वीज चोरी पकडण्यासाठी गेलेल्या सहाय्यक अभियंताला मारहाण

वीज चोरी पकडण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या सहाय्यक अभियंताला मारहाण केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे.

वीज चोरी पकडण्यासाठी गेलेल्या सहाय्यक अभियंताला मारहाण

वीज चोरी पकडण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या अभियंत्याला विज चोराने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरमध्ये घडला आहे. उल्हासनगर कॅम्प नंबर ३ च्या ३० सेक्शन भागात महावितरणच्या वीज चोरी पकडणाऱ्या भरारी पथकाकडून तपासणी सुरू होती. यावेळी बंटी बजाज यांच्या घरातील वीज चोरी या भरारी पथकाने पकडली. त्याच दरम्यान, बजाज यांच्यावर कारवाई सुरू असताना बंटी बजाज आणि त्याचे वडील अमरलाल कारवाई करणारे सहाय्यक अभियंता सोलोमन तलारी आणि वरिष्ठ तंत्रज्ञ दिलीप राजू भिल या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घडना घडली आहे.

नेमके काय घडले?

दरम्यान, घटनेनंतर व्यापाऱ्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठत महावितरणच्या अभियंत्यांच्या सांगण्यावरुन गुन्हा दाखल करू नये, यासाठी दबाव टाकला. मात्र, महावितरणच्या कर्मचारी संघटनेने पोलिसांवर दबाव टाकल्यानंतर अभियंत्यांच्या तक्रारीनंतर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात बजाज पिता पुत्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहाय्यक अभियंता सोलोमन तलारी यांनी सांगितले की, यापूर्वी ही बजाज यांची ८९ हजाराची विज चोरी पकडली होती. त्यांच्या मीटर मधून बायपास करून वीज दिली जात होती. हे सकाळी प्राथमिक तपासात दिसून आले. त्यांच्या बंगल्यात वातानुकूलित यंत्रणा असल्याने जवळपास ५ लाखांची वीज चोरी झाल्याची शक्यता असून त्याची गणना सुरू आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी सांगितले की, यापूर्वी ही बजाज कुटुंबीयांवर वीज चोरीचा गुन्हा दाखल आहे. ते आक्रमक आहेत, याची माहिती महावितरणच्या कर्मचाऱ्यांना होती. ते पोलीस घेऊन गेले असते तर घटना टळली असती.


हेही वाचा – वैद्यकीय चाचण्यांसाठी खासगी लॅबमध्ये पाठवाल तर कारवाई होणार