घरताज्या घडामोडीबीएमसीतही बदल्यांसाठी तोडपाणी, आयुक्तांनी चौकशी आणि कारवाई करावी - रईस शेख

बीएमसीतही बदल्यांसाठी तोडपाणी, आयुक्तांनी चौकशी आणि कारवाई करावी – रईस शेख

Subscribe

मुंबई पोलीस खात्यात बदल्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार होतात. तसेच, मुंबई महापालिकेत विशेषतः नगर अभियंता खात्यात अभियंत्यांच्या बदलीसाठी मोठ्या प्रमाणात तोडपाणी होते. या विभागात मोठे रॅकेट सुरू आहे. एवढेच नव्हे तर सहाय्यक आयुक्त यांच्या बदल्यांसाठीही गैरव्यवहार होतो. सहाय्यक आयुक्तांच्या बदल्यांची सूत्रे ‘वर्षा’ बंगल्यावरून हलविण्यात येतात, असे गंभीर आरोप महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे गटनेते आणि आमदार रईस शेख यांनी केला आहे. त्यामुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. या आरोपांचे गंभीर पडसाद राजकीय वर्तुळात उमटण्याची आणि त्याचे विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई आणि महाराष्ट्रात सध्या पोलीस दलातील बदल्यांसाठी मंत्र्यांकडून तोडपाणी होत असल्याचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. तेच सुत्र धरून समाजवादी पक्षाचे गटनेते व आमदार रईस शेख यांनी, कमला मिलमधील आगीच्या प्रकरणात १४ लोकांचा बळी गेला या प्रकरणाला जबाबदार दोषी अधिकारी एम. जी. शेलार (पदनिर्देशित अधिकारी), दिनेश महाले (दुय्यम अभियंता), धरमराज शिंदे (कनिष्ठ अभियंता) यांच्यावर सक्त कारवाई करून त्यांना सेवेमधून कमी करण्याचे आदेश तत्कालीन आयुक्त अजोय मेहता यांनी संबंधित खात्याला लेखी आदेश दिल्यानंतरही त्या अधिकाऱ्यांना कोरोना संसर्गाच्या नावाखाली नगर अभियंता खात्याने पुन्हा सेवेत घेतले आहे. त्यामुळे या नगर अभियंता खात्यात बदली करण्याचे व बदली रोखण्याचे मोठे रॅकेट सुरू आहे, असा आरोप रईस शेख यांनी केला आहे.

- Advertisement -

नगर अभियंता खात्यात अनेक अधिकारी, अभियंते हे सेटिंग लावून, पैसे देऊन अनेक वर्षे एकाच पदावर ठाण मांडून बसले आहेत. तर काही प्रामाणिक अधिकारी व अभियंते हे पैसे देऊ शकत नसल्याने त्यांच्या बदल्या दुसऱ्या खात्यात करण्यात येत आहेत नगर अभियंता खात्यातील क्लर्क अभियंत्यांच्या बदल्या करणे व त्या रोखणे यासाठी पैसे घेत असल्याचा आरोप रईस शेख यांनी केला आहे.

एवढेच नव्हे तर काही वार्ड अधिकारी म्हणजे सहाय्यक आयुक्त यांच्या बदल्या रखडल्या आहेत. त्यांना विद्यमान आयुक्त चहल हे वर्षावर पाठवतात. त्यांच्या बदल्यांचे निर्णय तेथून घेण्यात येतात. ज्यांचे पालिकेत वर्चस्व आहे ‘ते’ याबाबतचे निर्णय घेतात, असा खळबळजनक आरोप रईस शेख यांनी केला आहे.

- Advertisement -

वास्तविक, पालिकेत बदल्यांबाबतचे कोणतेही धोरण नाही. त्यामुळे एखादा अधिकारी वर्षनुवर्षे एकाच पदावर आहे तर अनेक अधिकारी पैसे न देऊ शकल्याने दुसऱ्या खात्यात तीन वर्षांच्या आत बदली होऊन पाठवले जातात. काही अभियंत्यांनी माझ्याकडे तशा तक्रारी केल्याचे त्यांनी सांगितले.

वास्तविक, कमला मिल प्रकरणातील दोषी अधिकारी पुन्हा सेवेत आलेच कसे, त्यांना कोणी सेवेत घेतले व कोणाच्या दबावाने याबाबत सखोल चौकशी व्हायला पाहिजे.अन्यथा कमला मिल व भांडुप येथील ड्रीम्स मॉल व सनराईज रुग्णालय दुर्घटना घडतात, असा आरोपही रईस शेख यांनी केला. आयुक्तांनी , या सर्व गंभीर प्रकरणाची दखल घेऊन चौकशी करावी व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी रईस शेख यांनी केली आहे. जर या गंभीर प्रकरणाची दखल घेतली नाही व कारवाई केली नाही तर पालिकेतील बदल्यांची प्रकरणे व त्यामागील गैरव्यवहार बाहेर येऊन त्यात पालिकेची मोठी बदनामी होईल, असे रईस शेख यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – वरळीकरांसाठी ३७५ रुग्णशय्यांचे कोविड केंद्र ; आदित्य ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -