घरमुंबईविहार तलाव भरला; मात्र मुंबईकरांच्या उरात भरली धडकी

विहार तलाव भरला; मात्र मुंबईकरांच्या उरात भरली धडकी

Subscribe

विहार तलाव ओसंडून वाहू लागला आहे. त्यामुळे या तलावाचे पाणी मिठी नदीच्या पात्रात सोडण्यात येणार आहे. मात्र, पुढच्या काही तासांमध्ये मुसळधार पाऊस पडला तर मिठी नदी धोक्याची पातळी गाठू शकते.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणी साठ्यांमध्ये लक्षणीय वाढ होत असून सध्या या सर्व तलावांमधील पाण्याचा साठा ८५.६८ टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र, या एकामागोमाग सर्व तलाव आता ओसंडून वाहू लागली आहेत. मुंबईतील विहार तलावही आता भरला आहे. त्यामुळे हा तलावही आता ओसंडून वाहू लागला आहे. पाण्याच्या पातळीत आणखी वाढ झाली तर तालावाचे गेट उघडावे लागणार आहे. तसे झाल्यास या विहार तलावातील पाणी मिठी नदीच्या पात्रात सोडले जाणार आहे. दरम्यान, मिठी नदीच्या आसपासच्या भागांमध्ये मुसळधार पावसात धोक्याची घंटा आहे. मुसळधार पाऊस, समुद्राची भरती असतानाच विहारचे पाणी सोडल्यास मिठी नदी धोक्याची पातळी गाठून अनेक भाग पाण्यात जाण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे विहार भरणार असल्याचा आनंद असला तरी मुंबईकरांच्या उरात ही धडकी भरणारी आहे.

मुंबईत ८५.६८ टक्के पाणीसाठा जमा

मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी आदी तलावांमध्ये मंगळवारी ३१ जुलै रोजी १२ लाख ४० हजार १२२ दशलक्ष लिटर्स एवढा पाणी साठा जमा झाला आहे. मुंबईला वर्षभरासाठी एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर्स एवढा पाणी साठा अपेक्षित असतो. त्यातुलनेत हा पाणी ८५.६८ टक्के एवढा जमा झाला आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे जुनच्या शेवटच्या आठवड्यात हजेरी लावलेल्या पावसाने अवघ्या एकाच महिन्यात मागील दोन वर्षांतील पाण्याची पातळींशी बरोबरी केली आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात सर्व तलावांमध्ये केवळ ७ टक्के एवढाच पाणी साठा होता. २०१८ आणि २०१७ मध्ये ३१ जुलैपर्यंत अनुक्रमे ८३.३० टक्के आणि ८६.४४ टक्के एवढा पाणी साठा जमा झाला होता. त्या तुलनेत सर्व तलावांमध्ये पाणी साठा ८५.६८ टक्के एवढा जमा झाला आहे. आतापर्यंत तुळशी, तानसा, मोडकसारग या तलावांपाठोपाठ भातसा आणि मध्य वैतरणा आदी तलावांमधील पाण्याची पातळी काठोकाठ आल्याने त्यांचे काही गेट खुले करण्यात आले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – मागील दोन वर्षांच्या तुलनेत तलावांच्या पाण्याची पातळी वाढली

- Advertisement -

याशिवाय कुर्ला आदी भागांना पाणी पुरवठा करणारा विहार तलावही भरला आहे. विहार तलावामध्ये एकूण २७ हजार ६९८ दशलक्ष लिटर्स एवढा पाणी साठा असतो. त्यातुलनेत या तलावात पाणीसाठा २७ हजार ३४९ दशलक्ष लिटर्स एवढा जमा झाला आहे. त्यामुळे मुंबईतील मुसळधार पावसाचा विचार करता विहार ओसंडून भरल्यानंतर त्यांचे पाणी सोडावे लागणार आहे. सोडले जाणारे हे पाणी मिठी नदीतून वाहून जाणार असल्याने या नदीची धोक्याची पातळी गाठली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -