घरमुंबईएमपीएससी परीक्षा पुढे ढकलली

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली

Subscribe

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

येत्या ११ एप्रिल २०२१ रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेबाबत निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील, जलसिंचन मंत्री जयंत पाटील यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. या बैठकीत रविवारी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

राज्यभरात एमपीएससीची परीक्षा देणार्‍या काही विद्यार्थ्यांना कोरोना संसर्ग झाला आहे. तसेच विकेंड लॉकडाऊनमुळे परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचणी जाणवत होत्या. त्यामुळे एमपीएससी परीक्षा देणार्‍या अनेक विद्यार्थ्यांनी येत्या रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी रविवारी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब परीक्षा पुढे ढकलली आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील एमपीएससी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

दरम्यान एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली होती. दरम्यान मंत्रिमंडळातील नेते जितेंद्र आव्हाड, रोहित पवारांसह काही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी योग्य नियोजन करत परीक्षा घ्याव्यात आणि आत्ता घोषित केलेल्या परीक्षांच्या तारखेबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी केली होती. त्यामुळे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली आहे.

या परीक्षा पुढे ढकलण्यासाठी एमपीएसी समन्वय समिती, महाराष्ट्र या संघटना आणि प्रातिनिधीक स्वरुपात सोलापूर, अहमदनगर, सातारा, हिंगोली, यवतमाळ, मुंबई, पुणे, लातूर, नागपूर, कोल्हापूर यासह राज्यभरातील विविध शहरातील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसेप्रमुख राज ठाकरे यांना पत्र लिहून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह सर्व नेत्यांनी याला योग्य प्रतिसाद देत परीक्षा रद्द केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -