घरताज्या घडामोडीराखी जाधव यांचा नवाब मलिकांना शह; सुधार समितीसाठी कप्तान मलिक यांचा पत्ता...

राखी जाधव यांचा नवाब मलिकांना शह; सुधार समितीसाठी कप्तान मलिक यांचा पत्ता कापला

Subscribe

स्थायी समितीसह चार वैधानिक समित्यांमधील निवृत्त सदस्यांच्या जागी नव्याने सदस्यांची निवड करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षांनी महापालिकेतील पक्षाच्या गटनेत्यांना पाठवून निर्णय घेण्याचे आदेश दिले. यामध्ये सुधार समितीच्या सदस्यपदी कप्तान मलिक यांच्या नावाची शिफारस केली होती. परंतु आयत्या वेळी महापालिका गटनेत्या राखी जाधव यांनी त्यांचा पत्ता कापत त्याऐवजी मनिषा रहाटे यांची वर्णी लावली. त्यामुळे एक प्रकारे नवाब मलिक यांना शह देत पक्षाचा आदेशच जाधव यांनी झुगारुन लावला आहे. त्यामुळे राखी जाधव आणि नवाब मलिक यांच्या अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांच्यासह डॉ. सईदा खान, कप्तान मलिक, मनिषा रहाटे, धनश्री भरणकर, रेशमबानो हाशिम आदी सदस्य विविध वैधानिक समित्यांमधून निवृत्त झाले होते. त्यामुळे या रिक्त जागी पक्षाच्यावतीने नवीन सदस्यांची नावे मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नवाब मलिक यांच्या स्वाक्षरीने महापौरांना पाठवण्यात आले होते. यामध्ये राखी जाधव यांना पुन्हा स्थायी समिती सदस्यपदी तसेच डॉ. सईदा खान यांना शिक्षण आणि आरोग्य समिती सदस्यपदी नियुक्त करण्याची शिफारस करण्यात आली होती. याशिवाय कप्तान मलिक यांना वृक्ष प्राधिकरणासह सुधार समिती सदस्यपदी नियुक्त करण्याची शिफारस केली होती. तर मनिषा रहाटे, धनश्री भरणकर आणि रेशमबानो यांना अन्य स्थापत्य व विधी समिती सदस्यपदी नियुक्त केले जावे, असे पत्र मुंबई अध्यक्षांनी महापौरांना पाठवले होते.

- Advertisement -

परंतु सोमवारी या सर्व समित्यांच्या सदस्यांच्या नियुक्ती महापौरांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जाहीर केले. यामध्ये राखी जाधव आणि डॉ. सईदा खान यांच्या नियुक्त्या मुंबई अध्यक्षांच्या शिफारशीनुसार करण्यात आल्या. परंतु कप्तान मलिक यांची सुधार समिती सदस्यपदी नियुक्ती न करता त्यांच्याऐवजी विक्रोळीतील नगरसेविका मनिषा रहाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे एकप्रकारे कप्तान मलिक यांचा पत्ता परस्पर कापत गटनेत्या राखी जाधव यांनी एकप्रकारे नवाब मलिक यांना शहच दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबई अध्यक्षांनी जेव्हा नगरसेवकांच्या नावे सदस्य म्हणून शिफारस केल्यास, त्यात परस्पर बदल करण्याचा कोणताही अधिकार गटनेत्याला नसतो. किंबहुना तसा बदल करायचा असल्यास त्याची कल्पना पुन्हा मुंबई अध्यक्षांना देणे आवश्यक असते. परंतु एकप्रकारे महापालिका गटनेत्यांनी पक्षाचा आदेशच झुगारला असून हा प्रकार पक्ष शिस्तीच्या विरोधात आहे. त्यामुळे अशाप्रकारे पक्षाचा आदेश डावलणाऱ्या गटनेत्यावर कारवाई केली जावू शकते.

- Advertisement -

मागील काही महिन्यांपासून मुंबई अध्यक्ष नवाब मलिका आणि राखी जाधव यांच्यामध्ये शितयुद्ध सुरु आहे. त्यांचा अंतर्गत वाद सुरु असल्यामुळे जाधव यांनी त्यांचे आदेश जुमानले नसतील, असे पक्षातून बोलले जात आहे. परंतु हे पक्षविरोधी असल्याचे पक्षातील लोकांचे म्हणणे आहे. मात्र, जाधव हे राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या गटात असल्यामुळेच त्यांनी ही हिंमत केल्याचे पक्षातील काही नेत्यांचे म्हणणे आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक कप्ता मलिक यांनी याबाबत स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई अध्यक्षांनी माझ्या नावाची शिफारस सुधार समितीच्या सदस्यपदी केली होती. परंतु गटनेत्यांनी परस्पर माझ्या नावावर काट मारत अन्य नगरसवेकाची शिफारस केली. त्यामुळे हे कृत्य पक्षविरोधी असून आपण याबाबत पक्षाला पत्र पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -