घरमुंबईमनसे फॅक्टरचा प्रभाव पडणार नाही, शिवसेनेला दृढ विश्वास!

मनसे फॅक्टरचा प्रभाव पडणार नाही, शिवसेनेला दृढ विश्वास!

Subscribe

‘माय महानगर’च्या ‘खुल्लम खुल्ला’ या स्पेशल शोमध्ये राजकीय, सामाजिक, मनोरंजन, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रातून विविध मान्यवरांना चर्चेसाठी आमंत्रित करण्यात येतं. यावेळी शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांना बोलावण्यात आलं होतं.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या ‘लाव रे तो व्हिडिओ’ची चर्चा राज्यभर सुरू असताना त्याचा फटका शिवसेना आणि भाजप युतीला बसेल अशी शक्यता अनेक राजकीय जाणकार वर्तवत आहेत. मात्र, ‘या चर्चेचा किंवा राज ठाकरेंच्या कॅम्पेनचा कोणताही परिणाम मतांवर होणार नसून राज्यात २०१४ मध्ये जशी परिस्थिती होती, तीच परिस्थिती २०१९मध्ये देखील दिसेल’, असा आशावाद शिवसेना प्रवक्त्या आणि आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला आहे. ‘माय महानगर’च्या ‘खुल्लम खुल्ला’ या फेसबुक लाइव्ह शोमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी नीलम गोऱ्हे यांनी भाजप-सेना वादानंतरची युती, साध्वी प्रज्ञा सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य, इव्हीएम मशिनवरील आक्षेप यावर सविस्तर उत्तरं दिली.

‘माय महानगर’च्या ‘खुल्लम खुल्ला’ या स्पेशल शोमध्ये राजकीय, सामाजिक, मनोरंजन, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रातून विविध मान्यवरांना चर्चेसाठी आमंत्रित करण्यात येतं. यावेळी शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांना बोलावण्यात आलं होतं.

- Advertisement -

‘यंदा २०१४ची पुनरावृत्ती…’

राज ठाकरेंच्या सभांची गर्दी आणि त्यांच्या मुद्द्यांची चर्चा सुरू असताना शिवसेनेला त्याचा किती फटका बसेल, याविषयी नीलम गोऱ्हेंना विचारणा केली असता त्यांनी हा दावा फेटाळून लावला. आधी त्यावर काहीच बोलण्यास नकार देणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी नंतर मात्र उत्तर दिलं. ‘मतदार सूज्ञ असून त्यांना जे योग्य वाटेल, त्यानुसारच कुणाला मत द्यायचं हे तो ठरवतो. राज ठाकरे फार मोठे नेते आहेत. त्यामुळे माझ्यासारख्या प्रवक्याने त्यांच्या वक्तव्याची दखल घ्यावी असं मला वाटत नाही. २३ मेला निकाल लागेल तेव्हा सगळ्यांना कळेलच’, अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. ‘मतदानाच्या काळात अशा प्रकारे ठराविक उमेदवारांना मत देऊ नका, पण कुणाला मत द्या हे मात्र न सांगणं म्हणजे लोकशाहीलाच वैफल्याकडे घेऊन जाणारं आहे’, असं देखील त्या यावेळी म्हणाल्या.

…म्हणून केली शिवसेनेनं भाजपशी युती!

दरम्यान, यावेळी बोलताना नीलम गोऱ्हे यांनी भाजपसोबत झालेल्या असंख भांडणांनंतरही झालेल्या युतीवर प्रतिक्रिया दिली. ‘एका गटाला अजूनही वाटतं की आम्ही स्वतंत्र लढायला हवं होतं. पण जर आमच्या मतांचं ध्रुवीकरण झालं असतं, तर त्याचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला झाला असता. अयोध्येला जेव्हा उद्धव ठाकरे गेले, तेव्हा आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच आहोत हे स्पष्ट झालं. आत्ताच्या या काळात आम्ही युती करणं ही दीर्घकाळासाठीची भूमिका आहे’, असं त्या म्हणल्या. ‘२०१४च्या विधानसभा निवडणुकांनंतर सत्तेत सहभागी व्हायचा निर्णय घेतला, तेव्हाही यावर चर्चा झाली. युती नसती केली तर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच आम्हाला बसावं लागलं असतं. तेव्हा लोकांनी दिलेला कौल हा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात होता. तरीसुद्धा युती झाल्यानंतर इतर निवडणुकांमध्ये आम्ही स्वतंत्रच लढलो आहोत. त्यामुळे मतभेद तर असणारच आहेत. झालं गेलं गंगेला मिळालं, पुढे निघालो, ही आपली पद्धत आहे. जाणूनबुजून मतदारांमध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे’, असं नीलम गोऱ्हे यावेळी ठामपणे म्हणाल्या.

- Advertisement -

विरोधकांनी काढावा अफजलखानाचा कोथळा!

युती होण्याआधी शिवसेनेकडून वारंवार भाजप अध्यक्ष अमित शाह यांना अफजलखानाची उपमा देऊन ‘अफजलखानाचा कोथळा’ काढण्याची टीका केली जात होती. याविषयी विचारले असता विरोधकांनीच अफझलखानाचा कोथळा काढावा असं त्या म्हणाल्या. ‘सेना-भाजपमधले वाद कमी होत असताना राग भडकला पाहिजे असं म्हणत त्यात तेलपाणी ओतत राहायचं. जर विरोधकांना एवढंच वाटत असेल, तर त्यांनीच काढावा अफजलखानाचा कोथळा. का मिठ्या मारायला जातायत सारखे अफजलखानाला?’ असा प्रश्न नीलम गोऱ्हेंनी यावेळी विचारला.

मायावतींना पंतप्रधान करणार का?

पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरूनही नीलम गोऱ्हेंनी विरोधकांवर यावेळी टीका केली. ‘विरोधकांकडे अजूनही पंतप्रधानपदासाठी उमेदवार नाहीत. जर विरोधकांची सत्ता आली, तर मायावती किंवा ममता बॅनर्जी यांच्या राजकीय भूमिका पाहाता त्यांना आपण पंतप्रधान म्हणून नेमणार आहोत का? गेली ५० ते ५५ वर्ष जर लोकांनी काँग्रेसला संधी दिली आहे, तर आता काही काळ शिवसेना-भाजपच्या सरकारला काही काळ संधी द्यायला हवी’, असं त्या म्हणाल्या.

युक्रांदपासून शिवसेनेपर्यंतचा प्रवास…

पूर्वीच्या समाजवादी विचारसरणीवरून थेट शिवसेनेपर्यंतचा प्रवास कसा घडला, याविषयी विचारले असता नीलम गोऱ्हेंनी कथित समाजवाद्यांवर टीका केली. ‘शिवसेनेत येण्याआधी मी स्त्री आधार केंद्राचं काम मी करत होते. पण तिथे आमच्या सरपंच होणाऱ्या मुली किंवा अंगणवाडी सेविकांकडे पाहाण्याची दृष्टी वेगळी होती. आपल्याला उघडपणे उपलब्ध असणाऱ्या एखाद्या ठेव्याप्रमाणे स्त्रियांकडे पाहिलं जात होतं. या आपल्याकडच्या लोकांच्या वैचारिक क्रूरतेचा मला अनुभव आहे. हे अत्यंत असहिष्णु आहेत. त्यांचा स्वत:चा इश्वरावर विश्वास नाही. पण दुसरा कुणी ठेवत असेल, तर त्याची रेवडी उडवण्यासारखे प्रकार ते करतात. एखादी स्त्री एकटी राजकारण करत असेल, तर सगळ्यांनी मिळून तिला घेरण्याचे प्रकार होत असतात. मी तेव्हा राजकारण सोडायला निघाले होते. पण जेव्हा उद्धव ठाकरेंनी शिवसेनेत येण्याचं आमंत्रण दिलं, तेव्हा मी तिथे जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मला पुन्हा एक राजकीय जीवन जगण्याची संधी मिळाली’, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

‘साध्वी प्रज्ञा यांचं वक्तव्य चुकीचंच’

शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केलेलं विधान चुकीच असल्याचं नीलम गोऱ्हे म्हणल्या. ‘करकरे हे देशभक्त होते. त्यांच्याविषयी असं विधान कुणीही करू नये. उद्धव ठाकरेंनी देखील त्यावर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे’, असं त्यांनी सांगितलं. मात्र त्याचवेळी, ‘भाजपनं कुणाला उमेदवारी द्यावी हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे’, असं सांगायला देखील त्या विसरल्या नाहीत.

मित्रपक्षांना मिळणार काय?

दरम्यान, शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून मित्रपक्षांना जागांच्या बाबतीत निराशाच पत्करावी लागली यावर बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंसोबतच्या चर्चेचा दाखला दिला. ‘जानकर, आठवले हे सक्षम नेते आहेत. त्यांची देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंशी जी चर्चा झाली असेल, त्या पद्धतीने त्यांना योग्य ती संधी मिळेल. त्यात विधानसभेच्या निवडणुकांच्या आधी त्यांच्याबद्दलचा योग्य तो निर्णय होईलच. त्यात मुद्दाम टाळण्याचं असं काही नाही. जानकरांची नाराजी फारशी कुठे दिसत नाही. आठवलेंचं जागा आणि पदासाठी काही म्हणणं आहे, जे ते स्वत: केंद्रात मंत्री असल्यामुळे मांडतातच’, असं नीलम गोऱ्हे यावेळी म्हणाल्या.

इव्हीएमविषयी काय म्हणणंय शिवसेनेचं?

इव्हीएम मशिनविषयीच्या आरोपांविषयी प्रतिक्रिया देताना नीलम गोऱ्हेंनी सावध पवित्रा घेतला. ‘इव्हीएम मशिनविषयी जर विरोधकांच्या तक्रारी असतील, तर त्यांनी तसे पुरावे द्यावेत. सुप्रीम कोर्टात दाद मागावी. तशी तर आमची देखील मतपत्रिकेचीच मागणी होती. मात्र, जर केंद्राने संपूर्ण देशासाठी एक पद्धत स्वीकारली असेल, तर तिचा स्वीकार आपण करायला हवा’, असे त्या म्हणाल्या. मात्र त्याचवेळी, धुळे महानगर पालिका निवडणुकीनंतर शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांनी इव्हीममध्ये घोटाळा होत असल्याच्या तक्रारीकडे लक्ष वेधताच ‘त्यांची जी काही तक्रार असेल, ती त्यांनी उद्धव ठाकरेंकडेही करावी’, असं म्हणत त्यांनी वेळ मारून नेली.

Pravin Wadnerehttps://www.mymahanagar.com/author/pravin/
समाजाशी बांधिलकी, बदल घडवण्याची प्रामाणिक इच्छा, त्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी आणि त्याच तयारीचा एक भाग म्हणून माध्यमांमध्ये प्रवेश. लेखनाची आवड, त्यासाठी वाचनाची निवड. सोबतीला फोटोग्राफीचा छंद, जगण्यासाठी अजून काय पाहिजे?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -