घरमुंबईदेशातील सर्वोत्तम शिक्षण संस्थांच्या यादीत मुंबई विद्यापीठ

देशातील सर्वोत्तम शिक्षण संस्थांच्या यादीत मुंबई विद्यापीठ

Subscribe

क्यूएसच्या अहवालानुसार, मुंबई विद्यापीठाने गेल्या पाच वर्षात भरीव कामगिरी केली आहे.

क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार राज्यातील पारंपारिक विद्यापीठाच्या यादीत मुंबई विद्यापीठ प्रथम क्रमांकावर पोहचले आहे. देशातील सर्वोत्तम शिक्षण संस्थाच्या यादीत मुंबई विद्यापीठाची मोहोर उमटली असून देशातील पारंपारिक विद्यापीठात ४ थ्या क्रमांकावर आहे. क्वाकरेली सायमंड (क्यूएस) यांनी देशातील सर्वोत्तम शिक्षण संस्थांची यादी जाहीर केली असून या यादीमध्ये मुंबई विद्यापीठाची कामगिरी सर्वोत्तम आहे.

पाच वर्षात भरीव कामगिरी

क्यूएसच्या अहवालानुसार, मुंबई विद्यापीठाने गेल्या पाच वर्षात भरीव कामगिरी केली आहे. मुंबई विद्यापीठाने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सामंजस्य करार करत अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम सुरु केले आहेत. खेळ आणि सांस्कृतिक क्षेत्रातही मुंबई विद्यापीठाची कामगिरी अतुलनीय आहे. गेल्या पाच वर्षात विद्यापीठात १०४ टक्क्यांनी पदवी आणि ११२ टक्क्यांनी पदव्युत्तर विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. तर दूरस्थ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत १४७ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. एवढच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या जर्नल्समध्ये १५६ टक्क्यांनी संशोधन पेपर्समध्ये वाढ झाली आहे.

- Advertisement -

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त प्राध्यापक

विद्यापीठाच्या १२ विभागांना अनेक राष्ट्रीय स्तरावरच्या कार्यक्रमात मान्यता मिळाली आहे. विद्यापीठाशी सलंग्नित असलेले ८० हून अधिक प्राध्यापक हे विविध व्यावसायिक कार्यकारणीवर कार्यरत आहेत. तर गेल्या पाच वर्षात १८ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने येथील प्राध्यापकांना गौरविण्यात आल्याचेही अहवालात सांगण्यात आले आहे. देशाची ज्ञानविषयक गौरवशाली परंपरा आणि वाढता सामाजिक-आर्थिक प्रभाव पाहता मुंबई विद्यापीठाने ज्ञानदानाच्या या पवित्र कार्यात आपला मोलाचा ठसा उमटवला आहे.

मुंबई विद्यापीठाने गुणवत्ता दिली

मुंबई विद्यापीठाने समाजाचे बौद्धिक आणि नैतिक शक्तिस्थान म्हणून गेल्या १६२ वर्षांत भरीव कामगिरी केली आहे. सामाजिक मूल्य आणि संधींची सतत वाढणारी जबाबदारी उत्साहाने वागवत देशाला विशेषतः महाराष्ट्र आणि मुंबई शहराला उत्तम गुणवत्ता दिली आहे.

- Advertisement -

पारंपारिक शिक्षणाबरोबर व्यवसायाभिमुख शिक्षण

मुंबई विद्यापीठाच्या ७९१ सलंग्नित महाविद्यालयातून जवळपास सात लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पारंपारिक शिक्षणाबरोबर व्यवसायाभिमूख शिक्षणाची कास धरणाऱ्या मुंबई विद्यापीठाने व्यवसायाभिमूख अभ्यासक्रम, नाविण्यपूर्ण शिक्षणक्रम,आदर्श महाविद्यालये सुरु केले आहेत. तर विद्यापीठाच्या उपकेंद्रामध्ये रोजगाराभिमूख अभ्यासक्रमाबरोबरच पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम सुरु केले आहेत. सिंधूदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, कल्याण, मुंबई, आणि मुंबई उपनगर या ठिकाणी मुंबई विद्यापीठामार्फत विविध शिक्षणक्रम चालविले जातात.

विद्यापीठातील सर्व घटकांनी संशोधन आणि विकासाच्या प्रक्रियेत केलेल्या विशेष आणि शाश्वत प्रयत्नांचे हे फळ आहे. या निकालाचे समाधान असून भविष्यात रँकिंगमध्ये अधिक सुधारणा करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील राहील. प्रामुख्याने विद्यापीठ कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा सायन्स, केमिकल टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्र करित आहे. विकासाची कास धरणारे मुंबई विद्यापीठ हे समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी सतत प्रयत्नशील असणार आहे. 
प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरु, मुंबई विद्यापीठ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -