घरमुंबईपीसीएम, पीसीबी परीक्षेच्या नोंदणीसाठी जुना अर्ज होणार रद्द

पीसीएम, पीसीबी परीक्षेच्या नोंदणीसाठी जुना अर्ज होणार रद्द

Subscribe

विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करावा लागल्याने आर्थिक भुर्दंड पडणार

अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणार्‍या एमएचटी सीईटीच्या परीक्षेसाठी असलेल्या पीसीबी व पीसीएम या दोन्ही ग्रुपसाठी अर्ज करायचा असल्यास विद्यार्थ्यांना आता नव्याने अर्ज करावा लागणार आहे. त्यामुळे फक्त एकाच ग्रुपसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना आपला जुना अर्ज रद्द करून नव्याने अर्ज करण्याची कसरत करावी लागणार आहे. यासंदर्भात सीईटी सेलने सोमवारी एक परिपत्रक काढून स्पष्ट केले आहे. जुना अर्ज करताना त्यावेळी भरलेले शुल्कही परत मिळणार नसल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार आहे.

एमएचटी सीईटीच्या परीक्षेसाठी यंदा राज्य सामाईक परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) पर्सेंटाईलचा गोंधळ टाळण्यासाठी पीसीबी (फिजिक्स, केमिस्ट्री व बायोलॉजी)व पीसीएम (फिजिक्स, केमिस्ट्री व मॅथ्स) असे दोनच पर्याय ठेवले होते. या परीक्षेसाठी 1 मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी आहे. ज्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी अशा दोन्ही क्षेत्रासाठी प्रयत्न करायचा असेल त्यांच्यासाठी पीसीएम व पीसीबी असा एकत्रित स्वतंत्र पर्याय दिला होता. अनेक विद्यार्थ्यांनी सुरुवातीला अर्ज भरताना एकच पर्याय निवडला होता. परंतु त्यांना आता दुसर्‍या पर्यायासाठीही नोंदणी करायची आहे. परंतु एक पर्याय निवडला असल्याने त्यांना दुसरा पर्याय निवडणे शक्य होत नव्हते. अशा विद्यार्थ्यांना आता दुसरा पर्याय निवडायचा असल्यास त्यांना पहिला अर्ज रद्द करून नव्याने दुसरा अर्ज भरावा लागणार आहे.

- Advertisement -

हा अर्ज भरताना त्यांना पुन्हा नव्याने शुल्क भरावे लागणार असून, पहिल्या अर्जाची नोंदणी करताना भरलेले शुल्क विद्यार्थ्यांना परत मिळणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज भरण्याच्या कसरतीबरोबरच आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. गतवर्षी अभियांत्रिकी व वैद्यकीय अशा दोन्ही क्षेत्रांसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या पर्सेंटाईल गुणावरून झालेल्या गोंधळामुळे यंदा सीईटी सेलकडून विद्यार्थ्यांना पीसीएमबीऐवजी पीसीबी व पीसीएम अशा स्वतंत्र परीक्षा द्याव्या लागणार आहेत. या दोन्ही गटांचे निकाल, गुणपत्रिका स्वतंत्र असणार आहे.

एमएचटी सीईटीला विद्यार्थ्यांना प्रतिसाद
आतापर्यंत एमएचटी सीईटीच्या परीक्षेसाठी तब्बल 2 लाख 18 हजार 117 विद्यार्थ्यांनी नोंदणी केले आहेत. यातील 84 हजार 334 विद्यार्थ्यांनी पीसीएम तर 85 हजार 753 विद्यार्थ्यांनी पीसीबीचा पर्याय स्वीकारला आहे. त्याचप्रमाणे पीसीएम व पीसीबी असा एकत्रित पर्याय 48 हजार 30 विद्यार्थ्यांनी स्वीकारला आहे.

- Advertisement -

फी परत नाही…
अर्ज बदलाच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना अर्ज भरताना भरलेल्या शुल्काचा कोणत्याही स्वरूपाचा परतावा मिळणार नाही सीईटी परीक्षा देण्याआधी विद्यार्थ्यांनी आपल्याला नक्की कोणत्या क्षेत्रात जायचे आहे याचा संपूर्ण विचार करावा असे आवाहनच उलट विद्यार्थ्यांना सीईटीने केल्याने भविष्यात यासंदर्भातील तक्रारी वाढण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -