घरमुंबईप्यार किया तो डरना क्या ...

प्यार किया तो डरना क्या …

Subscribe

मधुबाला व्हॅलेंटाईन डे ला देवाला पडलेले सर्वात सुंदर स्वप्न

आपल्या अभिनय आणि मधाळ हास्याने आजही लाखो प्रेक्षकांच्या मनावर गारुड करणारी अभिनेत्री मधुबाला आजही अनेकांच्या स्मरणात आहे. सौंदर्य आणि अभिनय यांचा सुरेख मिलाफ म्हणून मधुबालाची आजही हिंदी चित्रपटात ओळख आहे. हिंदी पडद्यावर कृष्ण धवलपासून ते रंगीतपर्यंतच्या तिच्या सिनेप्रवासात अनेक चित्रपटांनी केवळ मधुबाला या नावावरच हाऊसफुल्लचे बोर्ड झळकावले. १४ फेब्रुवारी १९३३ व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी जन्मलेल्या मधुबालाची आठवण ताजी करून गुगलने तिचे डुडल बनवले. अभिनय, सिने कारकिर्द असे अनेक पैलू तिच्या जगण्याचे होते. मात्र तिची प्रेमकहाणीची चर्चा त्या काळापासून आजही सिनेप्रेमींमध्ये केली जाते.

मधुबाला नावाची ही मधाळ अभिनेत्रीचा जन्म दिल्लीत झाला तो काळ ब्रिटीश राजवटीचा होता. मधुबालाचं नाव मुमताज बेगम देहलवी असं होतं. रिक्षा चालवून घरप्रपंच चालवणार्‍या अताउल्लाह खान यांच्या या मुलीने पुढे सिनेसृष्टीत आपल्या नावाचा अमिट ठसा उमटवला. अताउल्लाह यांच्याकडे एका काश्मिरी ज्योतिष्याने मधुबालाविषयी भविष्यवाणी केली होती. या भविष्यवाणीत एका शोकांतिका आणि एक सुखांतिका होती. तो म्हणाला…ही मुलगी पैशांमध्ये खेळेल पण तिला प्रेम मिळणार नाही. त्या ज्योतिषाचे म्हणणे अताउल्लाह यांनी मनावर घेतले आणि कालांतराने ते मधुबालाला घेऊन मुंबईत दाखल झाले. बेबी मुमताज या नावाने बालकलाकार म्हणून 1942 साली ’बसंत’ या चित्रपटात छोट्या मधुबालाला पहिली संधी मिळाली. तिच्या कामातील चमक आणि आत्मविश्वास पाहून त्याकाळातील सिनेक्षेत्रात मोठा दबदबा असलेल्या अभिनेत्री देविकारानी यांनी मुमताजचे नाव मधुबाला केले.

- Advertisement -

पुढे 1947 साली आलेल्या ‘नीलकमल’साठी अवघ्या 14 वर्षाच्या मधुबालाचे सुपरस्टार राज कपूरसोबत कास्टिंग झाले मुमताज या नावाने त्यांचा हा चित्रपट शेवटचा होता तर यापुढे मधुबाला नावाचे अभिनय सौंदर्याचे नवे पर्व सुरू झाले.
अशोक कुमार यांच्या बॉम्बे टॉकीज बॅनरची निर्मिती असलेला महल या चित्रपटातून 1949 साली मधुबालाच्या चित्रपट क्षेत्रातील वाटचालीला खर्‍या अर्थाने उल्लेखनीय वळण मिळाले. परंतु 1950 ते 1957 या काळ मधुबालाच्या चित्रपट क्षेत्रातील वाटचालीसाठी अत्यंत वाईट होता. या काळात तिच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल केली नाही. मात्र 1958 या साली आलेले ‘फागुन’, ‘हावडा ब्रिज’, ‘कालापानी’ आणि ‘चलती का नाम गाडी’ या चित्रपटामुळे मधुबाला प्रकाशझोतात आली. ‘हावडा ब्रिज’ मधील तिच्या क्लब डान्सरच्या भूमिकेतील अदांनी प्रेक्षक आजही घायाळ होतात. तर चलती का नाम गाडीमध्ये किशोर कुमारसोबत तिची जमलेली जोडी आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

‘तराना’ त मधुबाला आणि दिलीप कुमारची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीची ठरली. तरानाच्या चित्रीकरणादरम्यान मधुबालाच्या मनाचा ताबा दिलीप साहेबांनी घेतला. त्यावेळी मधुबालाने तिच्या ड्रेस डिझायनरकडे गुलाबाचे फुल आणि आपल्या मनातील हळूवार भावना उलगडणारे पत्र दिलीपसाहेबांकडे पाठवले होते. दिलीप साहेबांनी हे पत्र स्वतः जवळ ठेवल्यास प्रेम प्रस्तावाला तो होकार समजावा, असे या पत्रात मधुबालाने म्हटले होते. त्यानंतर दिलीप साहेबांनी ते पत्र स्वतःजवळ ठेवले. त्यावेळी मधुबाला ही तत्कालीन आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जात होती. के. आसिफच्या महत्वाकांक्षी ’मुघल-ए-आझम’ चं चित्रिकरण सुरू होतं. आणि सेटवर अचानक मधुबालाची तब्येत बिघडली. त्यावेळी तब्बेत आणि सौंदर्याची काळजी घेणारी मधुबाला केवळ गरम पाणी घेत होती. जैसलमेरच्या रखरखीत वाळवंटात शुटींग सुरू होतं. पर्याय नसल्याने तिला एका विहिरीचं पाणी प्यावं लागलं. मुघल ए आझमच्या शुटींगरदम्यान मधुबालाने कथानकातील शहेनशहा पृथ्वीराज कपूर यांच्या आदेशाने या अनारकलीने अंगावर लादलेले जड साखळदंड एखाद्या दागिन्यांसारखे वागवले. या चित्रपटाच्या कथानकाप्रमाणेच या काळात दिलीप आणि मधुची प्रेमकहाणी हिंदी चित्रपटसृष्टीत चर्चिली जात होती.

- Advertisement -

1960 साली मुगल-ए-आझम प्रदर्शित झाल्यावर तिच्या कामाचे अभिनयाचे कौतूक सुरू झाले. आता ती सुपरस्टार झाली होती. मात्र दिलीप आणि मधुबाला यांची प्रेमकथा मुघल ए आझमच्या पडद्यावरील कथानकासारखीच तत्कालीन परिस्थिती आणि काही कारणांमुळे अधुरी राहिली. दरम्यान 60 च्या दशकात मधुबालाने चित्रपटात काम करणे कमी केले मात्र ही वेदना घेऊनच मधुबालाने पुढे आपली सिनेकारकिर्द सुरू ठेवली. चलती का नाम गाडी आणि झुमरू चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी किशोर कुमार आणि मधुबाला भावनिकरित्या एकमेकांच्या जवळ आले होते. आजही अनेकांच्या ह्यदयाच्या अधिराज्य गाजवणार्‍या मधुबालाचे ह्यद मात्र आजारी होते. त्याच्या उपचारासाठी ती

लंडनला गेली. ही बाब अताउल्लाह खान यांनी किशोर कुमार यांना सांगितली होती. लंडनवरून परतल्यावर हे दोघे विवाह करूशकतात असेही ते म्हणाले. मात्र लंडनला उपचारासाठी गेलेली मधुबालाचा आजार आता कमालीचा बळावला होता. तीने ही बाब किशोरला सांगितली. मधुबालाची इच्छा पूर्ण करण्यासाठी ऑपरेशनआधीच किशोरकुमार यांनी तिच्याशी लग्न केल्याचे म्हटले जाते. लग्न झाल्यावर तिची तब्बेत आणखी खालवली. याच दरम्यान तिचे पासपोर्ट, झुमरू, बॉयफ्रेंड, हाफ तिकट आणि शराबी असे सिनेमे प्रदर्शित झाले. प्रकृती स्थिर नसताना 1964 साली पुन्हा जोमाने काम करण्याचा निर्णय तिने घेतला. मात्र चालाख सिनेमाच्या चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी मधुबाला सेटवर बेशुद्ध पडली आणि हा सिनेमा बंद करावा लागला. १९६९ साली ’फर्ज आणि इश्क’ या चित्रपटाचे काम सुरू असतानाच २३ फेब्रुवारी १९६९ साली सौंदर्य आणि मधाळ हास्याचे मधुबाला नावाचे पर्व अनंतात विलीन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -