घरदेश-विदेशमुंबई- दिल्ली द्रुतगती महामार्ग लवकरच - नितीन गडकरी

मुंबई- दिल्ली द्रुतगती महामार्ग लवकरच – नितीन गडकरी

Subscribe

मुंबई- ते दिल्ली अशा ऐतिहासिक द्रुतगती महामार्गाचे काम हाती घेतले असून, यासाठी १ लाख कोटी रुपये खर्च येईल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी यावेळी दिली.

‘मुंबई आणि महानगर क्षेत्रातील वाढत्या वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी आगामी काळात जलवाहतुकीवर भर देण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात यासंदर्भातील एक विस्तृत जल वाहतूक आराखड्यास मंजुरीची प्रक्रिया पार पडणार आहे’, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग ८४८ वरील वडपे ते ठाणे या सुमारे २३ किमी रस्त्याचे आठ पदरीकरण आणि शहापूर ते खोपोली या ९१ किमी रस्त्याचे चार पदरीकरण करण्याच्या कामाचे ई भूमिपूजन, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. नितीन गडकरी यांनी ‘बुलेट ट्रेनच्या तोडीस तोड असा १ लाख कोटी रुपये खर्चाचा आणि १२ तासांत मुंबई ते दिल्ली अंतर कापणाऱ्या भव्य द्रुतगती महामार्गाचे काम लवकरच सुरु होत आहे’, असे सांगितले. ठाणे जिल्ह्यातील ८ जेट्टींच्या कामांसाठी १०० कोटीस मंजुरी दिल्याची घोषणाही त्यांनी केली. हा पायाभरणी सोहळा भिवंडीनजीक दिवे अंजूर गाव येथे पार पडला.

रस्ते विकासात महाराष्ट्र अग्रगण्य

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘२०१४ पर्यंत महाराष्ट्रात केवळ ५ हजार किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग होते. २०१४ ते २०१९ या कालावधीत केवळ नव्याने मान्यता दिलेल्या महामार्गांची लांबी २० हजार किमी असून नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली  ७ हजार किमी लांबीचे महामार्ग पूर्ण झाले आहे.’ याशिवाय ‘समृद्धी द्रुतगती महामार्ग तसेच त्याला येऊन मिळणारे हे नवे राष्ट्रीय महामार्ग यामुळे किमान २४ जिल्ह्यांचा झपाट्याने विकास होईल आणि महाराष्ट्र हे रस्त्याच्या विकासात देशातील अग्रगण्य राज्य बनेल’, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

- Advertisement -

मुंबई-दिल्ली ऐतिहासिक महामार्ग

कार्यक्रमादरम्यान नितीन गडकरी म्हणाले की, ‘मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचे काम मी मंत्री असतांना झाले होते. आता आम्ही मुंबई- ते दिल्ली अशा ऐतिहासिक द्रुतगती महामार्गाचे काम हाती घेतले असून यासाठी १ लाख कोटी रुपये खर्च येईल. हा १२ पदरी महामार्ग असणार आहे. गुडगाव-जयपूर-सवाई माधोपुर—अलवार-रतलाम-वडोदरा- आणि मुंबई असा हा मार्ग असून भिवंडीतून देखील जाणार आहे. त्यामुळे निश्चितच याचा फायदा या भागातील नागरिकांना होईल.’ याशिवाय ‘वडोदरा ते मुंबई या टप्प्यासाठी ४४ हजार कोटींच्या निविदेसही मंजुरी मिळाली असून खऱ्या अर्थाने देशाचे ग्रोथ इंजिन राहणार आहे’, अशी माहितीही नितीन गडकरी यांनी दिली.

जलवाहतुकीबाबत राज्याने धोरण ठरवावे

जलवाहतुकीच्या मुद्द्यावर बोलताना गडकरी म्हणाले की,  ‘मुंबई आणि परिसरातील बेटांमधून मोठ्या प्रमाणावर जल वाहतूक सुरु झाली पाहिजे. विमानतळावर फाच्ण्यासाठी देखील वॉटर वे (जलमार्ग) विकसित केले पाहिजेत. नुकतीच आम्ही औरंगाबादेत एअर बसची चाचणी घेतली आहे. ठाणे –भिवंडी मार्गावरही  डबल डेकर एअर बस चालविण्याबाबत नियोजन करावे लागेल.’ याशिवाय ‘यमुनेतून आग्रा ते दिल्ली अशा जलमार्गाने एअर बोट चालविण्याची चाचणी आम्ही घेतली आहे. यासाठी सुमारे ८० किमी प्रतितास वेगाने जाणाऱ्या बोटींचा मुंबईसाठी उपयोग करता येईल.’ दरम्यान, ‘जलवाहतुकीबाबत राज्याने स्वतंत्र धोरण ठरवावे त्यात जेएनपीटी देखील आपले योगदान देईल’, असेही गडकरी आपल्या भाषणात म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -