घरमुंबईमुंबईच्या सीमेवर २५४ दुधाच्या नमून्यांची तपासणी; भेसळयुक्त दुधावर एफडीएची नजर

मुंबईच्या सीमेवर २५४ दुधाच्या नमून्यांची तपासणी; भेसळयुक्त दुधावर एफडीएची नजर

Subscribe

दोन दिवसामध्ये एफडीएने मुंबईतील पाच जकात नाक्यांवर तब्बल २५४ नमून्यांची तपसाणी केली. यामध्ये सात नमूने कमी दर्जाचे आढळून आल्याने हा साठा परत पाठवण्यात आला.

मुंबईकरांना सुरक्षित व निर्भेळ दूध मिळावे यासाठी अन्न व प्रशासन विभागातर्फे (एफडीए) २१ व २२ जानेवारी परराज्य व जिल्ह्यातून येणार्‍या दूधावर शहराच्या सीमेवरच कारवाई करण्यात आली. दोन दिवसामध्ये एफडीएने मुंबईतील पाच जकात नाक्यांवर तब्बल २५४ नमून्यांची तपसाणी केली. यामध्ये सात नमूने कमी दर्जाचे आढळून आल्याने हा साठा परत पाठवण्यात आला.

दहिसर, मानखुर्द, ऐरोली, मुलुंड चेकनाका (पूर्व), मुलुंड एलबीएस चेकनाका या पाच जकात नाक्यावरून परराज्य व जिल्ह्यातून दररोज सकाळी दूध मुंबईत येते. मुंबईमध्ये दररोज विविध प्रकारच्या ब्रँडचे दूध मुंबईत येत असते. त्यामुळे मुंबईकरांना भेसळयुक्त दूध मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन एफडीएकडून शहरात येणार्‍या दुधावर करडी नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २१ व २२ जानेवारीला पहाटेच्या सुमारास मुंबईत या पाच जकात नाक्यांवरून मुंबईत येणार्‍या १७० वाहनातील २५४ दूधांच्या नमुन्यांची तपासणी केली. तपासणी केलेल्या वाहनांमधील दुधाची जकात नाक्यांवरच शासकीय विश्लेषकांमार्फत तपासणी करण्यात आल्याने एफडीएच्या अधिकार्‍यांना कारवाई करणे शक्य झाले. त्यामुळे कमी दर्जाचा दुधाचा साठा परत पाठवण्यात आला. मुलुंड चेक नाका (पूर्व) या जकात नाक्यावर तपासलेल्या २५ वाहनांमधील ३७ दूधांच्या नमुन्यांपैकी ५ नमूने कमी दर्जाचे तर, मानखुर्द चेकनाक्यावर तपासलेल्या ४८ वाहनांमधील ७४ नमून्यांपैकी २ नमूने कमी दर्जाचे आढळून आले. या सातही दुधाचे नमूने विश्लेषणासाठी एफडीएकडून ताब्यात घेण्यात आले आहेत. दोन दिवसांमध्ये पाचही जकात नाक्यांवर तब्बल ६ लाख ६३ हजार ९३ लिटर इतके दूध घटनास्थळी तपासण्यात आले. यातील सात नमुन्यांमध्ये ३ हजार ६३२ लिटर दूध कमी दर्जाचे सापडल्याची माहिती एफडीए (अन्न) सहआयुक्त श.रा. केंकरे यांनी दिली. अशा प्रकारच्या अनपेक्षित धाडींचे आयोजन प्रशासनामार्फत नियमित करण्यात येणार असल्याचेही एफडीएकडून जाहीर करण्यात आले आहे.

- Advertisement -

fda table

अन्न पदार्थांच्या दर्जाबाबत शंका आल्यास

भेसळयुक्त दूधविरोधातील मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाचे सर्व सहाय्यक आयुक्त (अन्न), सर्व सुरक्षा अधिकारी आणि प्रशासनाच्या प्रयोगशाळेतील व शासकीय तसेच एनएबीएल अ‍ॅक्रिडेटेड प्रयोगशाळेच्या सर्व विश्लेषकांनी परिश्रम घेतले. तसेच अन्न पदार्थांच्या दर्जाबाबत काही शंका आल्यास त्याबाबतची माहिती प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर कळवण्यात यावी, असे आवाहन एफडीएकडून करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -