घरमुंबईमहापालिकेतील परदेशी, दराडेंची स्थान सुरक्षितच!

महापालिकेतील परदेशी, दराडेंची स्थान सुरक्षितच!

Subscribe

मुंबई महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त डॉ.अश्विनी जोशी यांची बदली झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील असलेले महापालिकेतील अधिकारीही आता ठाकरे सरकारच्या रडावर असल्याचे बोलले जाते. त्यामुळे डॉ. जोशी यांच्या पाठोपाठ महापालिकेतील आयुक्त प्रविणसिंह परदेशी आणि प्रविण दराडे यांचीही उचलबांगडी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी त्यांचे स्थान सुरक्षितच असल्याचे बोलले जात आहे. परदेशी यांनी महापालिका आयुक्तपदी विराजमान होताच शिवसेनेशी सलगी करण्यास सुरुवात केली होती. त्याबरोबरच प्रविण दराडे हे फडणवीस यांच्या मर्जीतील असले तरीही त्यांनी महापालिकेतील सत्ताधार्‍यांशी जुळवून घेतल्यामुळे परदेशी आणि दराडे यांच्या महापालिकेतील स्थानाला धोका नसल्याचेही बोलले जात आहे.

राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर त्यांनी आपल्या मर्जीतील सनदी अधिकार्‍यांच्या वर्णी लावण्यास सुरुवात केली. त्यामुळे महापालिका आयुक्त अजोय मेहता आणि त्यानंतर संजय मुखर्जी यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी अनुक्रमे प्रविण सिंह परदेशी आणि प्रविण दराडे यांची नियुक्ती केली. तर त्यानंतर अतिरिक्त आयुक्त आय.ए.कुंदन यांची बदली झाल्यानंतर त्या रिक्त जागी डॉ.अश्विनी जोशी यांची बदली केली होती. अजोय मेहता यांना राज्याच्या मुख्य सचिवपदी बढती मिळाल्यानंतर त्या रिक्त जागी आपल्या मर्जीतील प्रविणसिंह परदेशी यांची वर्णी देवेंद्र फडणवीस यांनी लावली होती. त्यामुळे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त हे फडणवीस यांच्या विश्वासातील असल्याने ठाकरे सरकार आल्यानंतर या सर्वांना पुन्हा शासनाकडे पाठवले जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची बदली करत ठाकरे सरकारने आपण फडणवीस यांच्या विश्वासातील अधिकार्‍यांना या ठिकाणी ठेवणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. परंतु, आयुक्त प्रविणसिंह परदेशी आणि अतिरिक्त आयुक्त प्रविण दराडे यांनी सत्ताधारी पक्षांशी जुळवून घेतल्याने, त्यांचे स्थान धोक्यात नसल्याचे शिवसेनेच्याच्या गोटातून समजते.

- Advertisement -

डॉ. जोशी यांच्याविरोधात सुरुवातीपासूनच सत्ताधारी पक्षाचे महापालिकेतील नेते असल्याने त्यांनी त्यांचावर सुड उगवला. परंतु परदेशी आणि दराडे फडणवीस यांच्या गुडबुकमधील असले तरी महापालिकेत कामकाज करताना त्यांनी दाखवलेल्या लवचिकतेमुळे त्यांचे स्थान मजबूत असल्याचे बोलले जात आहे. परदेशी यांनी आयुक्तपदाची सुत्रे हाती घेताच दोनच दिवसांमध्ये त्यांनी बेस्टला आर्थिक मदत देण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे परदेशी यांनी बेस्टला मदत देण्याची शिवसेनेची मागणी पूर्ण केल्यामुळे तसेच ज्या ज्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि महापौरांनी केलेल्या सुचनांचे पालन केल्यामुळे परदेशी हे शिवसेनेची मर्जी राखून आहेत. गुरुवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महापालिकेत आगमन झाल्यानंतर, त्यांचे आदरातिथ्यापासून सर्वच बाबींमध्ये परदेशी बाजी मारुन गेले होते. त्यानंतर आपत्कालीन कक्षातील बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांच्या दालनात भेट दिली होती. प्रविण दराडे यांचा शांत स्वभाव आणि आजवर कधीही महापालिकेतील शिवसेनेच्या नेत्यांना दुखावण्याचा प्रयत्न त्यांनी न केल्यामुळे त्यांची बदली करण्याबाबतची कोणतीही तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे झालेली नाही. तसेच खुद्द मुख्यमंत्रीही परदेशी आणि दराडे यांच्या कामांबाबत समाधानी असल्याने त्यांच्या बदलीबाबत तुर्तास तरी ठाकरे सरकार निर्णय घेणार नसल्याचे बोलले जात आहे.

आयुक्तांसाठी मुख्यमंत्र्यांनी केला महापौरांचा अवमान

मुंबई महापालिका मुख्यालयात तीन दिवसांपूर्वी बैठकीसाठी आलेल्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राजशिष्टाचाराचा भंग केल्याची चर्चा आहे. मुख्यालयात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी, आपत्कालिन नियंत्रण कक्ष थेट गाठतानाच त्यानंतर आयुक्तांच्या दालनाला भेट दिली. परंतु राजशिष्टाचारानुसार मुख्यमंत्र्यांनी महापौरांच्या दालनात जायला हवे होते. परंतु उध्दव ठाकरे हे स्वत:ला मुख्यमंत्री ऐवजी आजही पक्षप्रमुखच समजत असल्याने त्यांनी प्रशासनातील अधिकार्‍यांना महत्व देण्यास सुरुवात केले आहे. त्यामुळे एकप्रकारे आयुक्तांच्या दालनात भेट देवून मुख्यमंत्र्यांनी महापौरांचा अवमान करत राजशिष्टाचाराची पायमल्ली केली असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -