घरमुंबईहनुमान जन्मस्थळाचा पोरकट वाद

हनुमान जन्मस्थळाचा पोरकट वाद

Subscribe

हनुमानाचे जन्मस्थळ कोणते यावर दोन्ही बाजूने दावे-प्रतिदावे होत राहतील. जन्मस्थळाविषयी निश्चित निर्णायक भूमिकेपर्यंत पोहचण्यासाठी नाशकात शास्त्रार्थ धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. या धर्मसभेत शास्त्राचे अभ्यासक व रामजन्म शिलान्यास सोहळ्याचे पुरोहित गंगाधर पाठक यांनी जणू पंच म्हणून भूमिका वठवली. त्यामुळे त्यांनी दिलेला निर्णय तरी अंतिम मानायला हवा.

जय हनुमान ग्यान गुन सागर ।
जय कपीस तिहुं लोक उजागर ॥
रामदूत अतुलित बल धामा ।
अंजनि पुत्र पवनसुत नामा ॥

हनुमान चालीसामधील ही चौपाई.. आजवर केंद्रस्थानी केवळ रामाला ठेवणार्‍या राजकारण्यांनी आता आपले लक्ष्य बदलले आहे. राजकारणाच्या सारीपटावर आता हनुमंताची ‘एन्ट्री’ झाली असून त्यांच्या नावावर आता वादविवाद उकरुन काढले जात आहेत. देशातील दारिद्य्र, वाढती महागाई, गुन्हेगारी, बेरोजगारी या सर्व महत्वाच्या प्रश्नांना बाजूला सारुन हनुमानावरुन होणारे वाद आता चर्चेचे मुद्दे ठरत आहेत. अगदी काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्र हनुमान चालीसा पठणावरुन पेटलेला असताना आता हनुमानाचे जन्मस्थान नक्की कोणते याविषयीच्या चर्वितचर्वणाला सुरुवात झाली आहे. अशा प्रकारची चर्चा लोकशाही प्रधान व्यवस्थेत होणे गैर नाही. परंतु चर्चेचे जे स्वरुप असते त्याचे कदापिही समर्थन करता येणार नाही किंवा त्याला लोकमान्यताही मिळवता येणार नाही.

- Advertisement -

मशिदीवरील भोंग्यांचा आवाज दाबण्यासाठी जेव्हा हनुमान चालीसेचे पठण करण्यात येते तेव्हा हनुमान चालीसा ही केवळ निषेधाचे साधन बनते हे राजकारण्यांना कधी समजणार? चालीसेचे धार्मिक महत्व कमी करुन कुणाचा तरी आवाज दाबण्यासाठी तिचा वापर करण्याचा अधिकार या मंडळींना दिला तरी कुणी? त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर जाऊन हनुमान चालीसा पठणाचे कार्यक्रम केवळ मुख्यमंत्र्यांना डिवचण्यासाठी होतात तेव्हा तो हनुमान चालीसेचा अवमान समजू नये का? हा वाद मिटतो न मिटतो तोच आता हनुमानाच्या जन्मस्थळावरुन वाद सुरू झाला आहे. किष्किंधा ट्रस्टचे विश्वस्त गोविंदानंद सरस्वती अचानक नाशिकमध्ये ‘अवतरतात’ काय आणि हनुमानाचे जन्मस्थळ हे अंजनेरी नसून किष्किंधाच आहे असा दावा करतात काय.. त्यांनी हाच दावा किष्किंधात बसून केला असता तरी लोकांनी त्यांचे म्हणणे ऐकले असते. मात्र हा दावा करण्यासाठी ते थेट हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून लौकिक असलेल्या अंजनेरी परिसराचा समावेश असलेल्या नाशिक जिल्ह्यात येतात तेव्हा धार्मिक तेढ हा वाढणारच.

आजवर दोन धर्मांमध्ये असे तेढ निर्माण होत होते. गोविंदानंदांनी मात्र बाष्कळ वाद उकरुन काढत हिंदू धर्मातच तेढ निर्माण केले आहे. अशा प्रकारचा प्रयत्न सर्वसामान्याकडून झाला असता तर त्याला एव्हाना कायद्याने चाप लावण्यात आला असता. परंतु गोविंदानंदांना जणू सर्व गुन्हे माफ असल्यागत पोलिसांनीही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. धार्मिक तणाव निर्माण केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर गुन्हा दाखल होणे अपेक्षित होते. जन्मस्थळ मुद्याच्या निष्कर्षापर्यंत जाण्याच्या हेतूने आयोजित शास्त्रार्थ सभेत नाशिकमधील सुधीर महंत यांनी गोविंदानंदांवर माईक उगारला. महंत यांची कृती समर्थनीय नाही. परंतु ही कृती करण्यास उद्युक्त करणार्‍या गोविंदानंदांनाही कसे निर्दोष मानता येईल. मुळात साधू-संतांकडून अशा पोरकटपणाची अपेक्षा नसतेच. जुने संदर्भ देत त्यांनी तात्विक वाद घातला असता, तर जनतेनेही त्यांच्यावर विश्वास ठेवला असता. परंतु गोविंदानंदांनाच अशी शांतता नको होती.

- Advertisement -

हनुमानाचा जन्म कोठे झाला याचे उत्तर नाशिककर, किंबहुना समस्त महाराष्ट्रातील जनता अंजनेरीच देणार. केवळ गोविंदानंद म्हणतात म्हणून अंजनेरीचे पावित्र्य कमी होत नाही. राज्यातील महत्वाच्या धार्मिक स्थळाला नेस्तनाबूत करण्याचा गोविंदानंदांचा प्रयत्न महाराष्ट्रातील जनता कदापिही खपवून घेणार नाही. केंद्र सरकारने भविष्यात गोविंदानंदांच्या सुरात सूर मिळवले तरीही महाराष्ट्राच्या जनतेसाठी हनुमानाचे जन्मस्थळ अंजनेरीच राहणार ही बाब काळ्या दगडावरची रेष आहे. कोणतेही औचित्य नसताना अचानकपणे गोविंदानंदांना जन्मस्थळाबाबतचा ‘साक्षात्कार’ का व्हावा आणि त्यांनी हा मुद्दा का पेटवावा, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. मुळात गोविंदानंदांच्या या दाव्यामागेही एक षड्यंत्र लपल्याचा वास येतो. किष्किंधाच जन्मस्थळ असल्याचा दावा करीत ते आपल्या ट्रस्टचे महत्व वाढवून धार्मिक पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेतच; शिवाय त्यामागे मोठे अर्थकारणही दडल्याचा संशय येतो.

धर्मनिरपेक्ष म्हणवणार्‍या भारतात राम मंदिरासह धार्मिक मुद्यांना राजाश्रय कधी मिळाला असेल तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘राज्याभिषेका’नंतर. २०१४ पासून अशा मुद्यांना सरकारी आश्रय मिळत आहे. यातूनच पुढे रामायण सर्किटची घोषणाही करण्यात आली. रामायणातील संदर्भाप्रमाणे राम ज्या-ज्या ठिकाणी आले होते त्या-त्या ठिकाणांना एकमेकांशी जोडणे, त्या धार्मिक पर्यटन स्थळांचा विकास करणे, त्यासाठी कोट्यवधींचे प्रलल्प राबवणे आदी बाबींचा समावेश रामायण सर्किटमध्ये केला जाणार आहे. त्यात ज्या नऊ राज्यातील १५ स्थानांचा समावेश होणार आहे त्यातील एक महाराष्ट्रातील नाशिक आहे. कर्नाटकातील हम्पीचा समावेश यात असला तरी किष्किंधाचा उल्लेखही नाही. नाशिकमध्ये जेव्हा प्रकल्प उभे राहतील त्यात नाशिक शहराबरोबर अंजनेरी गावाचाही समावेश असेल, परंतु हनुमान जन्मस्थळ जर किष्किंधाला जाहीर केले तर निधीची गंगा या शहरातही वाहील, असाही सुप्त हेतू असावा.

हनुमानाचे जन्मस्थळ कोणते यावर दोन्ही बाजूने दावे-प्रतिदावे होत राहतील. जन्मस्थळाविषयी निश्चित निर्णायक भूमिकेपर्यंत पोहचण्यासाठी नाशकात शास्त्रार्थ धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. या धर्मसभेत शास्त्राचे अभ्यासक व रामजन्म शिलान्यास सोहळ्याचे पुरोहित गंगाधर पाठक यांनी जणू पंच म्हणून भूमिका वठवली. त्यामुळे त्यांनी दिलेला निर्णय तरी अंतिम मानायला हवा. त्यांच्या मते, हिंदू धर्मशास्त्रीय कालगणनेनुसार सृष्टिरचनाकार ब्रह्मदेवाचे विविध कल्प आहेत. प्रत्येक कल्पात हनुमानाचा स्वतंत्र अवतार आहे. भूतकाळातील कल्पांत हनुमानाचा एक अवतार अंजनेरी पर्वतावर झाला आहे, याला ब्रह्मपुराण पुष्टीच देते. याचे खंडन करता येणार नाही. मात्र, वर्तमानातील कल्पांचा विचार करता वर्तमानातील चिरंजीव हनुमानाचा अवतार हा किष्किंधामध्ये झाल्याचे वाल्मीकी रामायणानुसार मान्य करावे लागते.

म्हणजे पाठक यांनी नाशिकबरोबर किष्किंधालाही कमी लेखले नाही. त्यांनी धार्मिक ग्रंथांचे संदर्भ देत दोन्ही स्थळांचे माहात्म्य सारखेच असल्याचा निर्वाळा दिला. मात्र तरीही गोविंदानंदांचे समाधान झालेच नाही. आपल्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचे सांगत नाशिकमधून त्यांनी काढता पाय घेतला. त्यांच्यावर माईक उगारणार्‍या महंत सुधीर पुजारी यांचा चक्क सत्कार करण्यात आला. अतिथीवर माईक उगारणार्‍या महंतांच्या कृतीचे समर्थन कसे होऊ शकते? एकूणच समाजमनात साधू-संतांविषयी असलेल्या प्रतिमेवर डाग पाडण्याचे काम या प्रकरणात झालेले दिसून येते. हनुमानाचा जन्म कोठे झाला हा प्रश्न सर्वसामान्यांना कधीही पडलेला नाही. हनुमानाचे जन्मस्थान दर्शविणारी सहा ठिकाणे आहेत. या सहाही ठिकाणांवर भाविकांची श्रद्धा आहे. त्यासाठी जन्मस्थळावरुन काथ्याकूट करण्याची अजिबातच गरज नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -