घरताज्या घडामोडीमुंबई महापालिकेसाठी दोन आयुक्त नको - विरोधी पक्षनेते रवी राजा

मुंबई महापालिकेसाठी दोन आयुक्त नको – विरोधी पक्षनेते रवी राजा

Subscribe

मुंबई महापालिकेसाठी दोन आयुक्त नको, असे मत मुंबई महापालिकेचे काँग्रेस नेते आणि पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी व्यक्त केले आहे.

‘मुंबईचा वाढता आलेख लक्षात घेता दोन जिल्हाधिकारी प्रमाणेच दोन आयुक्त असणे गरजेचे आहे’, अशी मागणी कॉंग्रेसचे आमदार आणि पालकमंत्री अस्लम शेख यांनी नगरविकास विभागाकडे पत्राद्वारे केली आहे. त्यांच्या या मागणीबाबत आता राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. भाजपचे नगरसेवक आणि पक्षनेते विनोद मिश्रा यांनी त्यांच्या मागणीला विरोध दर्शविला आहे. त्यापाठोपाठ आता मुंबई महापालिकेचे काँग्रेस नेते आणि पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनीही या मागणीला विरोध दर्शविला आहे. मुंबईत दोन नव्हे एकच आयुक्त पाहिजे, असे सूतोवाच त्यांनी केल्याने मुंबई काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. पालकमंत्री यांनी केलेल्या मागणीबाबत पक्षामधूनच विरोधाचा सूर निघू लागल्याने आता पालकमंत्री यांची गोची झाली आहे.

अस्लम शेख यांच्या मागणीला विरोधी पक्षनेते यांचा विरोध

मुंबईत दररोज परराज्यातील नागरिक, बेरोजगार हे मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे मुंबईची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरीकरणही वाढत आहे. पालिकेला मुळभूत सेवासुविधांमध्ये वाढ करावी लागत आहे. त्याचा पालिकेवर बराच ताण पडत आहे. उपनगरातील नागरिकांना शहरातील मुख्यालयात लहान- मोठ्या कामांसाठी ये- जा करावी लागत आहे. मात्र, एका लहान राज्या एवढ्या मुंबईचा कारभार फक्त एकच आयुक्त सांभाळत आहेत. तर दुसरीकडे मुंबई शहर आणि उपनगर यासाठी दोन जिल्हाधिकारी आहेत. तर मग आयुक्तही दोन असणे गरजेचे आहे, असे सांगत पालकमंत्री अस्लम शेख यांनी नगरविकास विभागाकडे दोन आयुक्त नेमण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. मात्र, काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आणि पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी, मंत्री अस्लम शेख यांचे ते वैयक्तिक मत असून ते पक्षाचे अधिकृत मत नाही, असे सांगत त्या मागणीला विरोध दर्शवला आहे.

- Advertisement -

पालिका निवडणुकीपूर्वीच मुंबई काँग्रेसमध्ये गटबाजी

मंत्री अस्लम शेख यांना दोन आयुक्तांची गरज वाटत असली तरी आमच्या पक्षाची ती भूमिका नाही. तसेच, पालिका कायद्याप्रमाणे मुंबईत एकच आयुक्त असायला हवाय, असे रवी राजा यांनी म्हटले आहे. त्यामुळे पालकमंत्री आणि पालिका विरोधी पक्षनेते हे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. तर दुसरीकडे मुंबई काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष भाई जगताप यांनी, पहिल्याच दिवसापासून मुंबईत २२७ जागा स्वबळावर लढण्याची भाषा चालवली आहे. मात्र, पक्षामध्येच एक वाक्यता नाही आणि गटबाजी उफाळून आल्याने ‘जब हाल ए है तो अंजाम क्या होगा’? अशी चर्चा पालिका वर्तुळात ऐकायला मिळत आहे.


हेही वाचा – ऑनलाईन मॅप पडला महागात, पर्यटकांची कार थेट नदीत

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -