मुंबईत समूह संसर्ग ओळखण्यासाठी आता ‘सेरो सर्वेक्षण’

मुंबईत समूह संसर्ग ओळखण्यासाठी आता 'सेरो सर्वेक्षण' केले जाणार आहे. याकरता रक्ताचे नमुने घेतले जाणार आहेत.

mumbai coronavirus patient blood test sero survey
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई, दिल्लीसह देशातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. तसेच या शहरांमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे मुंबईत समूह संसर्ग झाला आहे की, नाही हे ओळखण्यासाठी रक्ताचे नमूने तपासून सेरो सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यााठी पालिकेने चेंबूर, शीव, माटुंगा, वडाळा आणि दहिसर या भागांची निवड केली आहे. या भागांतील १२ वर्षांवरील रहिवाशांचे रक्ताचे नमुने घेतले जाणार असून निती आयोग, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंडल रिसर्च (टीआयएफआर) आणि इतर संस्था हे सर्वेक्षण करणार आहे.

रक्ताचे नमुने तपासणारे सेरो सर्वेक्षण

देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. देशात कोरोना रुग्णांचा आकडा पाच लाखांच्या पुढे गेला आहे. तर सर्वात जास्त कोरोनाबाधितांची संख्या ही महाराष्ट्र आणि मुंबईत आढळून आली आहे. या पार्श्वभूमीवर देशात कोरोना समूह संसर्ग झाला आहे की नाही याची खात्री करण्यासाठी रक्ताचे नमुने तपासणारे सेरो सर्वेक्षण करावे, अशा सूचना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने सर्व राज्यांना केली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील तीन भागांची निवड करुन हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या आधी पहिल्या टप्प्यात मुंबईत ५०० जणांचे सेरो सर्वेक्षण करण्यात आले आहे.

असे केले जाणार सर्वेक्षण!

  • तीन विभागांतील झोपडपट्टी परिसर वगळून इतर भागांतून १० हजार रहिवाशांच्या रक्ताचे नमुने घेतले जाणार आहेत.
  • आरोग्य अधिकारी आणि बिगर शासकीय संस्था यांचे पथक स्थानिक नगरसेवकांच्या साहाय्याने निवडक घरांना भेटी देऊन सर्वेक्षणात सहभागी होणाऱ्यांची नावे निश्चित करतील.
  • ही पथके रहिवाशांच्या घरी भेटी देऊन मूलभूत माहिती, संपर्कातील व्यक्तींचा इतिहास आणि इतर आजार यांची माहिती घेतील.
  • सर्वेक्षणात निवडक सोसायट्या आणि त्यातील निवडक रहिवाशांची निवड केली जाईल. निवडलेल्या व्यक्तींच्या मर्जीने त्यांच्या रक्ताचे नमुने घेतले जातील.
  • मुंबईतील कस्तुरबा आणि फरिदाबाद येथील ट्रॉन्सलेशन स्वास्थ्य विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था यांच्या लॅबमध्ये रक्ताचे नमुने तपासले जातील. त्यात अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत की, नाहीत ते तपासले जाईल.
  • अँटीबॉडीज तयार होणे हे कोरोना झाल्याचे लक्षण आहे.
  • हे सर्वेक्षण होत असलेल्या विभागांमध्ये आरोग्य कर्मचारी आणि इतर आघाडीच्या फळीतील कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र सर्वेक्षण घेतले जाईल.
  • सर्वेक्षणामुळे संसर्गाची बाधा, संसर्गाचा प्रसार लोकांमध्ये कशा प्रकारे झाला याची माहिती मिळू शकणार आहे.

    हेही वाचा – कोरोना मुक्तीसाठी पंढरीच्या पांडुरंगाला गृहमंत्र्यांचं साकडं