घरमुंबईपालकांनो  सावधान ;शाळकरी विद्यार्थी पेन हुक्क्याच्या जाळ्यात

पालकांनो  सावधान ;शाळकरी विद्यार्थी पेन हुक्क्याच्या जाळ्यात

Subscribe

आपल्या शाळेत जाणार्‍या मुलांच्या हातात पेन दिसले तर पालकांना त्यात काही विशेष वाटत नाही; पण आता मात्र त्याच्या हातातील पेनात काहीतरी विशेष आणि धक्कादायक असू शकते, हे पालकांनी लक्षात घेण्याची वेळ आली आहे. पेनसारखे दिसणारे हे डिवाईस जर तुमच्या मुलाकडे असेल तर तुमचा मुलगा हुक्क्याच्या आहारी गेला आहे, असे समजायला हरकत नाही. मुंबई आणि नवी मुंबईतील अनेक शाळकरी विद्यार्थ्यांकडे असे पेन आढळून आले आहेत.

हे पेन नसून हा एक प्रकारचा हुक्का असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हे पेन बाजारात ‘पेन हुक्का’ म्हणून प्रचलित आहे. सध्या असे पेन पाचवी ते सहावीच्या विद्यार्थ्यांकडे आढळून येतात. पेनच्या माध्यमातून विद्यार्थीवर्ग सरार्सपणे हुक्का ओढत असल्याचे मुंबईतील अनेक शाळांमध्ये आढळले आहे.  मुंबईसह राज्यातील शाळा तंबाखूमुक्त होण्यासाठी राज्य सरकारने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. शाळांमध्ये यासंदर्भात जनजागृती करण्याबरोबर तंबाखूमुक्त शाळा असा उपक्रमदेखील सुरू केला आहे. पण हायटेकच्या काळात विद्यार्थ्यांनी राज्य सरकारच्या या उपक्रमाला हरताळ फासला आहे. मुंबईतील अनेक शाळांमध्ये सध्या विद्यार्थ्यांच्या हातात पेनासारखे दिसणारे हे डिवाईस आढळून येते. हे पेन नसून हुक्का ओढण्याचे यंत्र आहे. लहान वयात मुलांकडे हे पेन आढळून येत असल्याने शिक्षकांनाही मोठा धक्का बसला आहे.

- Advertisement -

शिक्षकांनी केलेल्या चौकशीत अनेक विद्यार्थी घरातदेखील सरार्सपणे हे पेन वापरतात. हा इलेक्ट्रिक पेन असल्याची बतावणी पालकांकडे करतात, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. ही बाब गंभीर असल्याने शाळांनी पालकांची सभा घेऊन त्यांना या धोक्याबाबत कल्पना देण्यात येत आहे. दरम्यान, पूर्व आणि पश्चिम उपनगरात या पेनचा वापर अधिक प्रमाणात होत असल्याची माहिती समोर आली आहे.

कशा प्रकारे वापरला  जातो हा पेन हुक्का?

नियमित वापरण्यात येणारं पेन ज्याप्रमाणे असतं, त्याप्रमाणे हा पेन हुक्का असतो. हा पेन हुक्का वापरण्यासाठी तो चार्ज करावा लागतो. त्यासाठी त्याच्यासोबत वेगळा चार्जर मिळतो. तो चार्ज केल्यानंतर त्यात ज्या चवीचा हुक्का ओढायचा आहे, त्या चवीचा ट्यूबमधील एक किंवा दोन थेंब टाकले जातात. चार्जिंगमुळे उष्णता निर्माण होते. त्यातून त्या फ्लेवरचा धूर निर्माण होतो. त्यानंतर हुक्का ओढला जातो.

- Advertisement -

काही ठराविक सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून हा पेन हुक्का सहज मिळवता येतो. इंडिया मार्ट, शॉपक्लूज आणि अ‍ॅमेझॉन यासारख्या साईटवर हा पेन हुक्का मिळतो. मुंबईतील अनेक ठिकाणी अनधिकृतपणे सुरू असलेल्या हुक्का पार्लरमध्ये हा पेन हुक्का उपलब्ध असतो. त्याचबरोबर मुंबईतील काही दुकानातही पेन हुक्का मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. अ‍ॅपेल, पान पसंद, चॉकेलट, ऑरेंज, ब्रेन फ्रीज, मिंट, ब्लू बेरीज, बबल गम अशा विविध चवींमध्ये त्याच्या ट्यूब मिळतात. यातील अनेक चवींमध्ये टोबॅको फ्री असल्याचा दावादेखील केला जातो. तर मुंबईतील काही पान विक्रेत्यांकडेही हा पेन हुक्का आढळून येतो. 

विद्यार्थ्यांमधील व्यसनाधीनता वाढवणारा हा प्रकार धक्कादायक आहे. असे प्रकार थांबावेत म्हणून अनेक शाळांमध्ये कार्यशाळा,पालक सभांचे आयोजन करण्यात येते. यासाठी आम्ही शाळांमध्ये नोडल टिचरदेखील नियुक्त केले आहेत. आज आम्ही तंबाखूमुक्त शाळा होण्यासाठी प्रयत्न करत आहोत.  युट्यूबचा उपयोग करून चित्रफीतदेखील विद्यार्थ्यांना दाखवितो. त्या माध्यमातून जनजागृती होत असून त्याचा फायदा नक्कीच होईल.
– सुदाम कुंभार, मुख्याध्यापक, शैलेंद्र हायस्कूल, बोरिवली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -