घरमहाराष्ट्रनाशिकअतिक्रमणधारकांचा नाशिकला विळखा, महापालिकेची डोळेझाक सुरू

अतिक्रमणधारकांचा नाशिकला विळखा, महापालिकेची डोळेझाक सुरू

Subscribe

मध्यवर्ती भागांतील रस्ते आणि पादचारी मार्गही केले गिळंकृत, वाहतूक कोंडीचा प्रश्न बिकट

नाशिक शहरातील अतिक्रमणांचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असतानाही महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभाग मात्र हातावर हात ठेवून बसलाय.दिवाळी सण दोन आठवड्यांवर येऊन ठेपल्याने मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणांची समस्या अधिक बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्मार्ट नाशिकचे रस्ते आणि फूटपाथही अतिक्रमणधारक गिळंकृत करणार का,असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे.

रविवार कारंजा येथील सुंदर नारायण मंदिराजवळील पादचारी मार्ग, दिंडोरी नाका येथील हरीबाई चाळ अशा सर्वच ठिकाणी अतिक्रमणधारकांनी बस्तान मांडलेले आहे.पालिकेच्या संकेतस्थळावर सर्व सहाही विभागांचे बायोमॅट्रिक पद्धतीने नोंदणी पूर्ण झालेले हातगाडी, टपरीधारक आणि रस्ताकडेला बसणार्‍या विक्रेत्यांची यादी आहे.एकूण ९ हजार ६२० व्यावसायिकांची नोंदणी झालेली आहे. मात्र, या यादीत एकाच कुटुंबातील अनेक नावे असल्याचे पुढे आले आहे. पालिकेने नोंदणी न झालेल्या विक्रेत्यांवर तरी कारवाई करावी आणि नाशिककरांना रस्ते मोकळे करुन द्यावेत, अशी मागणी केली जाते आहे.

- Advertisement -

वाहने उचलतात मग हे का नाही

रस्त्यात गाडी पार्क केली ती ती उचलण्यासाठी पोलीस तत्परतेने कारवाई करतात. तशीच पद्धत महापालिका का करू शकत नाही. शहरात एकही भाग असा नाही, ज्या ठिकाणी अतिक्रमण आणि झोपडपट्ट्यांची समस्या नाही. अशा ठिकाणी पालिकेने विभागनिहाय पथकांची नियुक्ती करुन अतिक्रमणे झाल्यास त्यांच्यावरच जबाबदारी निश्चित करावी. तसे झाले तरच अतिक्रमणांची समस्या कायमस्वरुपी संपुष्टात येईल आणि नाशिककरांना हक्काचे फूटपाथ मिळतील आणि वाहतूक कोंडीचा प्रश्नही सुटेल.

अतिक्रमण निर्मूलन विभाग केवळ नामधारी राहिला आहे. अतिक्रमणांची कारवाई कागदोपत्री दाखवली जाते. मोहीमेपूर्वीच अतिक्रमणधारकांना त्याची माहिती मिळते. वाहतूक पोलिसांप्रमाणेच महापालिकेने फोटो काढून अतिक्रमणांवर कारवाई करावी. दसरा दिवाळीत २ दिवस आधीपासूनच रविवार कारंजा, मेनरोड, सराफ बाजार, पंचवटीत मोठया प्रमाणात अतिक्रमणधारक बसतात त्यामुळे रस्ते अरुंद बनलेत. यातून वाहतूक कोंडी होते. त्यामुळे पालिका व पोलिसांनी कारवाई करावी.
                                                                                 – सत्यजित शहा, व्यावसायिक

पालिका आयुक्तांनी दिवाळीपूर्व फेरीवाला समितीची बैठक घ्यावी. नोंदणीकृत फेरीवाल्यांना ४ वर्षे लोटूनही पालिकेने त्यांना प्रमाणपत्र आणि ओळखपत्र दिलेले नाही. शहरात अधिकृत आणि अनधिकृत फेरीवाले ओळखणे अवघड बनले आहे. आरक्षित जागांवर सर्व हातगाडी आणि पथविक्रेत्यांना स्थलांतरित करावे. जेणेकरून वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल. शहर वाढत असल्याने नवीन पथविक्रेते नोंदणी मोहीम राबवत त्यांच्यासाठी जागा निश्चित करणे गरजेचे आहे.
                                                               – संदीप भवर, सदस्य, फेरीवाला समिती

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -