घरमुंबईमंत्र्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका

मंत्र्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका

Subscribe

५० एकर जमीन लाटल्याचा आरोप

राज्याचे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. बोगस डिग्रीचे प्रकरण एकीकडे चर्चेत असताना आता त्यांच्या सहकारी साखर कारखान्याच्या निधीसंकलनाचे पैसे ५० एकर खाजगी जमीन खरेदीत लावण्यात आल्याच्या आरोपाने लोणीकर अडचणीत आले आहेत. बळीराम कडपे या शेतकर्‍याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात लोणीकर यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील सात मंत्र्यांवर विविध प्रकारचे आरोप झाले होते. या सगळ्याच मंत्र्यांना फडणवीस यांनी एकजात क्लिनचिट दिल्याने संशयाचे दाट धुके निर्माण झाले आहे. यातच आता पाणी पुरवठा मंत्र्यांवर जमीन साखर कारखान्याच्या निधीतून विकत घेऊन ती मुलांच्या नावे चढवण्यात आल्याचे प्रकरण पुढे आले आहे. लोणीकर यांच्यावरील आरोप आगामी निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डोकेदुखी ठरणार आहे. लोणीकर यांनी साखर कारखान्याच्या नावाखाली शेतकर्‍यांकडून पैसे गोळा करुन त्याच पैशांतून खरेदी केलेली जमीनच हडप केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

- Advertisement -

बबनराव लोणीकर यांनी चतुर्वेदेश्वर साखर कारखाना सुरू करण्यासाठी 2000 साली समभागाद्वारे शेतकर्‍यांकडून पैसे जमा केले. या पैशातून कारखान्याच्या नावे मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करण्यात आली. मात्र हा कारखाना सुरू झालाच नाही. ही 50 एकर जमीन स्वत:च्या आणि कुटुंबियांच्या नावे केल्याचा आरोप बबनरावांवर आहे. याच आरोपावरून बळीराम कडपे या शेतकर्‍याने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेमुळे भाजपलाही धक्का बसला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या क्लीनचिटला आव्हान देणाराच हा प्रकार असल्याने सरकारलाही हादरा बसला आहे. दरम्यान, यापूर्वी भाजपच्या एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, या ज्येष्ठ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर आता लोणीकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आल्यामुळे मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -