घरमुंबईअधिवेशन टाळण्यासाठी कोरोना वाढीचा कांगावा

अधिवेशन टाळण्यासाठी कोरोना वाढीचा कांगावा

Subscribe

सावधान! सध्या कोरोनाचा नवीन स्ट्रेन आला आहे त्याचे नाव विधिमंडळ अधिवेशन कोरोना असे आहे. जो शरीरावर कमी पण स्वातंत्र्यावर अधिक परिणाम करतो, अशी टीका करतानाच अधिवेशन काळामध्ये मोर्चे घेऊन अनेकजण सरकारकडे आपली मागणी मांडतात. मात्र, राजकीय मोर्चांवर बंदी घालून आम्हाला प्रश्न विचारायचे नाही अशी सरकारची भूमिका आहे, अशी टीका मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे. केवळ अधिवेशन टाळण्यासाठी कोरोना वाढल्याची आकडेवारी दाखवली जात आहे, असेही देशपांडे म्हणाले.

वीज बिलांवर एवढे आंदोलन सुरू आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी कधी लाईव्ह केले नाही. ते त्या प्रश्नावर का बोलत नाहीत. का लोकांच्या नोकर्‍यांबद्दल बोलत नाही. तुम्ही नीती आयोगाला सांगता कार्यालयीन वेळा बदला, तुम्ही मंत्रालयाच्या वेळा का नाही बदलत. वर तुम्ही लोकांना सांगता मी काय बोलतो तुम्हाला ऐकू येत आहे; पण तुम्ही काय बोलता मला ऐकू येत नाही. हे काय चालवलं आहे? ही कुठल्या पद्धतीची लोकशाही आहे? लोकांना घरात डांबायचे. त्याच्या नोकरीचा विचार करायचा नाही. बँका त्यांच्याकडून हफ्ते वसूल करतायत. लोकांनी त्यांचे सोने-नाणे गहाण ठेवले आहे. त्यांच्या नोकर्‍या गेल्यात, त्यांनी खायचे काय याबद्दल बोलायचे सोडून लॉकडाऊन करून घरात डांबून ठेवायच्या धमक्या देतायत. तुम्हाला घरात बसायचे असल्याने तुम्ही लोकांना घाबरवताय, अशा शब्दांमध्ये देशपांडे यांनी ठाकरे सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे.

- Advertisement -

धार्मिक स्थळ उघडल्याने कोरोनाची वाढ झाली असे म्हणत असाल तर ती उघडून किती काळ झाला आहे. परिणाम दिसायचा तर तेव्हाच १५ दिवसात दिसला असता. आता कसा दिसतोय हा परिणाम. कोरोनाला काय शिकवून पाठवले आहे का, की अधिवेशनाच्या काळात वाढायचं आणि नंतर कमी व्हायचे?, लोक मास्क लावूनच फिरतायत; पण तुम्ही लोकांना जबाबदार धरताय. कारण तुम्हाला प्रश्नांपासून पळ काढायचा आहे, असा टोला देशपांडेंनी लगावला आहे. सावधान! सध्या कोरोनाचा नवीन स्ट्रेन आला आहे त्याचे नाव विधिमंडळ अधिवेशन कोरोना असे आहे, जो शरीरावर कमी पण स्वातंत्र्यावर अधिक परिणाम करतो, असे खोचक ट्विटही देशपांडे यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -