घरमुंबईरांजणोली पुलाचे नारळ फोडून उद्घाटन

रांजणोली पुलाचे नारळ फोडून उद्घाटन

Subscribe

संतप्त ग्रामस्थांकडून पूल खुला करण्याचा प्रयत्न

भिवंडी -कल्याण महामार्गावरील रांजणोली चौकातील पुलाचे उद्घाटन गेल्या महिनाभरापासून रखडले आहे. पुलाचे काम निवडणुकीपूर्वी पूर्ण झाले असूनही केवळ बड्या नेत्यांच्या हस्ते पुलाच्या उद्घाटनाचा घाट एमएमआरडीएने घातला असल्याने या उड्डाणपुलाचे उद्घाटन होऊ शकलेले नाही. भिवंडी पूर्व विधानसभेचे आमदार रईस शेख यांच्यासह ग्रामस्थांनी सुद्धा हा उड्डाणपूल तातडीने वाहतुकीसाठी सुरू करावा, अशी मागणी केली होती. मात्र, त्याकडे शासन व एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी गुपचूप शासकीय अधिकारी व पोलिसांना कोणतीही माहिती न देता राजनोली उड्डाणपुलावर जाऊन नारळ फोडून उड्डाणपुलाचे उद्घाटन केल्याचे जाहीर केले. तसेच उद्घाटनाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मुंबई-नाशिक बायपासवरील महामार्गावरील भिवंडी -रांजणोली चौकात दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक कोंडीने हैराण आहेत. या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएने भिवंडी तालुक्यातील रांजणोली चौक येथे उड्डाणपूल उभारण्याचे काम हाती घेतले. मात्र, कंत्राटदाराच्या संथगती कारभारामुळे काम वेळेत पूर्ण झाले नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा प्रश्न गहन झाला आहे. आता या उड्डाण काम पूर्ण झाले आहे. मात्र, उद्घाटन करण्यास स्थानिक नेते टाळाटाळ करीत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटलेला नाही.

- Advertisement -

रांजनोली चौकात भिवंडी ते कल्याण आणि मुंबई ते नाशिककडे जाणारी वाहने एकत्र येतात. या ठिकाणी वेगाने पूल उभारण्याची मागणी होत होती. मात्र, माणकोली प्रमाणेच पुलाचे संथगतीने सुरू होते. अखेर निवडणुकीच्या काळात पुलाची एक मार्गिका पूर्ण झाली. परंतु, आचारसंहिता लागल्यामुळे पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. त्यामुळे रांजणोली चौकात प्रवाशांना नाहक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. तसेच अपघातामुळे अनेकांचे मृत्यूही झालेले आहेत. त्यामुळे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख व जय आगरी सेवा संस्थेचे अध्यक्ष यशवंत पाटील यांनी हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी तातडीने खुला करावा, अशी मागणी केली होती. मात्र, उद्घाटन न झाल्यामुळे पूल खुला करण्यात आलेला नव्हता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -