मोहित भारतीयच्या मेहुण्याला एनसीबीने सोडले

भाजपच्या दबावामुळे रिषभ सचदेवासह तिघे बाहेर - नवाब मलिक

Cruise Drugs Case ncb arrested 17 people including a Nigerian

मुंबईहून गोव्याला जाणार्‍या क्रूझवरील पार्टीतून अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) पकडलेल्या आरोपींमध्ये भाजपच्या युवा मोर्चाचे पदाधिकारी मोहित कंबोज यांचा मेहुणा रिषभ सचदेवाचा समावेश होता. मात्र, दिल्लीतील भाजप नेत्यांच्या दबावामुळे सचदेव तसेच अन्य दोन जणांना सोडण्यात आले, असा खळबळजनक आणि गंभीर गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी शनिवारी केला.

अमली पदार्थ पार्टीतून 11 जणांना अटक केली असताना त्या तिघांना कुणाच्या सांगण्यावरून सोडण्यात आले याचा खुलासा एनसीबीचे क्षेत्रीय अधिकारी समीर वानखेडे यांनी करावा, अशी मागणीही मलिक यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. अमली पदार्थ पार्टीचे प्रकरण गंभीर असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यात लक्ष घालावे आणि आयोग नेमून चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.अमली पदार्थ पार्टीत भाजप नेत्याच्या नातेवाईकाचा समावेश होता, असा आरोप मलिक यांनी शुक्रवारी केला होता. हा आरोप सप्रमाण सिद्ध करण्यासाठी मलिक यांनी काही व्हिडिओ आणि छायाचित्रे आज उघड केली. या व्हिडिओमध्ये रिषभ सचदेवा, प्रतीक गाभा, अमीर फर्निचरवाला हे तिघे एनसीबीच्या ताब्यात असताना आणि त्यांच्या नातेवाईकांसोबत ते एनसीबीच्या कार्यालयातून बाहेर पडताना दिसत आहेत, असे मलिक यांनी सांगितले.

क्रुझवरील ती धाड ठरवून टाकलेली आणि बनावट होती, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला. सेलिब्रिटींना बोलावून त्यांना अडचणीत आणण्याचा हा प्रकार होता. त्यामुळे एनसीबीचे अधिकारी वानखेडे यांनी त्या तिघांना का सोडले आणि कुणाच्या सांगण्यावरून सोडले याचा खुलासा करावा, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली. इतकेच नव्हे तर वानखेडे यांच्या फोनवरील कॉलची पडताळणी करावी, अशी जोरदार मागणी मलिक यांनी केली. रिषभ सचदेव याला बाहेर सोडताना त्यांचे वडील आणि काका सोबत होते.

या तीन व्यक्तींचे नातेवाईक एनसीबीच्या कार्यालयात कसे आले? असा सवाल करताना मलिक यांनी सचदेवाचे वडील, काका आणि समीर वानखेडे यांचे कॉल डिटेल्स मुंबई पोलिसांनी तपासले तर संपूर्ण सत्य बाहेर येईल, असे सांगितले. आम्ही केलेले आरोप एनसीबीने फेटाळून लावले. तर विरोधी पक्षाने जावयाला अटक केल्यामुळे आरोप केल्याचे सांगितले. मात्र, मी सुरुवातीपासून न्यायालयावर विश्वास ठेवून आहे. न्यायालयात जावई आपले निर्दोषत्व सिध्द करेल. आता मी जे प्रश्न उपस्थित केले आहेत आणि जे लोकसेवक म्हणवून घेत आहेत त्यांनी या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत, असेही मलिक म्हणाले.
चौकट

भाजपचे नेते एनसीबीचे प्रवक्ते?
एनसीबीतील या घातक घटनेबाबत आता भाजपचे नेते पुढाकाराने का बोलत आहेत, असा सवाल करत मलिक यांनी हे नेते एनसीबीचे प्रवक्ते झालेत काय, असा सवाल केला. विशेषत: माजी मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस आणि त्या पक्षाचे नेते एनसीबीच्या बचावासाठी पुढाकार घेण्याचे कारण काय? यामागचे गौडबंगाल काय, हे ही कळू द्या, असे मलिकांनी म्हटले.

मलिक यांच्या विरोधात १०० कोटीचा दावा दाखल करणार : मोहित भारतीय
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आपल्या कुटुंबावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. पुरावे नसताना बेधडक आरोप करणार्‍या मलिक यांच्यावर आपण १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे मुंबई भाजपचे माजी सरचिटणीस मोहित कंबोज उर्फ भारतीय यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

तसं तर ज्या लोकांना सोडलं गेलं, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्याही एका मोठ्या नेत्याच्या मुलाशी जुडलेला व्यक्ती आहे. त्याला देखील सोडलं आहे. परंतु, आम्ही यासाठी त्यांचं नाव घेत नाही. कारण ते निर्दोष होते. मग त्यांचं नाव घेऊन आम्ही त्यांना बदनाम का करावं? मला वाटतं यावर राजकारण व्हायला नको. आपल्या मुलांना बिघडणारे हे जे ड्रग्जचं व्यसन आहे. याविरोधात लढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे, असे मला वाटते. – देवेंद्र फडणवीस , विरोधी पक्षनेते

एनसीबीवर लावण्यात आलेले सर्व आरोप निराधार आणि बिनबुडाचे – एनसीबी उपमहासंचालक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी शनिवारी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला कोंडीत पकडण्याच्या केलेल्या प्रयत्नानंतर बचावात्मक पवित्रा घेत एनसीबीने क्रूझवरील कारवाईचे समर्थन केले. मलिक यांनी ज्यांचा उल्लेख केला त्या तिघांची नव्हे तर चा प्रयत्न केला. मात्र, एनसीबीने देखील पत्रकार परिषद घेऊन ११ जण नाही तर १४ जणांना आम्ही क्रुझवरील कारवाईच्या दरम्यान ताब्यात घेतले होते व त्यापैकी ६ जणांचे जबाब घेऊन त्यांना सोडण्यात आले असून ८ जणांना अटक करण्यात आली होती, अशी माहिती एनसीबीचे उपमहा संचालक ज्ञानेश्वर सिंग यांनी पत्रकारांना देत राष्ट्रवादी काँग्रेसने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक आणि शनिवारी दुसर्‍यांदा पत्रकार परिषद घेऊन २ ऑक्टोबर रोजी क्रूझवरील रेव्ह पार्टीच्या दरम्यान ११ जणांना एनसीबीने ताब्यात घेऊन त्यापैकी तिघांना सोडून देण्यात आले. सोडून दिलेले तिघे भाजपचे बडे नेते यांचे मेव्हुणे असल्याचा नवाब मलिक यांनी आरोप केला. या तिघांना ताब्यात घेऊन एनसीबीने तिघांना का सोडले, असा सवाल करून नवाब मलिक यांनी एनसीबीच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला. दरम्यान एनसीबीकडून पत्रकार परिषद घेऊन याचा खुलासा करण्यात आला आहे.

एनसीबीने दुपारी पत्रकार परिषद घेऊन आम्ही अकरा जण नाही तर १४ जणांना क्रुझवरून ताब्यात घेतले. क्रूझवर छापेमारीच्या दरम्यान एकूण ६ ठिकाणी ड्रग्स जप्त केले होते. ताब्यात घेण्यात आलेल्या १४ जणांना एनसीबी कार्यालयात परीक्षणासाठी आणण्यात आले होते. या सर्वांना कलम ६७ नुसार नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर त्यांची कसून तपासणी करण्यात आल्यानंतर सर्वांचे जबाब नोंदवण्यात आले. त्यानंतर ८ जणांना अटक करण्यात आली आणि उर्वरित ६ व्यक्तींविरूद्ध कोणतेही आक्षेपार्ह पुरावे सापडले नसल्याने त्यांना सोडून देण्यात आले. या प्रकरणाच्या तपासादरम्यान कायदेशीर गरज भासल्यास त्यांना बोलावण्यात येईल, असे एनसीबीचे उपमहा संचालक ज्ञानेश्वर सिंग यांनी स्पष्ट केले आहे.

एनसीबीकडून करण्यात आलेल्या आरोपात काहीही तथ्य नसून एनसीबीकडून कुठल्याही नियमाचे उल्लंघन झालेले नाही. एनसीबीकडून कायदेशीरदृष्ट्या आणि पारदर्शक आणि नि:पक्षपणे काम करून संशयित तसेच इतर आरोपींना कायद्यानुसार वागणूक दिली गेली, असे एनसीबीचे उपमहा संचालक ज्ञानेश्वर सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

२ ऑक्टोबर रोजी क्रूझवर करण्यात आलेल्या कारवाईत एनसीबीने आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल ग्रीन गेट, कॉर्डिलीया क्रूझ येथून ८ जणांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून कोकेन, एमडी, चरस, हायड्रोपोनिक वीड यासारखे अमली पदार्थ जप्त केले होते. कोणत्याही जप्तीत कारवाई दरम्यान स्वतंत्र साक्षीदारांना उपस्थित राहणे अनिवार्य आहे. एनसीबीने त्याचे कठोरपणे पालन केले आणि त्याच्या सर्व जप्ती कामात किमान २ स्वतंत्र साक्षीदारांचा समावेश आहे. कारवाई वेळेच्या आधारावर आयोजित केल्या जातात म्हणून स्वतंत्र साक्षीदारांची कुठल्या पक्षाचा आहे, याची पडताळणी शक्य नाही. कारण मुख्य लक्ष अमली पदार्थ जप्तीवर असते, असे एनसीबीचे उपमहा संचालक ज्ञानेश्वर सिंग यांनी म्हटले.

संपूर्ण कारवाईमध्ये एकूण ९ स्वतंत्र साक्षीदार सामील होते आणि त्यामध्ये मनीष भानुशाली आणि के.पी. गोसावी होते. कारवाई पूर्वी एनसीबीला या दोन्ही साक्षीदाराची कुठलीही माहिती नव्हती. या प्रकरणात उच्च प्रोफाईल व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले, एनसीबी कार्यालयाच्या आवारात जमलेली मोठी गर्दी आणि असंख्य कॅमेरे टाळण्यासाठी सर्व ताब्यात घेतलेल्या व्यक्तींना एनसीबी कार्यालयाच्या सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यासाठी या दोन्ही साक्षीदारांची मदत घेण्यात आली होती, असेही सिंग म्हणाले.

या कारवाई दरम्यान कायद्याच्या प्रक्रियांचे योग्य पालन करून ताब्यात घेण्यात आलेल्या आणि अटक करण्यात आलेल्यांपैकी एकालाही वाईट प्रकाराची वागणूक देण्यात आलेली नाही. बचाव पक्षाचे हे न्यायालयात मान्य केले व एनसीबीच्या अधिकार्‍यावर विश्वास ठेवण्यात आला असल्याचे ज्ञानेश्वर सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आरोपींच्या चौकशी आणि खुलाशांच्या आधारावर, नियमानुसार योग्य कार्यपद्धतीचे पालन करून, मुंबईतील विविध ठिकाणी ६ ठिकाणी छापेमारी टाकून अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात एका परदेशीसह १० जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात १८ जणांना अटक करण्यात आली आहे. एक्स्टसी, मेफेड्रोन, हायड्रोपोनिक वीड – मल्टी स्ट्रेन कॅनाबिस आणि चरस इत्यादी विविध औषधे जप्त करण्यात आली आहेत. ज्यात काही व्यावसायिक प्रमाणात औषधांचा समावेश आहे जो एक गंभीर बाब आहे.

एनसीबीवर लावण्यात आलेले सर्व आरोप निराधार, प्रेरित विचारसरणी आणि पूर्वग्रहदूषित आहेत, असे आरोप अंदाजावर केले जातात, असेही उपमहा संचालक ज्ञानेश्वर सिंग यांनी म्हटले आहे.