घरमुंबईचेंबूरची खुशी, गोवंडीचा गम!

चेंबूरची खुशी, गोवंडीचा गम!

Subscribe

गोवंडीचे मलईदार विभाग चेंबूरमध्ये

मुंबईच्या पूर्व उपनगरातील चेंबूर पोलीस ठाण्यातून गोवंडी पोलीस ठाण्यात गेलेली ‘हद्द’ आठ वर्षांनंतर पुन्हा एकदा चेंबूर पोलिसांच्या ताब्यात आली आहे. यापुढे या हद्दीतील रहिवाशांना तक्रारी देण्यासाठी १ जानेवारीपासून गोवंडीऐवजी चेंबूर पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागणार आहे. या निणर्यामुळे या हद्दीतील नागरिकांची होणारी पायपीट आणि वेळही वाचणार आहे. नव्याने झालेल्या गोवंडी पोलीस ठाण्यात गेलेली हद्द पुन्हा चेंबूर पोलीस ठाण्याकडे आल्यामुळे चेंबूर पोलिसांमध्ये खुशीचे वातावरण असले तरी गोवंडी पोलीस मात्र हद्द गेल्यामुळे नाखूश झाले आहेत. याचे कारण गोवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलईदार विभाग चेंबूरकडे गेला आहे.

सन २०११ साली पूर्व उपनगरातील ट्रॉम्बे आणि चेंबूर या दोन पोलीस ठाण्यांची विभागणी करुन गोवंडी पोलीस ठाण्याची स्थापना करण्यात आली होती. तसेच नेहरु नगर आणि चेंबूर या दोन पोलीस ठाण्यांचा काही भाग काढून चुनाभट्टी पोलीस ठाण्याची निर्मिती झाली. चेंबूर पोलीस ठाण्याचे दोन्ही महत्त्वाचे भाग (आर्थिकदृष्ठ्या) गेल्यामुळे चेंबूर पोलीस ठाण्यातील गुन्ह्याचा आलेख कमी झाला होता.दुसरीकडे चेंबूर पोलीस ठाण्यातील रेल्वे स्थानक परिसरातील महत्त्वाचा भाग गोवंडी पोलीस ठाण्याकडे आल्यामुळे गोवंडी पोलीस ठाण्याला महत्त्व प्राप्त झाले होते. चेंबूरमधील रेल्वे स्थानक परिसर, आंबेडकर गार्डन, के स्टार मॉल, चेंबूर जिमखाना, डायमंड गार्डन, गुरुदास कामत बंगला, सुभाष नगर हा परिसर गोवंडी पोलीस ठाण्यात वर्ग झाल्यानंतर या पोलीस ठाण्याची आर्थिक बाजू तर मजबूत झालीच, परंतु गुन्ह्याचा आलेखदेखील तेवढाच वाढला होता.

- Advertisement -

गोवंडीतील कुकरेजा कॉम्प्लेक्स या ठिकाणी गोवंडी पोलीस ठाण्याची इमारत आहे. या हद्दीतील नागरिक, व्यापारी, मुख्य म्हणजे महिलांना हे पोलीस ठाणे खूप दूर पडत होते. तेथे जाण्यासाठी वाहतूक सुविधा नसल्यामुळे नागरिकांची नाहक पायपीट होत होती. रात्रीच्या वेळी तर खास करून महिलांना गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जाताना असुरक्षितता जाणवत होती. अनेक नागरिकांनी, संस्थाची पोलीस ठाणे जवळ आणावे अथवा हा भाग चेंबूर पोलीस ठाण्यात वर्ग करावा यासाठी वरिष्ठ अधिकारी आणि गृहविभागाकडे पत्रव्यवहार करून मागणी देखील होती. २०११ साली चेंबूर पोलीस ठाण्यातून वगळून गोवंडी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलेला हा भाग ८ वर्षांनंतर पुन्हा चेंबूर पोलीस ठाण्याकडे सोपवण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात आला. त्यासाठी शासनाला पत्रव्यवहारद्वारे शिफारस करण्यात आली होती. अखेर गृहविभागा-कडून मान्यता देण्यात आली असून त्याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले. ४ डिसेंबर रोजी या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र वर्ष संपण्यासाठी काही दिवस उरले असल्यामुळे नवीन वर्षात १ जानेवारी २०१९ पासून येथील नागरिकांच्या तक्रारी, समस्या चेंबूर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात येतील.

चेंबूरमधील रेल्वे स्थानक परिसर, आंबेडकर गार्डन, के स्टार मॉल, चेंबूर जिमखाना, डायमंड गार्डन, गुरुदास कामत बंगला, सुभाष नगर आदी परिसरातील रहिवासी, दुकानदार, व्यापारीवर्ग यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून आनंद व्यक्त केला आहे. आपल्या हद्दीतील मलाईदार भाग चेंबूर पोलीस ठाण्यात गेल्यामुळे गोवंडी पोलिसांना चुटपूट लागली असून त्यांच्याकडे आता केवळ नावापुरती हद्द उरली आहे.तसेच ८ वर्षांपूर्वी आपल्याकडून गेलेली हद्द पुन्हा आपल्याकडे आल्यामुळे चेंबूर पोलिसांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.या प्रकरणी संबंधित दोन्ही पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र याबाबत दोन्ही अधिकार्‍यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

- Advertisement -

नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेता, त्याच्या सुविधांचा विचार करून हद्दीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला होता. शासनाने प्रस्तावाला मान्यता दिली असून येत्या १ जानेवारी २०१९ पासून संबंधित हद्दीतील नागरिकांची तक्रार चेंबूर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात येईल.                                                                                      – शहाजी उमाप, पोलीस उपायुक्त परिमंडळ 6

नागरिकांच्या तक्रारीवरून घेतला निर्णय

सन २०११ मध्ये गोवंडी पोलीस ठाणे झाल्यानंतर चेंबूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुभाष नगर, डायमंड गार्डन, आंबेडकर गार्डन, चेंबूर जिमखाना, के स्टार मॉल तसेच चेंबूर रेल्वे स्थानका बाहेरील परिसर, आचार्य महाविद्यालय हा भाग गोवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्यामुळे येथील नागरिकांची गैरसोय झाली होती. गोवंडी पोलीस ठाण्यात जाण्यासाठी वाहतूक सुविधा नसल्याकारणाने नागरिकांना रात्रीबेरात्री पायपीट करावी लागत होती. पोलीस ठाण्याची इमारत आडवाटेला असल्यामुळे रिक्षा, टॅक्सी चालक येण्यास तयार नसतात. त्या उलट या परिसरातील नागरिकांना चेंबूर पोलीस ठाणे जवळ असून त्या ठिकाणी वाहतुकीच्या अनेक सुविधा उपलब्ध आहेत. वर्दळीचा भाग असल्यामुळे रात्रीबेरात्रीसुद्धा एकट्या दुकट्याला जाण्यास भीती वाटत नाही.

याबाबत पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्तांकडे नागरिकांच्या अनेक तक्रारी दाखल झालेल्या होत्या. नागरिकांच्या अडचणी बघून तसेच त्यांच्या सुविधांचा विचार करून अखेर हा निर्णय घेण्यात आला.नागरिकांची सुविधा बघून चेंबूर पोलीस ठाण्यातून गोवंडी पोलीस ठाण्यात गेलेला हा भाग परत चेंबूर पोलीस ठाण्याकडे आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त कार्यालयाकडून पोलीस आयुक्त कार्यालयाला पत्रव्यवहार करण्यात आला होता. मुंबई पोलीस आयुक्तांकडून गृहविभागाकडे याबाबत शिफारस करण्यात आली होती. या शिफारशीवर गृहविभागाने शिक्कामोर्तब करून ४ डिसेंबर रोजी याबाबतचे परिपत्रक जारी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -