घरमुंबईधंद्याच्या नादात पोटच्या मुलीलाच विसरला ट्रेनमध्ये!

धंद्याच्या नादात पोटच्या मुलीलाच विसरला ट्रेनमध्ये!

Subscribe

दुकान उघडायला उशीर होत आहे म्हणून ओमप्रकाश यादव हे व्यावसायिक पोटच्या मुलीला ट्रेनमध्येच विसरले. रेल्वे पोलिसांनी शोध घेतल्यानंतर सहा वर्षाची लिपिका सापडली. पण ओमप्रकाश यादव यांनी दिलेल्या अजब उत्तराने पोलीस देखील चक्रावून गेले.

हसावे की रडावे असं वाटायला लावणारी घटना मायानगरी मुंबईत घडली आहे. मूल महत्त्वाचे की धंदा? असा प्रश्न तुम्हाला कुणी विचारला तर कुणीही मूल असेच उत्तर देईल. पण, दुकान उघडायला उशीर झाला म्हणून ट्रेनमध्ये स्वत:च्या मुलीला विसरण्याचा प्रकार कल्याणमध्ये घडलाय. सुदैवाने मुलगी जरी सापडली असली तरी सारी कथा ऐकून हसावे की रडावे अशीच स्थिती तुमची होईल!

नक्की झालं काय?

व्यवसायाने दुकानदार असलेले ओमप्रकाश यादव पत्नी, मुलगी आणि मेव्हण्यासह शिर्डीला फिरायला गेले होते. त्यानंतर त्यांनी गुरूवारी रात्री १० वाजता शिर्डीवरून मुंबईला यायला ट्रेन पकडली. शिर्डीवरून निघालेली ट्रेन पहाटे ३.३०च्या दरम्यान कल्याण स्टेशनला पोहोचली. यावेळी सर्वजण साखरझोपेत होते. अचानक ओमप्रकाश यांना जाग आली आणि कल्याणला उतरण्यासाठी त्यांची एकच घाई झाली. त्यांनी घाईघाईने आपल्या पत्नीला उठवले. पण, त्यांचा मेहुणा उतरायच्या आत ट्रेन फलाटावरून निघाली. ओमप्रकाश यांनी मेहुण्याला पुढच्या स्टेशनवर उतरायला सांगितले आणि पत्नीसह त्यांनी डोंबिवलीसाठी लोकल पकडली.

- Advertisement -

घाईत चक्क मुलीलाच विसरले!

यावेळी आपली सहा वर्षांची मुलगी पत्नीसोबत असल्याचा समज ओमप्रकाश यांचा झाला. पण, प्रत्यक्षात मात्र मुलगी लिपिका पत्नीसोबत नसल्याचे लक्षात आले. त्यांनी मेहुण्याला फोन करण्याचा प्रयत्न केला. पण मेहुण्याचा मोबाईल पत्नीच्या बॅगेत असल्याचे ओमप्रकाश यांच्या लक्षात आले. दरम्यान, ओमप्रकाश यांचा मेहुणा रविशंकर हा ठाणे स्टेशनला उतरला होता. त्यामुळे गाढ झोपेत असलेल्या सहा वर्षाच्या लिपिकाला ट्रेनमधून उतरवणे शक्य झाले नाही. यानंतर ओमप्रकाश यादव यांनी कल्याण स्टेशन मास्तरांशी संपर्क साधत मुलगी लिपिकाला ट्रेनमध्येच विसरल्याची तक्रार दिली.

डब्बा, सीट नंबरही विसरले

कल्याण स्टेशन मास्तरांनी दादर रेल्वे पोलिसांशी संपर्क साधत लिपिकाचा शोध घेण्यास सांगितले. पण, गोंधळलेल्या ओमप्रकाश यांनी डब्बा क्रमांक आणि सीट नंबरची देखील चुकीची माहिती दिली. त्यामुळे लिपिकाचा शोध घेताना पोलिसांचा देखील गोंधळ उडाला. सर्व ट्रेनमध्ये शोध घेतल्यानंतर लिपिका एका सीटवर झोपल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पहाटे ४.४५ वाजता लिपिका पोलिसांच्या ताब्यात आली. त्यानंतर ५.२० वाजता लिपिकाला ओमप्रकाश यांच्या हाती सोपवण्यात आले. मुलगी मिळाल्याने ओमप्रकाश यांनी देखील सुटकेचा नि:श्वास टाकला.

- Advertisement -

ओमप्रकाश यांचे उत्तर, हसावे की रडावे?

लिपिका सापडल्यानंतर पोलिसांनी ओमप्रकाश यादव यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावेळी, ‘माझा दुधाचा व्यवसाय आहे. मी धंदा जास्त वेळ बंद ठेवू शकत नाही. त्यामुळे उतरण्याच्या घाईमध्ये मी मुलीला उठवायला विसरलो. शिवाय पत्नीने मुलीला सोबत घेतले असेल, असा माझा समज झाला’ असे उत्तर ओमप्रकाश यादव यांनी दिले. त्यांचे हे उत्तर ऐकून हसावे की रडावे हेच पोलिसांना कळेना झाले. अखेर पोलिसांनी ओमप्रकाश यांना समज देऊन मुलीला त्यांच्या ताब्यात दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -