घरCORONA UPDATECoronaEffect: कलानगर परिसरात प्रवेशबंदी, पालिकेने रातोरात लावले पोस्टर्स

CoronaEffect: कलानगर परिसरात प्रवेशबंदी, पालिकेने रातोरात लावले पोस्टर्स

Subscribe

वांद्रे पूर्व, कलानगर येथील शासकीय विश्रामगृह परिसरात काल कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने हा संपूर्ण परिसर आता सील करण्यात आला आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच वांद्रे पूर्व, कलानगर येथील शासकीय विश्रामगृह परिसरात काल कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने हा संपूर्ण परिसर आता सील करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेनेच कलानगर परिसरात काल रात्री यासंबंधीचे पोस्टर्स लावून हा परिसर प्रवेशासाठी निषिद्ध करण्यात आल्याचे सांगितले. कलानगर हा मुंबईतील अत्यंत महत्त्वाचा आणि प्रमुख परिसरांपैकी एक असून याच भागात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री हे निवासस्थान आहे. त्यामुळे हा अतिसंवेदनशील परिसर म्हणूनही तो ओळखला जातो.

- Advertisement -

कलानगरमध्येच मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान

मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री या निवासस्थानापासून अगदी जवळ असणाऱ्या एका चहावाल्याला कोरोनाची लागण झाल्याचे काल निष्पन्न झाले. धक्कादायक बाब म्हणजे याच चहावाल्याकडे मुख्यमंत्र्यांचे अंगरक्षक आणि मातोश्रीवरील इतर कर्मचारी चहा पिण्यासाठी जात असत. त्यामुळे त्यांचीदेखील चाचणी केली जात आहे. दरम्यान, मातोश्री असलेला कलानगर भाग सील करण्यात आला आहे. तसेच मातोश्रीवरचे १७० सुरक्षारक्षक बदलणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या सगळ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

देशात कोरोनाची स्थिती गंभीर 

कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असून आता देशभरात ४,७५७ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. तर १३२ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे. सोमवारी ४७९ नवीन रुग्ण आढळून आले होते. तर राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८६८ वर पोहचली आहे. काल राज्यात ७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांपैकी ४ जण मुंबईतील, प्रत्येकी १ जण नवी मुंबई, ठाणे, वसई विरार येथील आहेत. तर कोरोमामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ५२ वर पोहचली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -