घरमुंबईठाणे पालिकेत राजकीय गौडबंगाल, सत्तेसाठी सेना, भाजप, काँग्रेस एकत्र

ठाणे पालिकेत राजकीय गौडबंगाल, सत्तेसाठी सेना, भाजप, काँग्रेस एकत्र

Subscribe

काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मनोज शिंदे यांच्यासाठी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनोहर साळवी यांच्यासाठी जोरदार लॉबिंग केल्याचीही चर्चा पालिका वर्तुळात रंगली हेाती.

गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवड प्रक्रियेवरून पुन्हा एकदा वादंग निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यात असलेली जागा काँग्रेसने पटकावली आहे. काँग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांच्या गळ्यात स्वीकृत नगरसेवक पदाची माळ पडली असून महापौरांनीच त्यांच्या नावाची घोषणा केली. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसचा गेम करीत शिवसेना- काँग्रेस अशा अभ्रद युतीचे दर्शन घडवले. मात्र अवघे तीन नगरसेवक असतानाही मनोज शिंदे यांची वर्णी लावून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारकिचा बालेकिल्ला आणखीनच मजबूत करण्याची खेळी खेळली आहे.

अनेक दिवसांपासून स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून लॉबिंग सुरू होती. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मनोज शिंदे यांच्यासाठी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनोहर साळवी यांच्यासाठी जोरदार लॉबिंग केल्याचीही चर्चा पालिका वर्तुळात रंगली हेाती.

- Advertisement -

शुक्रवारच्या महासभेत आयुक्तांकडून आलेला पाच स्वीकृत नगरसेवकांच्या नावाचा बंद लिफाफा महापौरांनी उघडला. पालिकेचे सचिव अशोक बुरपुल्ले यांनी सदस्यांच्या नावांचे वाचन केले. मात्र मनोहर साळवी यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यांच्या नावाबाबत राज्य शासनाच्या विधी विभागाकडे अभिप्राय घेण्यात येईल. त्यामुळे साळवी यांचे नाव घोषित करण्यात आले नाही. तोपर्यंत पाचवे नाव स्थगित ठेवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. याचवेळी सभागृहनेते नरेश म्हस्के यांनी अन्य दोन नावे कोणाची होती,असा सवाल उपस्थित केला. त्यावेळी सचिवांनी मिलींद साळवी आणि मनोज शिंदे यांची नावे जाहीर केली. त्यानंतर महाराष्ट्र अधिनियमाचा आधार घेत महापौर तथा पीठासीन अधिकारी मीनाक्षी शिंदे यांनी मनोज शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. या घेाषणेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी आक्षेप घेत गोंधळ घातला.अखेर महापौरांनी जेवणाची सुट्टी जाहीर केल्याने यावर पडदा पडला. दीड वर्षापूर्वी महापौरांनी पाच स्वीकृत सदस्यांची नावे जाहीर केली होती. त्यावेळी प्रशासनाने हा आमचा अधिकार असल्याचा आक्षेप घेतला होता. मात्र शुक्रवारच्या सभेत हीच नावे वाचण्यात आली. मात्र मनोहर साळवींऐवजी मनोज शिंदे यांचे नाव जाहीर करण्यात आले.

हे आहेत स्वीकृत नगरसेवक

  • राजेंद्र साप्ते (शिवसेना)
  • दशरथ पालांडे (शिवसेना)
  • जयेश वैती (शिवसेना)
  • संदीप लेले (भाजप )
  • मनोज शिंदे (काँग्रेस )

पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अपक्षांसह ३८ नगरसेवक आहेत. तर काँग्रेसचे ३ नगरसेवक आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा एक स्वीकृत नगरसेवकाचा कोटा होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच स्वीकृत नगरसेवक निवडणे अपेक्षित होते. तसेच स्वीकृत सदस्य निवडीचा अधिकार हा आयुक्तांचा आहे. मात्र सत्ताधार्‍यांनी प्रथा, परंपरा, कायदे सगळेच पायदळी तुडवले आहेत. या विरोधात न्यायालयात दाद मागू. ही काँग्रेसची शिवसेना भाजपशी अभद्रच युती म्हणावी लागेल.
-मिलींद पाटील, विरोधी पक्षनेता ठामपा

- Advertisement -

 

स्वीकृत सदस्यांची चार नावे जाहीर करण्यात आली होती. राष्ट्रवादीचा पाचवा करता येणार नाही. असे सांगितले गेले. मनोज शिंदे यांनी फॉर्म भरला होता. त्यानुसार त्यांची निवड झाली. कोपरी पाचपाखाडी सेनेचा बालेकिल्ला मजबूतच आहे. आम्ही इतके लेचेपेचे नाहोत. मागील वेळेस मनोज शिंदे कुठे उभे राहिले होते. त्यामुळे यामागे काहीच गौडबंगाल नाही.
-नरेश म्हस्के, सभागृह नेता ठामपा

हे आहे गौडबंगाल

कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी ३३ हजारांच मताधिक्य घेऊन विजय मिळवला होता. एकनाथ शिंदे यांना ७३ हजार ५०२ मतं मिळाली होती. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या मनोज शिंदे यांना ४० हजार ७२६ मिळाली होती. २०१४ च्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना १ लाख ३१६ मते मिळाली हेाती. सुमारे ५१ हजार ८६९ च्या मताधिक्यांनी ते निवडून आले होते.त्यावेळी काँग्रेसचे मोहन गोस्वामी १७ हजार ८७३ तर भाजपच्या संदीप लेले यांना ४८ हजार ४४७ मते मिळाली होती. २०१९ च्या निवडणुकीत मनोज शिंदे हे काँग्रेसचे उमेदवार असू शकतात. ही सगळी गणित लक्षात घेऊनच एकनाथ शिंदे यांनी ही खेळी खेळल्याचे बोललं जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -