घरमुंबईएमबीएच्या बोगस प्रवेशांची पोलिसांकडून चौकशी

एमबीएच्या बोगस प्रवेशांची पोलिसांकडून चौकशी

Subscribe

2015 पासूनच्या प्रवेशांवर टांगती तलवार

2015-16 शैक्षणिक वर्षापासून अ‍ॅटमा अंतगर्त झालेल्या एमबीए प्रवेश प्रक्रियेची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. एमबीए व एमएमएस अभ्यासक्रमाच्या खासगी प्रवेश परीक्षांची बनावट गुणपत्रके सादर केलेल्या 187 विद्यार्थ्यांवर कारवाई करत 25 विद्यार्थ्यांचे प्रवेश यावर्षी रद्द करण्यात आले. मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे झालेले बोगस प्रवेश लक्षात घेता यामध्ये कोणते रॅकेट आहे का? कॉलेज, संस्था, सरकारी अधिकारी व सायबर तज्ज्ञ यांचा सहभाग आहे का? याची चौकशी आता पोलिसांमार्फत करण्यात येणार आहे.

राज्यातील एमबीए अभ्यासक्रमाचे प्रवेश सीईटी सेलच्या माध्यमातून केले जातात. या अभ्यासक्रमांना प्रवेश देताना अखिल भारतीय कोट्यातील प्रवेशही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांच्या माध्यमातून केले जातात. हे प्रवेश देताना विविध कॅट, सीमॅट आणि अ‍ॅटमा यांसह विविध खाजगी संस्थाच्या माध्यमातून घेतलेल्या परीक्षांच्या आधारे प्रवेश दिले जातात. त्यामुळे राज्यातील नामवंत संस्थांत प्रवेश मिळवण्यासाठी देशभरातील विद्यार्थी प्रवेशासाठी येतात. यंदा जुलै-ऑगस्टमध्ये झालेल्या प्रवेशात अनेक विद्यार्थ्यांना ९९ पर्सेटाईल असलेली खोटी गुणपत्रके सादर करून प्रवेश घेतल्याची तक्रार प्रवेश नियमन प्राधिकरणाकडे विद्यार्थी आणि संस्थांनी केली. त्याची दखल घेत तपासणी केली असता विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी खोटी कागदपत्रे सादर केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर प्राधिकरणाने खासगी संस्थांच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची पडताळणी सुरू केली. यावेळी सीईटी सेलच्या प्रवेश नियंत्रण समितीने एमबीए किंवा एमएमएस प्रवेश घेताना बनावट गुणपत्रक देणार्‍या १८७ विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीतून वगळले तसेच 25 विद्यार्थ्यांचे प्रवेशही रद्द केले.

- Advertisement -

त्याचबरोबरच एफसी केंद्राच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. मात्र विद्यार्थ्यांनी बनावट कागदपत्रे कोठून आणली यामागे कोणते रॅकेट आहे का? याची तपासणी करण्याचा निर्णय सीईटीकडून घेण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांची चौकशी पोलिसांमार्फत करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील कार्यवाही प्रवेश नियंत्रण समितीमार्फत सुरू आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश देणार्‍या एफसी आणि एआरसी सेंटरचीही चौकशी केली जाणार आहे. या विद्यार्थ्यांची कागदपत्रे अपलोड करताना दिरंगाई अणि निष्काळजीपणा केला आहे का हे ही पाहिले जाणार असल्याचे समजते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -