घरमुंबईमुंब्य्रात चोरांनी केली नोकराची हत्या

मुंब्य्रात चोरांनी केली नोकराची हत्या

Subscribe

मुंब्य्रात मंगळवारी रात्री तमन्ना ट्रेडिंग कंपनीच्या दुकानात झोपी गेलेल्या नोकराला अज्ञातांनी मारहाण केली. या मारहाणीत नोकराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मुंब्रा येथील अमृतनगर परिसरातील तमन्ना ट्रेडिंग या कंपनीच्या दुकानातील नोकराची निर्घृणपणे हत्या करून दीड लाखाची रोकड आणि २ हजार रूपयांचे सुटे पैसे चोरून नेल्याची धक्कादायक घटना आज उजेडात आली. नुरी हरीश (वय ३५) असे मृत नोकराचे नाव असून, तो उत्तरप्रदेशमधील बस्ती जिल्ह्यातील रहिवासी होता. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुंब्रा परिसरातील अमृत नगर परिसर हा संवेदनशील मानला जातो. या परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी ४ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. यापैकी तमन्ना ट्रेडिंग कंपनीसमोरील सीसीटीव्ही बंद होता. अन्यथा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी कैद झाला असता. त्यामुळे इतर आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरा तपासणीचे काम सुरू आहे.

दिड लाखांची रोकड लंपास

मुंब्रा अमृतनगर परिसरातील तमन्ना ट्रेडिंग या दुकानात लोखंडी मालाची विक्री केली जाते. नुरी या दुकानात कामाला होता. दुकानात असलेले लोखंडी अँगलमुळे दुकानांचे शटर बंद करण्यात आले नव्हते. काल मंगळवारी मालकाने दिड लाखाची रोकड भिवंडीतील व्यापाऱ्याला देण्यासाठी नुरीकडे दिली होती. त्याने ही रोकड दुकानातील लॉकरमध्ये लॉक करून ठेवली आणि धाब्यावर जेवण्यासाठी निघून गेला. रात्री उशिरा दुकानात परतल्यानंतर तो दुकानात झोपी गेला. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास मारेकऱ्यांनी नुरीला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून हत्या केली. त्याच्याकडून दिड लाख रुपयांची रोकड आणि दोन हजाराचे सुटे पैसे घेऊन पळ काढला. आज सकाळी ८.३०च्या सुमारास दुसरा नोकर दुकान उघडण्यासाठी आला असता नुरी याची हत्या झाल्याचे पाहून त्याला धक्का बसला. त्याने मालकाला नूरीच्या हत्येची माहिती दिली.

- Advertisement -

हेही वाचा – मिरा-भाईंदर-वसई-विरारसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पोलिसांकडून तपासणी

त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठविण्यात आला आहे. दुकानातील दिड लाखाची रक्कम गायब असल्याने पैशासाठी हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज मुंब्रा पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे ही हत्या पैशासाठी की अन्य कारणासाठी झाली याचा पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान तमन्ना ट्रेडिंग कंपनीच्या आसपास असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे. अज्ञात आरोपी हा सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -