घरमुंबईईव्हीएमविरोधात २१ ऑगस्टला मुंबईत विरोधकांचा मोर्चा

ईव्हीएमविरोधात २१ ऑगस्टला मुंबईत विरोधकांचा मोर्चा

Subscribe

नेतृत्त्वाची धुरा राज ठाकरेंच्या खांद्यावर

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील विरोधकांनी एकत्र येत ईव्हीएम विरोधी हाक दिली आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत:च्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा घेत विरोधकांना एकत्र आणले आहे. शुक्रवारी मुंबईत आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी येत्या २१ ऑगस्ट रोजी मुंबईत ईव्हीएमविरोधात विरोधी पक्षांच्या मोर्चाची घोषणा केली. तसेच येत्या २१ ऑगस्टपर्यंत राज्यभरातील घराघरात फार्म देऊन निवडणुका मतपत्रिकेवर हव्यात की नकोत, याबद्दल आम्ही मत जाणून घेणार असून ती माहिती आम्ही निवडणूक आयोगाकडे सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी ठाकरी भाषेत टिकास्त्रही सोडले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईव्हीएम विरोधात हाक दिली आहे. त्यासाठी त्यांनी शरद पवारांपासून ते ममता बॅनर्जींपर्यंत अनेकांची साथ मागितली. सर्व विरोधकांना एकत्र आणत ईव्हीएम विरोधात वज्रमूठ एकवठली. पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, छगन भुजबळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, शेतकरी स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी, शेकापचे जयंत पाटील, न्या. बी.जी.कोळसे पाटील, लोकभारतीचे कपिल पाटील, आपचे मुंबई अध्यक्ष ब्रिगेडर सुधीर सावंत, कॅम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश रेड्डी आदी उपस्थित होते. हा कोणत्याही राजकीय पक्षांचा मोर्चा नसून यात कोणत्याही पक्षाचा राजकीय झेंडा देखील वापरण्यात येणार नसल्याचे राज ठाकरे यांनी यावेळी जाहीर केले.

- Advertisement -

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले. जर मुख्यमंत्र्यांना आणि सत्ताधार्‍यांना २२० किंवा २५० जागा निवडून येतील असा विश्वास असेल, तर ईव्हीएमला ते का कवटाळून बसले आहेत? बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला त्यांचा अजूनही आक्षेप का आहे?’ असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी विचारला. बसविलेल्यांनी आम्हांला शिकवू नये, असा टोला राज ठाकरे यांनी यावेळी लगाविला. ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा या आंदोलनादरम्यान महाराष्ट्रातल्या घराघरांत फॉर्म पाठवून जनतेचे मत जाणून घेणार आहे. बॅलेट पेपरवर मतदान घेतले जावे, या मागणीसाठी हे फॉर्म वाटले जाणार आहेत. असे त्यांनी नमूद केले.

अमेरिकेतली चिप आपण का वापरावी?
‘ईव्हीएममध्ये गोंधळ असल्याचे सहज दिसून येत आहे. ज्या ठिकाणी लोकांनीच राजू शेट्टींना निवडणुकांसाठी पैसे दिले, तिथल्या ४ ते ५ बुथवर राजू शेट्टींना शून्य मते आहेत. जे पैसे देतील, ते मत देणार नाहीत का?’ असा सवाल यावेळी राज ठाकरेंनी विचारला. ‘मी निवडणूक आयुक्तांना भेटलो, तेव्हा निवडणूक आयुक्तांनी सांगितलं की या मशीनचा प्राण असलेली चिप अमेरिकेकडून बनून येते. जिथे ट्रम्प यांच्या निवडणुकीत रशियाचा हात होता असा आक्षेप अजून घेतला जातो, त्या अमेरिकेत बनून येणार्‍या चिपवर आपण विश्वास कसा ठेवावा? लोकसभा निवडणुकांमध्ये ५५ लाख मतांचा भारतात गोंधळ झाला आहे. ती मते वाढीव आहेत. जगातल्या सगळ्या पुढारलेल्या देशांमध्ये मतपत्रिकेवर मतदान होते. मग हे मशीन फक्त आपल्याकडेच का आहे,’ असाही प्रश्न त्यांनी विचारला.

- Advertisement -

मतदारांमध्ये शंका असता कामा नये – अजित पवार
‘जगातले काही देश सोडले, तर कुठेही ईव्हीएमचा वापर केला जात नाही. राज ठाकरेंनी मध्यंतरी विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटी घेऊन याविषयी एक व्यापक आंदोलन सुरू करण्याची भूमिका मांडली. आपण केलेेले मतदान आपल्याला हव्या त्याच उमेदवाराला आणि पक्षाला गेले आहे हे मतदाराला समजेल अशा पारदर्शकपणे मतदान व्हायला हवे. मात्र, ईव्हीएमवर शंका घ्यायला नक्कीच वाव आहे. लोकशाहीमध्ये असे घडायला नको. त्यासाठीच आमची मागणी आहे की निवडणुका बॅलेट पेपरद्वारे व्हायला हव्यात. आम्ही जनतेला आवाहन करू इच्छितो की निवडणुका बॅलेट पेपरद्वारे व्हायला हव्यात अशा मागणीला प्रतिसाद द्यावा, असे यावेळी अजित पवार म्हणाले.

ईडीचा फरक आपल्याला पडत नाही
राज ठाकरे यांच्या मागेही आता ईडीची चौकशी लावणार असल्याचे वृत्त गुरुवारी वार्‍यासारखे पसरले. या वृत्ताबाबत आज राज ठाकरे यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, ईडीची आपल्याला फरक पडत नाही. जे काही आहे, ते मी आतापर्यंत बातम्यांत वाचले आहे. आज वर्तमान पत्रांच्या मालकांना अशाच धमक्या मिळाल्याने वर्तमान पत्रांची कार्यालये, चॅनल्स बंद पडली आहेत. तुम्हांला तुमची भूमिका मांडता येत नाहीत. तुम्हांला लिहता येत नाही, हे आजपर्यंत वारंवार समोर आले असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -