घरमुंबईपोलीस पुत्रांचा प्रताप, तरुणीला नाहक त्रास

पोलीस पुत्रांचा प्रताप, तरुणीला नाहक त्रास

Subscribe

गाडी ओव्हरटेक करण्याच्या वादातून दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी इंटेरिअर डिझायनर असलेल्या तरुणीला अश्लील शिवीगाळ करून तिच्या मोटारीची चावी घेऊन पळ काढला. हा प्रकार दादर येथील मराठे उद्योग भवन परिसरात घडला. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने दादर पोलीस ठाण्यात या विद्यार्थ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. दादर पोलिसांनी दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. या तरुणीला अश्लील शिवीगाळ करणारे दोन्ही विद्यार्थी हे मुंबई पोलीस दलातील कर्मचार्‍यांची मुले असल्याचे समजते.

विनायक होलमुखे (१९), उमेश पाटील (२०) अशी गुन्हा दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. दोघेही वरळी पोलीस वसाहतीत राहतात, अशी माहिती पोलिसांनी दिली. वरळी परिसरात राहणारी इंटेरिअर डिझायनर असलेली तरुणी गेल्या आठवड्यात प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर येथून वीर सावरकर मार्गाने जात होती. त्यावेळी तिच्या मोटारीपुढे दोघे विद्यार्थी एकमेकांशी गप्पा मारत जात होते.

- Advertisement -

या तरुणीने त्यांना बाजूला होण्यासाठी हॉर्न वाजवला, मात्र दोघेही जागा देत नव्हते, तेव्हा या तरुणीने त्यांना ओव्हरटेक केले. त्याचा राग आल्याने या दोघांनी या तरुणीच्या मोटारीचा पाठलाग सुरू केला. आप्पासाहेब मराठे मार्गावरील मराठे उद्योग भवन समोर असलेल्या सिग्नलवर या तरुणीची मोटार थांबली असता त्या दोघांनी तिच्या मोटारीच्या काचेवर थाप मारुन तिला अश्लील भाषेत शिवीगाळ सुरु केली. या दोघांसोबत असलेल्या विद्यार्थिनीने देखील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, मोटारसायकल वरून उतरलेल्या एकाने तिचा मोटारीची चावी काढून घेतली. या प्रकारामुळे घाबरलेल्या या तरुणीने दादर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. दादर पोलीस गुन्हा दाखल करत असताना दोघे विद्यार्थी पोलीस ठाण्यात आले. त्यांनी या तरुणीला मोटारीची चावी परत देऊन माफी मागितली. मात्र झालेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने तक्रार मागे घेण्यास नकार दिला. दादर पोलिसांनी या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या मीहितीनुसार दोघे तरुण विद्यार्थी असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. दोघेही मुंबई पोलीस दलातील कर्मचार्‍यांचे मुले आहेत. या प्रकरणी अद्याप दोघांना अटक करण्यात आलेली नसून तपास सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -