घरमुंबईडोळखांब आरोग्य केंद्रच व्हेंटिलेटरवर

डोळखांब आरोग्य केंद्रच व्हेंटिलेटरवर

Subscribe

आरोग्य सेवेचे तीनतेरा

तालुक्यापासून 40 किमी अंतरावर असलेल्या आदिवासी दुर्गम अशा डोळखांब भागात दिवसेंदिवस वाढत चाललेला कुपोषणाचा आकडा कमी होण्याचे नाव घेत नाही. अशातच 1982-83 साली येथे झालेली इमारत 27 महसुली गावे 60 गावपाड्यांच्या आरोग्याची काळजी घेणार्‍या येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सोयी सुविधांअभावी तीनतेरा वाजले आहेत. वाढती लोकसंख्या, जीर्ण इमारत, रिक्त पदे, लोकसंख्येचा विचार करता अपुरी व्यवस्था, कर्मचार्‍यांसाठी असलेली गळकी, नादुरुस्त निवासस्थाने, पाणी, अपुरा कर्मचारी वर्ग आदी समस्यांनी हे रुग्णालय ग्रासले आहे.

डोळखांब प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ग्राम पातळीवर आरोग्य सेवा पुरविण्यासाठी खराडे, गुंडे, डेहणे, साकडबाव, चोंढे आणि डोळखांब या दुर्गम भागात उपकेंद्र सुरू करण्यात आले आहे. डोळखांब आरोग्य केंद्र सोडले तर इतर ठिकाणी निवासस्थानाच्या समस्येमुळे कोणताही कर्मचारी वास्तव्य करत असलेला दिसून येत नाही.

- Advertisement -

अ‍ॅम्ब्युलन्स बंद
आरोग्य केंद्रात असणारी 108 क्रमांकाची अ‍ॅम्ब्युलन्स ही वर्षातून काही महिने बंद असते, तर कधी कधी चालक उपलब्ध नसतात. त्यामुळे तातडीच्या वेळी रुग्णांना 102 किंवा खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो.

निवासस्थानांची दुर्दशा
या ठिकाणी कर्मचार्‍यांना राहण्यासाठी असलेली निवासस्थाने ही गळकी, छत कोसळलेल्या स्थितीत असल्याने निवासी कर्मचार्‍यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. गरम पाणी आणि विजेसाठी बसविलेल्या सौर ऊर्जेवर चालणार्‍या यंत्रातील बॅटरी खराब झाल्याने वीज गेल्यास येथील रुग्णांना आणि कर्मचार्‍याना अंधारात राहावे लागते. त्यामुळे तातडीच्या काळात येथे पर्यायी वीज, सौर ऊर्जेवर चालणार्‍या बॅटर्‍या उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

- Advertisement -

पाण्याची समस्या
डोळखांब प्राथमिक आरोग्य केंद्राला 7-8 वर्षापूर्वी पाणी योजना मंजूर झाली होती. परंतु ठेकेदाराने हे काम अपूर्ण ठेवले. तसेच तीन फेज जोडणीचे कामही झाले नसल्यामुळे पाण्याची कमतरता आहे. सद्यस्थितीत ग्रामपंचायतीने तात्पुरती स्वरूपात पाण्याची उपलब्धता करून दिली असली तरी रुग्णालयाच्या मालकीची योजना कधी सुरू होणार असा सवाल विचारला जात आहे. नुकतीच तीन फेज वीज जोडणी आरोग्य केंद्राला मिळाली आहे. परंतु टाकीचे काम पूर्ण न झाल्याने सध्या तरी पाण्याची व्यवस्था होण्याची चिन्हे दिसत नाही.

उपकेंद्राची दुरवस्था आणि रिक्त पदे
प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत येणार्‍या सहा उपकेंद्रापैकी साकडबाव, डेहणे या ठिकाणी संरक्षक भिंत नाही, तर चोंढे येथे वीज फिटिंग, नळ जोडणी नसल्याने विहिरीवरून पाणी भरावे लागते, तर इतर उपकेंद्रातील निवासस्थानांची दुरवस्था झाली आहे.

कॅन्टीनचे बांधकाम निकृष्ट
2017 साली या ठिकाणी नाविन्यपूर्ण योजनेमधून 10 लाख निधी खर्च करून कॅन्टीन बांधण्यात आली होते. परंतु ठेकेदाराने केलल्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे वापर करण्याआधीच या इमारतीला गळती लागली आहे . तर 2 वर्षांपूर्वी येथील समाज सभागृहाची दुरुस्ती करण्यात आली होती. परंतु दुरुस्ती करून काही दिवसांतच येथील सिलिंग गळून पडली.

या आरोग्य केंद्रात 1 लॅब तंत्रज्ञ, 2 शिपाई, कायमस्वरूपी चालक, 2 स्टाफ नर्स आणि उपकेंद्रात असलेल्या 2 आरोग्य सेविका यांच्या जागा रिक्त असल्याने कर्मचार्‍यांवर मोठ्या प्रमाणावर ताण पडत आहे. त्यामुळे उपकेंद्रामधून कर्मचारी बोलवावे लागतात.
-आर.एम.पटेल, वैद्यकीय अधिकारी, डोळखांब

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -