घरमुंबईनव्या राजकीय वाटचालीचा एल्गार...

नव्या राजकीय वाटचालीचा एल्गार…

Subscribe

भाजप नेते प्रवीण दरेकर यांचे शिवसेनेला प्रत्युत्तर

शिवसेना बांगलादेशी घुसखोरांना पाठीशी घालत आहे का?                                                        देशहितासाठी असलेल्या मनसेच्या मोर्चाला भाजप पुरस्कृत म्हणू नये, शिवसेनेने भूमिका स्पष्ट न केल्यास तेही बांगलादेशींना पाठिशी घालत असल्याचे चित्र निर्माण होईल’ असे प्रत्युत्तर विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेला दिले आहे. मनसेचा मोर्चा भाजप पुरस्कृत असल्याची टीका शिवसेनेने केली होती.राज ठाकरे देशहितासाठी चांगली भूमिका घेत आहेत. त्यांच्या मोर्चाबाबत प्रचंड उत्साह आहे. भारतात लपलेल्या बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चा आहे, असे म्हणत प्रवीण दरेकरांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचाही उल्लेख केला.

‘शिवसेनेने मूळ हिंदुत्वाचा विचार कमी केला. सत्तेच्या लालसेपोटी काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्यानंतर जी शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता आहे, ती दिसून येते. म्हणूनच राज ठाकरेंच्या मोर्चाबाबत शिवसेना नेते टिप्पणी करत आहेत’ असे दरेकर म्हणाले.‘या मोर्चामुळे शिवसेनेला पोटदुखी होण्याचे काही कारणच नाही. मनसेच्या रॅलीचा उद्देश देशभक्तीने प्रेरित आहे. देशात लपून बसलेल्या घुसखोरांच्या विरोधात आहे. घुसखोरांविरोधात भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका स्पष्ट आहे. भाजपच्या भूमिकेला राज ठाकरेंचे समर्थन असेल, तर शिवसेनेला दुःख होण्याचे कारण नाही’ असे म्हणत दरेकरांनी शिवसेनेवरही निशाणा साधला आहे.

- Advertisement -

आम्ही हिंदुत्व सोडलेले नव्हते – शर्मिला ठाकरे
पाकिस्तान, बांगलादेशातून आलेल्या घुसखोरांना बाहेर काढण्यात यावे या मागणीसाठी मनसेने मोर्चा काढला आहे. या मोर्चापूर्वी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मनसेने भूमिका बदलली का? असा प्रश्न विचारण्यात आला असता, आजच्या मोर्चासंदर्भात जे काही विषय मांडायचे आहेत, ते पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे मांडतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कधीही भूमिका बदलली नाही. आम्ही कधीही हिंदुत्व सोडलेेले नव्हते. रझा अकादमीने केलेल्या हल्ल्यानंतर राज ठाकरे यांनी मोर्चा काढला होता, असे त्या म्हणाल्या. मनसेच्या नव्या झेंड्याविषयीही शर्मिला ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. भाजपाचा भगवा आणि मनसेचाही भगवा? असे विचारले असता त्या म्हणाल्या, मनसेच्या जुन्या झेंड्यातही भगवा होता. भगवा हा छत्रपती शिवाजी महाराज आणि वारकर्‍यांचा आहे, असे स्पष्टीकरण शर्मिला ठाकरे यांनी दिले आहे.

मनसेच्या मोर्चामागे भाजपचा हात शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांचा आरोप
पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात मनसेचा आज महामोर्चा आहे. या मनसेच्या मोर्चामागे भाजपचा हात असून मनसेच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे शिवसेनेला काहीही फरक पडत नाही. भाजपला नेहमीच इतर पक्षांच्या कुबड्या लागतात, अशी टीका शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी केली आहे.

- Advertisement -

नवी मुंबई, औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच हे यांना सुचले आहे. शिवसेनेने भाजपची साथ आता सोडली आहे. त्यामुळे त्यांना आता कुणीतरी सोबत हवे आहे. वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग झाला होता, मात्र तो फेल गेला. आता वंचितही सोबत राहण्यास उत्सुक नाही, याची कल्पना भाजपला आल्याने मनसेला सोबत घेण्याचा प्रयत्न होत आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार वारंवार कृष्णकुंजवर का जात होते, हे आता लक्षात येत आहे. या बैठकांनंतरच हे मोर्चाचे ठरले, असे हळूहळू स्पष्ट होत आहे. या सर्व गोष्टींचा विचार केला तर भाजपचा या मोर्चामागे हात असू शकतो, असे मनिषा कायंदे यांनी म्हटले आहे.

मनसेच्या या मोर्चामुळे शिवसेनेला काहीही फटका बसणार नाही. लोकांना आता कळाले आहे की, बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून लावण्याची भूमिका कुणाची होती. बाळासाहेब ठाकरे यांची ही विचारसरणी आहे, त्याची कॉपी केली जात आहे. मात्र यांना हे आताच का आठवत आहे. मनसेची स्थापना होऊन आता 14 वर्षे झाली आहेत. हे मुद्दे आधी का आठवले नाहीत, असा प्रश्नही मनिषा कायंदे यांनी उपस्थित केला.

मोर्च्याशी संबंध नाही, पण गाड्या आमच्याच भाजप आमदार महेश लांडगे यांचे स्पष्टीकरण                          मनसेच्या मोर्चाकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले असताना पुण्यामध्ये या मोर्चासाठी भोसरी मतदारसंघाचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी मनसे कार्यकर्त्यांना वाहने पुरवल्याचा आरोप आहे. यावर आता महेश लांडगे यांनी स्वत: स्पष्टीकरण देत भाजपचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. माझा वाहतुकीचा व्यवसाय असल्याने कार्यकर्ते माझी वाहने घेऊन गेले असावेत, असे महेश लांडगे यांनी सांगितले.

माझा वाहतुकीचा व्यवसाय आहे. मी कंपन्यांना बस पुरवत असतो. आज रविवार असल्याने त्या गाड्या मनसेच्या कार्यकर्त्यांना दिल्या असतील. त्यामुळे माझी वाहने हे कार्यकर्ते घेऊन गेले असतील.आम्हीसुद्धा भारतीय जनता पक्ष म्हणून सीएए आणि एनआरसी या कायद्याला समर्थन करतो. त्या कार्यक्रमाला जाणारे कार्यकर्ते हे भाजपचे आहेत, की नाही हे मला माहीत नाही. पण, तिथे जाणारा माणूस हा सीएएलाच समर्थन करतोय, देशाच्या हितासाठी देशाच्या बाजूने त्याचे मत व्यक्त करत आहे. मग तो चांगल्याच कार्यक्रमाला गेला आहे. त्या चांगल्या कार्यक्रमासाठी माझ्या ट्रान्सपोर्टच्या गाड्या कुणी वापरत असेल, तर माझी त्याला हरकत नाही. त्या काही भाजपच्या गाड्या नाहीत. तो माझा वैयक्तिक व्यवसाय आहे, असे स्पष्टीकरण भाजप आमदार महेश लांडगे यांनी दिले.

ज्यांचा पक्ष अजित पवार चालवतात त्यांनी आम्हाला शिकवू नये मनसे नेते अविनाश जाधव यांची टीका                मनसेच्या मोर्चाला भाजपची साथ असल्याच्या शिवसेनेच्या टीकेला मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी उत्तर दिले आहे. शिवसेना राज्यात सत्तेत सहभागी आहे, मात्र हे सरकार राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार चालवत आहेत. असेच सुरू राहिले तर काही दिवसांनी शिवसेनादेखील अजित पवारच चालवतील.

आजच्या घडीला मुख्यमंत्री म्हणून जेवढी गर्दी उद्धव ठाकरे यांच्याकडे नसते, त्याहून कित्येक पटीने जास्त गर्दी अजित पवारांकडे असते. त्यामुळे ज्यांचा पक्ष आणि सरकार राष्ट्रवादी चालवते, त्यांनी आम्हाला शिकवू नये की आमचा मोर्चा कोण स्पॉन्सर करत आहे, अशी सडकून टीका अविनाथ जाधव यांनी केली आहे.उद्धव ठाकरेंच्या चुकीच्या राजकीय भूमिकेमुळे तळागळातील शिवसैनिक नाराज आहेत. येणार्‍या काळात शिवसेनेला खिंडार पडेल, असे भाकीत अविनाश जाधव केले आहे.

आम्हाला काहीही फरक पडत नाही मंत्री छगन भुजबळ यांचा टोला
मुंबई l मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मोर्चामागे कोणीही असले तरी काही फरक पडत नाही, असा टोला अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला आहे. याशिवाय बांगलादेश किंवा पाकिस्तानच्या घुसखोरांना हाकलण्याचा कार्यक्रम आजचा नाही तो 20 वर्षांपूर्वीचा आहे, असा दावा छगन भुजबळ यांनी केला. घुसखोरांच्या ट्रेन भरल्या जातात. लोकांना तिकडे उतरवतात. परत ते तिकडून बसतात आणि इकडे येतात. याच्यावर मार्ग काढण्यासाठी भारत सरकारने लक्ष दिले पाहिजे, असे छगन भुजबळ म्हणाले.

लोकशाहीमध्ये आपले मत मांडण्याचा आणि मोर्चा काढण्याचा सगळ्यांना हक्क आहे. मुंबईतील मोर्चामागे कुणीही असलं तरी काही फरक पडत नाही. लोकशाहीमध्ये सगळ्यांना इकडून तिकडे, तिकडून इकडे जाण्याचा अधिकार आहे, पण आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असा चिमटा छगन भुजबळ यांनी काढला.

…तर राज ठाकरेंच्या मोर्चाला समर्थन स्वाभिमानीच्या राजू शेट्टी यांचे वक्तव्य
मुंबई l मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पुकारलेल्या मोर्चाची मागणी बाहेरच्या देशातील घुसखोरांना हाकलून द्या एवढीच असेल, तर आमचा राज ठाकरे यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे, असे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. बाहेरच्या देशातून जे घुसखोर येतात त्याचे समर्थन कुणीही करणार नाही. आम्हीही करत नाही. त्यामुळे बाहेरच्या घुसखोरांना हुसकाऊन लावा इतकी राज ठाकरेच्या मोर्चाची मागणी असेल, तर आमचा त्याला पाठिंबा आहे. परंतु, केंद्र सरकार आज नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि एनपीआरच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरत आहे. सीएए हा तर सरळसरळ संविधानाच्या विरोधातील कायदा आहे.
संविधानाने या देशात जात, धर्म, लिंग आणि पंथ या आधारावर कोणत्याही व्यक्तीसोबत भेदभाव केला जाणार नाही, असे आश्वासन दिले आहे. सीएए कायदा या आश्वासनाला हरताळ फासणारा आहे. एनआरसीमध्ये जवळपास 40 टक्के लोकांना आपला जन्माचा पुरावाच देणे अशक्य आहे, असेही राजू शेट्टी यांनी नमूद केले.

मोर्चानंतर राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार – अभिजीत पानसे
मनसेच्या मोर्चानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भाषण झाले. आता या मोर्चानंतर राज ठाकरे यांचे पुढचे धोरण काय असणार? याबाबत मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे म्हटले आहे.
कालच्या मोर्चानंतर याच आठवड्यात राज ठाकरे महाराष्ट्राच्या विविध भागांचा दौरा करतील. हे भगवे वादळ फक्त मुंबईपुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाले आहे. अनेकजण मनसेत प्रवेशासाठी इच्छुक आहेत. मोठमोठ्या नेत्यांचा मनसेत प्रवेश होत आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राचे नेतृत्व राज ठाकरेंच्या हातात असेल, असा दावा अभिजीत पानसे यांनी केला.

केवळ झेंडा बदलला म्हणून आम्ही हिंदू झालो हे चुकीचे आहे. हिंदूत्व आमचा अजेंडा नव्हता, अशातील काही भाग नाही. हिंदू सणांवर जेव्हा जेव्हा संक्रांत आली तेव्हा मनसे उभी राहिली. दहिहंडीवर बंदी आली, गणेश मंडपांवर बंदी आली त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने बंदी घालूनसुद्धा एकमेव माणूस उभा राहिला तो म्हणजे राज ठाकरे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार दहिहंडी उत्सव साजरा केला. झेंडा बदलला म्हणून भूमिका बदलली नाही, असे अभिजीत पानसे यांनी स्पष्ट केले. मोर्चाला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. लोक हिंदू जिमखान्यापासून आझाद मैदानापर्यंत चालत आले. हा प्रतिसाद राज ठाकरे यांच्या भूमिकेला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आहे. त्यामुळे आम्ही समाधानी आहोत, असेदेखील अभिजीत पानसे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -