घरमुंबईकुलगुरू आम्हाला वाचवा!

कुलगुरू आम्हाला वाचवा!

Subscribe

मुंबई विद्यापीठाच्या नेहरू ग्रंथालयातील वाळवी लागलेल्या ग्रंथसंपदेचा टाहो

ग्रंथालय हे शिक्षणाचा मूळ गाभा समजले जाते, परंतु पारंपरिक स्तरावर देशात अव्वल असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील जवाहरलाल नेहरू ग्रंथालय प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दुरवस्थेच्या गर्तेत सापडले आहे. ग्रंथालयातील संदर्भ ग्रंथ, 50 वर्ष जुने वृत्तपत्रे, साप्ताहिके, विद्यार्थ्यांचे संशोधन प्रबंध अनेक दिवसांपासून धूळ खात पडले असून काही वाळवीमुळे नष्ट होत आहेत. तर लायब्ररीतील बाके तुटलेली असून अनेक इमारतीच्या स्लॅबचे प्लास्टर अनेक ठिकाणी कोसळलेले असल्याने विद्यार्थी व कर्मचारी जीव मुठीत घेऊन वावरत आहेत. विद्यार्थी व संघटनांनी यासंदर्भात दुर्लक्ष करूनही विद्यापीठ प्रशासनाकडून दुर्लक्ष करत असल्याने धूळ, वाळवीचा विळखा आणि धोकादायक नेहरू ग्रंथालयाची इमारत यामुळे ’कुलगुरु आम्हाला वाचावा!’ असा टाहो फोडण्याची वेळ ग्रंथालयातील ग्रंथसंपदेवर आली आहे. आणि धूळ व वाळवीच्या विळख्यात सापडल्यामुळे ग्रंथसंपदेचा वापर करणे शक्य होत नसल्याने विद्यार्थ्याना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

मुंबई विद्यापीठामध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी कलिना कॅम्पसमध्ये जवाहरलाल नेहरू ग्रंथालयात मोठ्या प्रमाणात ग्रंथसंपदा आहे. यामध्ये विविध लेखकांची पुस्तके, आत्मचरित्र, अभ्यासक्रमाशी निगडित पुस्तके, संदर्भ ग्रंथ, ऐतिहासिक, राजकीय, अर्थ, प्राशासकीय अशा विविध विषयांवर पुस्तके आहेत, तसेच विद्यार्थ्याना संशोधनात महत्त्वाची ठरणारी 50 वर्षांतील विविध वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके आहेत. अशा या महत्त्वपूर्ण ग्रंथ संपदेकडे ग्रंथालय व विद्यापीठ प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे लाख मोलाचे ज्ञान नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

- Advertisement -

पीएचडी करणार्‍या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी महत्त्वाची असलेली पुस्तके व 50 वर्षांची वृत्तपत्रे यांना वाळवी लागली आहे. धूळ व वाळवीच्या विळख्यात सापडलेली ही पुस्तके विद्यापीठ प्रशासनाकडून ग्रंथालयाच्या पॅसेजमध्ये टाकण्यात आली आहेत. केविलवाण्या अवस्थेत पडलेली ही पुस्तके कुलगुरू आम्हाला वाचवा! असा टाहो फोडत आहेत, या ग्रंथासंपदेला वाचवण्यासाठी कुलगुरू तातडीने कारावाई करतील का असा प्रश्न युवासेना सिनेट सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांनी केला आहे.

विद्यापीठ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पुस्तकांबरोबरच ग्रंथालय इमारतीचीही दुरवस्था झाली आहे. इमारतीच्या छताचे ठिकठिकाणी प्लास्टर कोसळलेले आहे. ग्रंथालयाच्या पॅसेजमध्ये भंगाराचे सामान व तुटलेली बाके अस्ताव्यस्त टाकण्यात आल्याने ग्रंथालयाचे पॅसेज भूतपटातील सेट असल्याचे वाटत आहे.इमारतीचा कोणताही भाग कधीही कोसळू शकतो अशा अवस्थेत आहे, अशा धोकादायक अवस्थेत विद्यार्थ्याना अभ्यास करावा लागत आहे, तर कर्माचारीही जीव मुठीत घेऊन काम करत आहेत. त्याचप्रमाणे ग्रंथालयातील स्वच्छतागृहाच्या फक्त नावातच स्वच्छता आहे. स्वच्छतागृहाच्या तुटलेल्या खिडक्यांमुळे समोरील इमारतीतून महिला स्वच्छतागृहांतील सर्व काही दिसत आहे. त्यामुळे स्वच्छतागृह असुरक्षित असल्याची भीती विद्यार्थिनींकडून व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

दोन वर्षांपासून ग्रंथालयाची नवी इमारत बांधून तयार आहे. मात्र तरीही प्रशासन नव्या इमारतीमध्ये ग्रंथालय स्थलांतरित का करत नाही. पडझडीमुळे जीवितहानी होण्याची प्रशासन वाट पाहत आहे का? असा प्रश्न ऍड वैभव थोरात यांनी उपस्थित केला आहे.

पुस्तकेच करतील गुन्हा दाखल
पुस्तकांना जर शक्य झाले तर त्यांनी विद्यापीठ प्रशासनावर गुन्हा दाखल केला असता, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असते पण पुस्तकांवरही आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका असा संतप्त प्रश्न युवासेना सिनेट सदस्य ऍड वैभव थोरात यांनी केला आहे.

लाखोंची स्कॅनर मशीन धूळखात
ग्रंथालयातील पुस्तके डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देता यावीत यासाठी दोन वर्षांपूर्वी 40 लाखांचा ऑटोमॅटिक स्कॅनर विद्यापीठाकडून ग्रंथालयाला देण्यात आला. या स्कॅनरचा वापर करून दिवसाला 100 पुस्तके स्कॅन करणे शक्य आहे, परंतु त्याचा वापर करण्याबाबत कोणतेच आदेश आले नसल्याने त्याचा वापर होत नसल्याचे लायब्ररीतील कर्मचार्‍यांकडून सांगण्यात येते.

ग्रंथालयाची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी छत गळत असून छताचे प्लास्टर कोसळले असल्याने अभ्यासाला येणार्या विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण असते. दोन वर्षांपासून ग्रंथालयाची नवीन इमारत प्रतीक्षेत आहे. त्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्याऐवजी एखादी दुर्घटना घडण्याची विद्यापीठ वाट पाहत आहे का?
– ऍड वैभव थोरात, सिनेट सदस्य, युवासेना

नवीन इमारतीमध्ये डिजिटल ग्रंथालय असणार आहे. त्यामुळे हे ग्रंथालय तेथे स्थलांतरित करता येणार नाही. ग्रंथालयाच्या दोन विंगच्या डागडुजीचे काम सुरू केले आहे. आगामी शैक्षणिक वर्ष सुरू होईपर्यंत ग्रंथालयाची डागडुजी पूर्ण होईल, पुस्तकांचीही योग्य ती काळजी घेण्यात येत आहे.
– अजय देशमुख, कुलसचिव, मुंबई विद्यापीठ

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -