घरताज्या घडामोडीइतिहासात पहिल्यांदाच कोरोनामुळे 'प्रभादेवीची जत्रा' रद्द

इतिहासात पहिल्यांदाच कोरोनामुळे ‘प्रभादेवीची जत्रा’ रद्द

Subscribe

३०६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा कोरोनामुळे खंडित

पिपाण्यांचा कर्कश आवाज…उंचीवरुन खाली येताना पोटात गोळा आणणाऱ्या आकाश पाळण्याचा थरार…भल्ली मोठी बंदूक खांद्यावर ठेऊन फुगे फोडण्याचा आनंद…तिखट आंबट अशी चटकदार १२ मसाल्याची चिंच आणि मालवणी खाजा…ही सर्व मज्जा अनुभवली जाते ती जुन्या मुंबईची परंपरा जपणाऱ्या ‘प्रभादेवीच्या जत्रेत’. मात्र, यंदा ही मज्जा काही अनुभवता येणार नाही. इतिहासात पहिल्यांदाच कोरोनामुळे प्रभादेवीची जत्रा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे ३०६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा कोरोनामुळे खंडित झाली आहे.

मुंबईची जीवनशैली बदलली असली तरी देखील या आधुनिक काळात अजूनही काही परंपरा टिकून आहेत. त्यातील एक म्हणजे प्रभादेवीची जत्रा. ३०६ वर्षांचा इतिहास असलेल्या या प्रभादेवीच्या मंदिरातील जत्रा म्हणजे एक पर्वणी असते. दरवर्षी पौष महिन्यात वार्षिक जत्रा उत्सव आयोजित केला जातो. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रभादेवीच्या मातेचा जत्रोत्सव रद्द करण्यात आला आहे. यापूर्वी अशी कोणतीही आपत्ती आली नव्हती. ज्यामुळे जत्राउत्सव खंडित करावा लागला आहे. मात्र, यंदा कोरोनाच्या महामारीमुळे यंदाचा जत्रोत्सव खंडित होणार आहे. त्यामुळे यंदा पाळण्यात बसण्याचा आनंद आणि पिपाण्याचा आवाज काही अनुभवता येणार नाही.

- Advertisement -

वार्षिक उत्सवानिमित्त सूचना

प्रभादेवीचा जत्राउत्सव येत्या पौष पौर्णिमेला गुरुवारी, २८ जानेवारी ते ०६ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. या उत्सवाच्या दिवसांतसुद्धा मंदिर फक्त दर्शनासाठी उघडे राहणार आहे. तसेच दर्शनाची वेळ सकाळी ६ ते रात्री ८.३० पर्यंत राहील. त्याचप्रमाणे मास्क लावल्याशिवाय मंदिराच्या आवारात प्रवेश करु नये. त्याचप्रमाणे दर्शन घेताना योग्य तेवढे अंतर राखावे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी साडी, ओटी, हार, फुले, वेणी, नारळ, फळे आणि मिठाई इत्यादी कोणतीही वस्तू अर्पण करण्यासाठी आणू नये. त्याचप्रमाणे लहान मुलांना मंदिरात आणण्यास बंदी असून कोणालाही गाभाऱ्यात प्रवेश दिला जाणार नाही.

अनेकांना जत्रेचे आकर्षण असते. त्यामुळे तरुणपिढी मोठ्या संख्येने मौजमज्जा करण्यासाठी जत्रेला गर्दी करतात. मात्र, यंदा जत्रा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे तरुण पिढीचा देवळात येण्याचा कल देखील कमी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भाविकांनो गर्दी करु नका आणि नियमांचे पालन करा, असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

- Advertisement -

धार्मिकस्थळे खुली केली असली तरी कोणताही धार्मिक कार्यक्रम घेण्यास सरकारने अद्याप मान्यता दिलेली नाही. त्यामुळे प्रभादेवीची जत्रा होणार नाही. तसेच अगदी साधेपणाने हा उत्सव पार पडणार असून भाविकांनी देखील कमीत कमी संख्येने मातेच्या दर्शनास यावे. त्याचप्रमाणे अधिक प्रमाणात गर्दी करु नये. – धनंजय खाटके; प्रभादेवी जनसेवा समिती, अध्यक्ष


हेही वाचा – शिवेंद्रराजे भोसले यांची लवकरच घरवापसी?


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -