घरमुंबईआपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेवरच आपत्ती

आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेवरच आपत्ती

Subscribe

पालघर नगरपरिषदेची आपत्ती व्यवस्थापन समितीच नाही

सोमवारपासून जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असून नद्या-नाल्यांना पूर आले होते. तर शहरी भाग पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत होऊन कित्येक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाच कोलमडून पडल्याचे दिसून आले होते. त्यानंतर आठ तालुक्यासाठी असलेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा कार्यभर एकाच अधिकार्‍याच्या खांद्यावर असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. विशेष म्हणजे या खात्यातील तीन पदे अद्याप रिक्तच आहेत. तर पालघर नगरपरिषदेने आपत्ती व्यवस्थापन समिती गठीतच केली नसल्याचेही समोर आले आहे.

जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील आपत्ती व्यवस्थापन समितीची तीन पदे अद्याप भरली गेलेली नाहीत. इतर खात्यातून कर्मचारी घेऊन एकच अधिकारी समितीचा कारभार पहात आहे. पालघर जिल्ह्यात मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे. पालघरसह जव्हार, डहाणू, सफाळे, मनोर, वसई विरार परिसरात पावसाने थैमान घातले होते. पण, आपत्ती व्यवस्थापन समितीकडे मनुष्यबळासह साधनसामग्रीची कमतरता जाणवत आहे. संपूर्ण जिल्ह्यासाठी एकूण 23 लाईफ जॅकेट, 15 सर्चलाईट, 15 मेगाफोन देण्यात आले आहेत. तसेच गतवर्षी 13 लायटनिंग टॉवरही देण्यात आले होते. 23 लाईफ जॅकेटमधून पालघर, डहाणू, वाडा, जव्हार आणि वसई प्रांताधिकारी कार्यालयांना प्रत्येकी एक-एक जॅकेट देण्यात आली आहेत. तर आठ तहसील कार्यालयांना प्रत्येकी दोन-दोन जॅकेट दिली गेली आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाकडे सध्या दोनच जॅकेट आहेत.

- Advertisement -

आठ तहसील कार्यालयाला प्रत्येक 2 या प्रमाणे 16, तर आपत्ती व्यवस्थापनाने आपल्याकडे फक्त दोनच लाईफ जॅकेट राखून ठेवली आहेत. इतक्या तुटपुंजी यंत्रणा आणि मनुष्यबळाची उणीव असलेली आपत्ती व्यवस्थापन समिती आणीबाणीच्या परिस्थितीत कशी काम करणार ? असा प्रश्न आहे. या कार्यालयाला फक्त चार पदे मंजूर असून तीन पदे अद्याप रिक्त आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिकारीच सर्व कामे पाहत आहेत. तिथे अव्वल कारकून, लिपीक आणि शिपाई ही पदे रिक्त आहेत.

या समितीत उपजिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य अधिकारी आदी सर्व महत्त्वाच्या अधिकार्‍यांचा समावेश असतो. तरीही आपत्ती व्यवस्थापन सक्षम करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पालघर नगरपरिषदेची आपत्ती व्यवस्थापन समिती अद्याप गठीत झाली नसल्याची बाब गुरुवारच्या सर्वसामान्य सभेत उजेडात आली. नगराध्या डॉ. उज्वला काळे यांनी सभेत हा प्रश्न उपस्थित केला असता प्रशासनाने अशी समिती गठीत झाली नसल्याची माहिती सभागृहात दिली होती.

- Advertisement -

जिल्ह्याचा कारभार मोठा असून आपत्तीच्या वेळी आम्ही इतर विभागांकडून दैनंदिन पद्धतीने कर्तव्यासाठी कर्मचार्‍यांची नेमणुका लावतो. रिक्त पदे भरली गेल्यास आपत्तीच्या वेळी कामे करणे सोपे हाईल.
– विवेकानंद कदम, जिल्हा आपत्ती व्यावस्थापन अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -