घरमुंबईलावणी सम्राज्ञी विजया पालव यांना दिव्यात मारहाण

लावणी सम्राज्ञी विजया पालव यांना दिव्यात मारहाण

Subscribe

किरकोळ कारणावरून झालेल्या वादविवादातून महाराष्ट्र राज्य पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी विजया पालव यांना मारहाण झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ठाण्यातील दिवा परिसरात घडली. ही मारहाण स्थानिक बिल्डर आणि त्याच्या कुटुंबीयांनी केल्याचा आरोप विजया पालव यांनी केला आहे. तर, पालव या काही महिलांना घेऊन मेंटेनन्स का वाढला याचा जाब विचारण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी, त्यांना घरातील अंतर्गत काम कोणाला विचारून सुरू केले, असे बिल्डरने विचारल्यावर दोन गटांत वाद होऊन त्यांच्यात मारामारी झाली. त्यामध्ये त्या जखमी झाल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली.

विजया पालव यांनी दिवा पश्चिमेला २०१६ मध्ये फ्लॅट विकत घेतला होता. तसेच त्या २०१८ पासून दिव्यात वास्तव्यास आहेत. महिन्याभरापूर्वी स्थानिक बिल्डरला त्यांच्यासह ९ जणांनी नोटीस पाठवली होती. त्यानंतर त्याने पालव यांना धमकविण्यास सुरुवात करून घर विकून जाण्यास सांगितले. सद्यस्थितीत पालव यांच्या घरात पाण्याच्या पाईपलाईनचे अंतर्गत काम सुरू होते. त्यासाठी काम करणारा प्लंबर पाईप घेऊन येत असताना स्थानिक बिल्डरने ते पाईप त्याच्याकडून काढून घेतले. ते का काढून घेतले याचा जाब विचारण्यासाठी पालव गेल्या असताना त्या बिल्डरच्या कुटुंबातील चार महिलांसह बिल्डर आणि त्याच्या भावाने त्यांना मारहाण केली. यामध्ये त्यांना खाली पाडल्याचा आरोपही पालव यांनी केला. तसेच त्यांनी स्वतः मुंब्रा पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यानंतर त्यांना पोलिसांनी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मेडिकलसाठी आणण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रकरणी रविवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

- Advertisement -

” बिल्डिंगचा मेंटेनन्स ८०० वरून १५०० केला याचा जाब जखमी पालव या काही महिलांना घेऊन बिल्डरकडे गेल्या होत्या. त्यावेळी बिल्डरने तुम्ही घरात अंर्तगत काम कोणाला विचारून सुरू केले. त्यावेळी बिल्डरकडील महिला आणि पालव यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यातून त्यांना मारहाण झाली आहे. मेडिकल रिपोर्टनुसार पुढील कारवाई केली जाईल.”
– गीताराम शेवाळे, ( गुन्हे) पोलीस निरीक्षक, मुंब्रा पोलीस ठाणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -