घरमुंबईखड्ड्यांमुळे रिक्षा चालकांना आर्थिक भुर्दंड; मानेला आणि पाठीचा त्रास

खड्ड्यांमुळे रिक्षा चालकांना आर्थिक भुर्दंड; मानेला आणि पाठीचा त्रास

Subscribe

बाप्पाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपल्याने विघ्नहर्त्याला खड्ड्यांचे विघ्न सहन करावे लागणार आहे. त्यामुळे भक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

कल्याण डोंबिवलीमध्ये शहरातील रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. पालिका क्षेत्रातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे बुजवून रस्ते सुस्थितीत करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. बाप्पाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपल्याने विघ्नहर्त्याला खड्ड्यांचे विघ्न सहन करावे लागणार आहे. त्यामुळे भक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच वारंवार रिक्षा खड्डयातून जात असल्याने रिक्षा नादुरूस्त होण्याचे प्रमाण वाढले असून त्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचेही रिक्षा चालकांकडून सांगितले जाते. खड्ड्यांमुळे पाठीचा आणि मानेच्या आजाराचाही त्रास सहन करावा लागत असल्याचे रिक्षा चालकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा – ‘कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडीला सत्ताधारीच जबाबदार’

- Advertisement -

कल्याणकर खड्ड्यांमुळे त्रस्त

कल्याण डोंबिवलीचे मुख्य रस्ते काँक्रीटचे असले तरी अंतर्गत रस्त्याची तर अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यांवर गाडी चालवणं तर दूरच साधं पायी चालताही येत नाही अशी अवस्था आहे. रस्त्यावरील खड्डयात पावसाचे पाणी साचल्याने खड्डयाचा अंदाज येत नसल्याने मोटारसायकल खड्डयात आदळून अपघात होत असल्याचेही प्रकार घडत आहेत. रस्त्यावरील खड्डयांना रिक्षा चालक त्रस्त झाले असून त्यामुळे रिक्षा आदळत असल्याने नादुरूस्त होण्याचे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे दिवसभराच्या कमाईतून आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे एका रिक्षा चालकाने सांगितले. दुर्गाडी चौक ते शीळफाटा रस्ता हा एमएसआरडीसीच्या अंतर्गत येतो. मात्र सहाजनंद चौक ते पत्रीपूल हे अंतर पार करण्यासाठी अर्धा अर्धा तास लागत असल्याने प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना आणि वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. हा रस्ता आपल्या अखत्यारीत येत नसल्याचे सांगत केडीएमसी आपले हात झटकून टाकत आहे. त्याचा फटका कल्याणकरांना सहन करावा लागतो. गेल्या काही दिवसांत पावसाने उघडीप घेतली आहे. त्या दरम्यान रस्त्यातील खड्ड्यात केवळ खडी टाकून खड्डे भरण्यात आले. मात्र ही खडी केव्हाच उडून गेली असून पुन्हा खड्डे पडल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे एकंदर परिस्थिती पाहता गणपती बाप्पांचे आगमन कल्याणकरांना खड्ड्यांच्या स्वागतात करावे लागेल असे दिसत आहे. पालिका प्रशासनाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचा दावा करीत आहे.

रस्त्यावरील खड्डयांमुळे रिक्षा नादुरूस्त होण्याचे प्रमाण वाढले आहेच, परंतु सातत्याने रिक्षा खड्डयात आदळत असल्याने मानेला आणि पाठीच्या मणक्याला हादरे बसतात. त्यामुळे तो ही त्रास सहन करावा लागतो. कुटूंबाची जबाबदारी असल्याने त्रास होत असतानाही पट्टा लावून रिक्षा चालवावी लागत आहे, पालिका अथवा लोकप्रतिनिधीन रस्त्यावरील खड्डे त्वरीत बुजवावेत.
– लक्ष्मण गोळे, रिक्षाचालक
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -