माहिममध्ये माय-लेकींची हत्या करुन मृतदेह जाळले

पोलिसांनी बिल्डिंगमधील सीसीटीव्ही फूटेज तपासत आहेत. दरम्यान, मारेकरी हा परिचित असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

प्रातिनिधिक फोटो

मुंबईमध्ये दुहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. माहिमच्या शाहूनगरमध्ये माय-लेकींची गळा चिरुन निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आरोपीने ऐवढ्यावरचं न थांबता दोघींचा मृतदेह पेटवून दिला. घरामधून धूर निघत असल्यामुळे हा संपूर्ण प्रकार उघड झाला. शाहूनगरच्या डायमंड सोसायटीमध्ये राहणाऱ्या इलियास सय्यद यांच्या पत्नी आणि मुलीची हत्या करण्यात आली आहे. आज सकाळी ही घटना घडली आहे. तेहसील इलियास सय्यद (३० वर्ष) आणि आलिया फातिमा हुसेन सय्यद (३ वर्ष) या दोघींची हत्या करण्यात आली.

अशी घडली घटना 

इलियास सय्यद हे पत्नी आणि दोन मुलींसोबत डायमंय बिल्डिंगच्या १० व्या मजल्यावर राहत होते. इलियास नेहमीप्रमाणे सकाळी ९ वाजता कामाला निघून गेले. त्यांची मोठी मुलगी शाळेमध्ये गेली होती. घरामध्ये तेहसील आणि तीन वर्षाची आलिया होती. इलियास यांच्या घरामधून धूर बाहेर येत असल्याचे शेजारच्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी घराचा दरवाजा वाजवला मात्र तेहसीलने दरवाजा उघडला नाही. दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे शेजारच्यांनी ताबडतोब इलियास यांना फोन केला आणि त्याला बोलावून घेतले. इलियास घरी धाव घेत त्याच्याकडे असलेल्या चावीने दरवाजा खोलला. तर घरामध्ये खूर धूर होता. त्याने किचनमध्ये जाऊन पाहिले तर रक्ताच्या थारोळ्यात त्याची पत्नी आणि मुलगी दिसली. दोघींची गळा चिरून हत्या करुन नंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

आरोपींचा शोध सुरु

इलियास यांनी ताबडतोब शाहूनगर पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघींची मृतदेह ताब्यात घेऊन ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. पोलिसांनी बिल्डिंगमधील सीसीटीव्ही फूटेज तपासत आहेत. दरम्यान, मारेकरी हा परिचित असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी इलियासच्या कुटुंबिय आणि नातेवाईकांची चौकशी सुरु केली आहे.