घरमुंबई१०वीसाठी ओपन बोर्ड खेळाडू, कलाकार, दिव्यांगांसाठी

१०वीसाठी ओपन बोर्ड खेळाडू, कलाकार, दिव्यांगांसाठी

Subscribe

प्रतिनिधी व क्रीडा स्पर्धांमुळे शाळांमध्ये उपस्थित राहू न शकणार्‍या, शाळाबाह्य व शारीरिक क्षमतांमुळे शाळेत पोहचू न शकणार्‍या खेळाडू, कलाकार आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकारने दिलासा दिला आहे. या विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी महाराष्ट्र सरकारकडून 10 जानेवारीपासून एसएससी ओपन बोर्ड खुले करून त्याची लिंकही सुरू करण्यात येणार आहे.

ओपन बोर्डामुळे भरतनाट्यमसारखे कला प्रकार व क्रीडा क्षेत्रात कामगिरी करण्यास उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांना थेट परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे त्यांच्या परीक्षेतील अडचण दूर होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.

- Advertisement -

अभ्यासाव्यतिरिक्त खेळ, चित्रकला, नृत्य अशा विविध कला जोपासण्यास प्राधान्य द्या, असा सल्ला नववर्षाच्या पहिल्याच दिवशी विनोद तावडे यांनी महापालिकेच्या विद्यार्थ्यांना दिला होता. कला व क्रीडा क्षेत्रात करियर करू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना आपल्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून उत्तम कामगिरी करता यावी यासाठी ओपन एसएससी (सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट) बोर्ड सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे, अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली. बॉम्बे जिमखाना येथे ‘खेलो इंडिया’ स्पर्धेसंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शाळाबाह्य, शारीरिक क्षमतांमुळे शाळेत पोहोचू न शकणारे दिव्यांग विद्यार्थी, क्रीडा स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम जसे भरतनाट्याम आणि नाटक यामध्ये अनेक मुले मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. परंतु त्याच दिवशी त्यांच्या परीक्षा असल्यास त्यांना स्पर्धांमध्ये सहभागी होण्यात अडचण येते. त्यामुळे कला व क्रीडा क्षेत्रात कामगिरी करण्यास उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मुक्त मंडळाची अर्थात ओपन बोर्डाची स्थापना करण्यात येत आहे. यामुळे कलाकार, खेळाडू आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात काम करण्यासाठी हवा तितका वेळ मिळेल व ते आपल्या सरावासाठीही वेळ देऊ शकतील, असे तावडे म्हणाले. डिसेंबर आणि जून महिन्यात हे विद्यार्थी थेट परीक्षेला बसू शकतात. या विद्यार्थ्यांना वयाच्या दहाव्या वर्षी इयत्ता पाचवीची परीक्षा देता येऊ शकते. वयाच्या 13 व्या वर्षी आठवी आणि वयाच्या 15 व्या वर्षी 10 ची परीक्षा देता येईल. ओपन एसएससी बोर्डाद्वारे या परीक्षा घेतल्या जातील.

- Advertisement -

खेळातही होऊ शकते करिअर…
पालक मुलांना खेळामध्ये करिअर करू देण्यास तयार होत नाहीत. पण विद्यार्थ्यांनी खेळात प्रावीण्य मिळविले तर तो भविष्यात खेळामध्येच चांगले करीअर करु शकतो. महाराष्ट्रात चांगले खेळाडू तयार होण्यासाठी राज्य सरकार क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देते त्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या खेळाडूंना सरकारी नोकरीत प्राधान्य देण्याबरोरबच त्यांच्या कामगिरीनुसार शासकीय सेवेत थेट नियुक्तीही देण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -