घरमहाराष्ट्रमुंबईतील केमिकल हल्ल्यांसाठी, आखाती देशांची मदत

मुंबईतील केमिकल हल्ल्यांसाठी, आखाती देशांची मदत

Subscribe

अटक करण्यात आलेल्यांपैकी एक दाऊद गँगचा शार्प शूटरचा मुलगा असून, त्याच्या बँक खात्यात आखाती देशातील काही रक्कम आली असल्याचे उघडकीस आले आहे.

मुंबईसह राज्यात विषारी रासायनिक हल्ल्या करण्यासाठी आखाती देशातून आर्थिक मदत आली असल्याचे तपासात समोर येत आहे. एटीएसने अटक केलेल्या दाऊद गँगचा शार्प शूटर रशीद मलबारी यांचा मुलगा मजहर याच्या बँक खात्यावर ही आर्थिक मदत पाठवण्यात आली असल्याचे समजते. मात्र, ही आर्थिक मदत नक्की कोणी आणि कशासाठी पाठवली या बाबत चौकशी सुरू आहे. दरम्यान, एटीएसच्या पथकाने बुधवारी रात्री उशिरा औरंगाबाद येथून आणखी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस)औरंगाबाद येथील कैसर कॉलनी आणि मुंब्रा कौसा येथून ९ जणांना अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या ९ जणांमध्ये एक अल्पवयीन आहे. दरम्यान एटीएसच्या पथकाने औरंगाबाद आणि मुंब्रा येथील मोठ्या प्रमाणात विषारी रासायनिक द्रव आणि पावडर हस्तगत केली होती.  या ९ जणांमध्ये दोघेजण केमिकल इंजिनीयर असून एक जण फार्मसी आहे. अटक करण्यात आलेल्या या ९ ही जण इस्लामिक स्टेट (इसिस) या संघटनेसाठी काम करीत असल्याचे उघडकीस आले आहे.


वाचा: प्रियांका गांधींच्या राजकारण प्रवेशावर, अमृता फडणवीस म्हणाल्या…

मुंबई तसेच राज्यातील महत्वाच्या शहरात होणारे मोठे कार्यक्रम, राजकीय सभा आणि शहरातील जलकुंभ या ठिकाणी पाण्यात आणि अन्नातून विषप्रयोग करण्याची जवाबदारी या केमिकल मॉड्युलवर सोपवण्यात आली होती, अशी माहिती तपासत समोर आली आहे. त्या अनुषंगाने या केमिकल मॉड्युलकडून औरंगाबाद आणि मुंब्रा या ठिकाणी वेगवेगळे प्रयोग करण्यात येत होते. दरम्यान, या सर्व कृत्यासाठी आर्थिक पुरवठा आखाती देशातून होत असल्याची माहिती पुढे आली आहे. एटीएसने अटक करण्यात आलेल्यांची बँक खाते गोठवली आहेत. दरम्यान, अटक करण्यात आलेल्यांपैकी एक  दाऊद गँगचा शार्प शूटर रशीद मलबारी याचा मुलगा असून, त्याच्या बँक खात्यात आखाती देशातील काही रक्कम आली असल्याचे उघडकीस आले आहे. घातपाती कृत्यासाठी ही आर्थिक मदत आली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसंच यामध्ये अंडरवर्ल्ड कनेक्शन असण्याची शक्यता देखील नाकारता येत नसल्याचे, सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, एटीएसच्या पथकाने औरंगाबाद येथील बायजीपुरा परिसरातून आणखी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -