घरमुंबईमाझेही मत ...

माझेही मत …

Subscribe

रोजगाराचा प्रश्न सुटावा

आगामी लोकसभा निवडणूकीचे प्रचार सध्या जोरदार सुरू आहेत. मतदारांनी सुद्धा न विसरता मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. नुकत्याच झालेल्या विदर्भातील निवडणुकीत फक्त ६० ते ६२% मतदान झाले. उर्वरित मतदारांनी मत दिलेच नाही. समाजातील एक जबाबदार घटक म्हणून योग्य उमेदवार निवडून आणणे आपले कर्तव्य आहे, हे आपण लक्षात घेणे गरजेचे आहे. मतदान करणं किती महत्वाचे आहे, ही बाब मुख्यतः उमेदवारांनी मतदारांना पटवून द्यायला हवी. आज महाराष्ट्रात शिक्षणाची परिस्थिती अशी झाली आहे की, ज्यांच्याकडे पैसे असतील तेच उच्च शिक्षण घेऊ शकतील. पैसे नसतील तर वैद्यकीय, इंजिनिअरिंग सारखे शिक्षण घेणे जवळपास अशक्यच झाले आहे. छोटे शेतकरी, शेतमजूर यांच्या हाती कामधंदा नाही. बेरोजगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. उच्चशिक्षित असून सुद्धा तरुणांना मनासारखी नोकरी नाही. या मुद्द्यांचा सरकारने फार गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. तरच देशात लोकशाही नांदेल. – पल्लवी पांढुर्णेकर, विद्यार्थीनी

- Advertisement -

प्रश्न सोडविणारे सरकार अपेक्षित

लोकसभा निवडणुकीत योग्य उमेदवाराची निवड करताना राष्ट्रीय पातळीवरील मुद्द्यांना प्राधान्य देण्यात यावे. देशाची सुरक्षितता अबाधित राहण्यासाठी सक्षम नेतृत्वगुण असणार्‍या पंतप्रधानांची निवड होणे गरजेचे आहे. तसेच कृषिप्रधान आपल्या देशात शेतकर्‍यांचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहेत. शेतकर्‍याला कर्जमुक्त करण्यासाठी आवश्यक धोरण राबविणे, शिक्षण क्षेत्रात आवश्यक बदल करून कौशल्याधारित शिक्षणाला प्राधान्य देणारे शिक्षण देत युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे सरकार यंदा अपेक्षित आहे. आजही अनेक खेळांमध्ये आपल्या देशातील खेळाडू पिछाडीवर पडतानाचे चित्र आहे. तेव्हा खेळाडूंना योग्य मार्गदर्शनासह आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देत खेळाडूंच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न व्हावा. एकंदरीत देशातील शेतकरी, युवक, खेळाडू यांच्या प्रगतीसाठी झटणारे सरकार मला अपेक्षित आहे. -गीता झगडे, अध्यक्ष, पार्ले स्पोर्ट्स क्लब गर्ल्स टीम

- Advertisement -

तरुणांचे प्रश्न मार्गी लागावेत

मागील काही वर्षात देशात शेतकरी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शेतकर्‍यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. आजही देशातील शहरे, ग्रामीण भागात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न जैसा थेच आहे. आजही महिला विविध अत्याचारांच्या घटनांना बळी पडत आहेत. महिलांवरील अत्याचारांच्या घटनांना पायबंद घालणारे कडक कायदे अस्तित्वात आणून त्यांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. तसेच देशातील तरुणांना कौशल्याधारित शिक्षण उपलब्ध करून देत रोजगार उपलब्ध करून देणे येणार्‍या नवीन सरकारची जबाबदारी असेल.– मेल्सीना तुस्कानो, विद्यार्थीनी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -