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचेही उघडकीस आले आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये गुटखा बंदी केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून येते.

भिवंडीत मुख्य केंद्र
महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमाभागात मोठ्या प्रमाणात गुटख्याची गोदामे असून हा गुटखा विक्रेत्यांपर्यंत पोहोचवणारी मोठी यंत्रणा कार्यरत आहे, अशी माहिती दुकानदांराकडूनच सांगितली जाते. भिवंडी शहरात गुटखा विक्रीचे मुख्य केंद्र असल्याचेही समजते. अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच भिवंडीतील चार दुकानांवर एफडीएने छापा टाकून सव्वा लाखांचा गुटखा जप्त केला होता. तसेच चार दुकानेही सील केली होती.

ठाण्यात एफडीएची कारवाई थंडावली
ठाणे आणि भिवंडीतील गुटखा विक्रीचे केंद्र अन्न आणि औषध प्रशासनाने उधळून लावल्याचे प्रकार घडल्यानंतर जिल्ह्यात बंदी असतानाही छुप्या पद्धतीने गुटखा विक्री होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी आहे, मात्र शाळेपासून काही अंतरावर असलेल्या पान टपरीवर आदेशाची पायमल्ली होत आहे. स्टेशन परिसरातील पान टपरीपेक्षाही जनरल स्टोअर्समध्ये छुप्या पध्दतीने गुटखा विकला जातो. दीड वर्षांपूर्वी ठाण्यात घोडबंदर परिसरातील शिवप्रसाद गणेश पान विक्रीच्या दुकानातून एफडीएने रजनीगंधा सुगंधी मसाला, गोवा गुटखा, राजा कोल्हापुरी गुटखा, आर.एम.डी. गुटखा आणि विमल गुटखा अशी गुटख्याची पाकिटे जप्त केली होती. घरामध्ये गुटख्याचा साठा करून ठेवायचा व पाचपट दराने रस्त्यावरील कारचालकांना पेपरमध्ये गुंडाळून विक्री करायचा. ठाण्यात एफडीएची कारवाई थंडावलेली दिसून येते. कल्याण-डोंबिवली व आजूबाजूच्या परिसरात यापेक्षाही वेगळे चित्र नाही. ग्रामीण परिसरात हे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यात गुटखा बंदीच्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येते.

- Advertisement -

माव्याचा पर्याय
गुटख्याला पर्याय म्हणून मावा खाल्ला जातो. माव्यातही तंबाखूचा वापर होत असल्याने तो तयार करणे आणि त्याची विक्री करणे बेकायदेशी आहे. याकडे दुर्लक्ष करून सर्रासपणे पान टपर्‍यांमध्ये मावा तयार करून विकला जातो. तरूणाईला माव्याचे व्यसन जडल्याने पान टपर्‍यांवर नेहमीच गर्दी दिसून येते.

सिग्नलवर छुपी विक्री
पान टपरी व दुकानांवर छुप्या पध्दतीने गुटखा विक्री केल्यानंतर ती चोरी पकडली जात असल्याने आता सिग्नलवरच उभे राहून वाहनचालकांना गुटखा विक्री केल्याचे प्रकारही दृष्टीस पडत आहेत. महामार्गावरील सिग्नलवर वाहन थांबवल्यानंतर त्यांना जादा किमतीत गुटखा विकला जातो. अल्पवयीन मुलांकडूनच ही विक्री केली जाते. मात्र यावर एफडीएकडून कारवाई केली जात नाही.

- Advertisement -

ओळखीच्याच व्यक्तींना मिळतो गुटखा
राज्यात गुटखाबंदी असतानाही मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री केली जाते. कारवाई होऊ नये म्हणून दुकानदारांकडून फक्त नेहमीच्याच ग्राहकांना गुटखा विक्री केली जाते. नवीन विक्रेत्यांना गुटखा विकताना बर्‍याच चौकशींच्या फेर्‍यांना सामना करावा लागत असल्याची माहिती यावेळी पुढे आली आहे. दरम्यान, गुटखा विक्री करताना नेहमीच्या तुलनेत जादा दर द्यावा लागतो, अशी माहितीही तपासणीत समोर आली आहे.

गुजरातहून येतो गुटखा
राज्यात गुटखा बंदी असली तरी इतर राज्यातून गुटखा आणला जात असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. यात प्रामुख्याने, गुजरात, राजस्थान आणि उत्तर प्रदेश येथून गुटखा आणला जात असून सर्वाधिक गुटखा हा गुजरातमधून आणला जातो.

प्रभादेवी धमनील नाका
मुंबईच्या अनेक भागात सर्रासपणे गुटखा विक्री होते. प्रभादेवी आणि दादर परिसरातसुद्धा अशाप्रकारे सर्रासपणे विक्री सुरू आहे. कित्येक जनरल स्टोअर्समध्येसुद्धा गुटखा सहजरित्या उपलब्ध होतो. मुंबईच्या अनेक विभागात ही विक्री सुरू असून अशा बेकायदेशीर विक्री करणार्‍या पानटपर्‍यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचे दिसून येते.

संत रोहिदास चौक एल्फिस्टन-
एल्फिन्स्टन स्थानकाकडे जाणार्‍या रस्त्यालगत असणार्‍या संत रोहिदास चौकात असलेल्या एका पानटपरीवर सर्रास गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विकले जातात. अनेक तंबाखूजन्य पदार्थांची विक्री येथील टपार्‍यांमधून होत असते. सुपारी, चॉकलेट, पान-मसाला अशा पदार्थांच्या नावाखाली अनेक गुटख्याचे पदार्थ इथे विकले जातात. अनेक कॉलेज परिसरालगत असलेल्या टपर्‍यांवरही गुटख्याची विक्री होत असल्याचे दिसून येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -