घरमुंबईपार्ल्यात नऊ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या

पार्ल्यात नऊ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या

Subscribe

आरोपीस पोलीस कोठडी,पाच वर्षांपूर्वीही केला होता एक अत्याचार

विलेपार्ले येथे नऊ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अपहरण, हत्या, लैंगिक अत्याचारासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून जुहू पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. वडिवेल देवेंद्र असे या 35 वर्षीय आरोपीचे नाव आहे. अटकेनंतर त्याला शनिवारी दुपारी दिंडोशीतील विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला 15 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या वृत्ताला एसीपी दत्तात्रय भरगुडे यांनी दुजोरा दिला, मात्र अधिक तपशील सांगण्यास नकार दिला. दरम्यान, देवेंद्र याने या अगोदरही 2013 साली एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. त्यामुळे या घटनेनंतर येथील स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यांनी जुहू पोलीस ठाण्यावर मोर्चा काढल्याने काही काळ तणाव पसरला होता.

- Advertisement -

विलेपार्ले येथील नेहरुनगर झोपडपट्टीत ही घटना घडली आहे. अत्याचार झालेली मुलगी आपल्या आईवडिलांसह राहत होती. ही मुलगी तिसरीत शिकत होती. गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता ती दुकानात चहा पावडर आणण्यासाठी गेली होती, मात्र बराच वेळ होऊनही ती घरी आली नाही. त्यामुळे तिच्या आईने तिचा शोध सुरू केला, मात्र ती कुठेच सापडली नाही.

बराच वेळ शोध घेतल्यानंतर ती सापडली नाही. म्हणून त्यांनी रात्री उशिरा जुहू पोलिसांत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. याप्रकरणी जुहू पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवून या मुलीचा शोध सुरू केला होता. ही शोधमोहीम सुरू असतानाच शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांनी वडिवेल देवेंद्र या सराईत गुन्हेगाराला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीत त्यानेच या मुलीचे अपहरण केल्याचे सांगितले.

- Advertisement -

तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिची गळा आवळून हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह जवळच्या सार्वजनिक शौचालयाजवळ टाकून पलायन केल्याची त्याने कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी नेहरुनगर, श्रीलंका चाळ शौचालयाजवळून या मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला होता. हा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठविला होता. त्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला नाही, मात्र प्राथमिक तपासात या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेनंतर वडिवेल देवेंद्रविरुद्ध पोलिसांनी अपहरणासह लैंगिक अत्याचार, हत्या आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यात नंतर त्याला पोलिसांनी अटक केली.

सध्या तो पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. प्राथमिक तपासात वेडिवेल हा नेहरुनगर झोपडपट्टीत त्याच्या दुसर्‍या पत्नीसोबत राहत असून त्याची पत्नी सध्या गरोदर आहे. 2013 साली त्याने अशाच प्रकारे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. त्या गुन्ह्यात त्याला पोलिसांनी अटक केली होती. त्याला शिक्षा ठोठावली होती. पाच वर्षे कारागृहात राहिल्यानंतर तो काही महिन्यांपूर्वी बाहेर आला होता. गुन्ह्याच्या दिवशी तो त्याच परिसरात होता. त्याने या मुलीला दुकानात जाताना पाहिले आणि तिचे अपहरण केले होते. त्याच्या घराशेजारीच असलेल्या एका खोलीत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून त्याने तिथेच तिची गळा आवळून हत्या केली होती. त्यानंतर रात्रीच्या वेळेस तिचा मृतदेह सार्वजनिक शौचालयात टाकून त्याने हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.

ही माहिती मिळताच नेहरुनगर परिसरातील स्थानिक रहिवाशांनी शनिवारी सकाळी जुहू पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. मोर्चात सहभागी झालेले सर्व रहिवाशी प्रचंड संतप्त झाले होते. या रहिवाशांनी आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आम्हीच त्याचा बंदोबस्त करतो, अशी घोषणाबाजी केली. त्यामुळे पोलीस ठाणे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा यांनी संतप्त झालेल्या रहिवाशांची भेट घेऊन त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. आरोपीविरुद्ध कायद्यानुसार कारवाई केली जाईल आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा मिळेल, असे आश्वासन दिले. त्यानंतर ते सर्वजण निघून गेले. दरम्यान, या घटनेची वरिष्ठांनीही गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध जास्तीत जास्त पुरावे गोळा करुन त्याला शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, अशी मागणी जुहू पोलिसांकडून करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -