घरमुंबईगैरप्रकार करणार्‍या रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई; पाच पट दंड वसूल करणार

गैरप्रकार करणार्‍या रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई; पाच पट दंड वसूल करणार

Subscribe

राज्यात गैरप्रकार करणार्‍या रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. नेमून दिलेल्या प्रक्रिया शुल्कापेक्षा जास्त प्रक्रिया शुल्क आकारल्यास त्याच्या पाच पट दंड आकारला जाईल.

राज्यात गैरप्रकार करणार्‍या रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. नेमून दिलेल्या प्रक्रिया शुल्कापेक्षा जास्त प्रक्रिया शुल्क आकारल्यास त्याच्या पाच पट दंड आकारला जाईल. जादा आकारलेले शुल्क रुग्णास परत करण्यात येईल. या कारवाईसाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संचालकांना सक्षम अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे, अशी माहिती विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी दिली.

राज्यामध्ये रक्तपेढ्यांकडून वेगवेगळ्या प्रकारचे गैरप्रकार वारंवार होत असल्याच्या तक्रारी विविध निवेदनाद्वारे प्राप्त होत आहेत. यामध्ये थॅलेसिमया रुग्णांना रक्त न देणे, त्यांचेकडून प्रक्रिया शुल्क घेणे, संकेतस्थळावर दररोजचा साठा न दर्शविणे, तसेच प्लाझ्मा रक्त पिशवीसाठी विहित रकमेपेक्षा अवाजवी रक्कम आकारणे अशा तक्रारी व निवेदने प्राप्त होत आहेत. त्यामुळे राज्यात अशाप्रकारे गैरप्रकार करणार्‍या रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कारवाईसाठी राज्य रक्त संक्रमण संचालक यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. प्रक्रिया शुल्कापेक्षा जादा प्रक्रिया शुल्क आकारल्यास प्रक्रिया शुल्काच्या पाच पट दंड केला जाईल. यापैकी जादा आकरलेले शुल्क रुग्णास परत करण्यात येणार असून उर्वरीत रक्कम राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

- Advertisement -

थॅलेसिमया, हिमोफिलिया, सिकलसेल व रक्ताशी निगडीत इतर आजारी रुग्णांकडे मोफत रक्त मिळण्याविषयी राज्य रक्त संक्रमण परिषदेने जारी केलेले ओळखपत्र असतानाही रुग्णांना प्रक्रिया शुल्क आकारल्यास प्रक्रिया शुल्काच्या तीन पट दंड केला जाईल. सूचना फलकावर, संकेतस्थळावर दिलेल्या माहितीप्रमाणे रक्त उपलब्ध असतानाही थॅलेसिमया, हिमोफिलिया, सिकलसेल व रक्ताशी निगडीत इतर आजारी रुग्णांना सबळ कारण न देता रक्त देण्यास नकार दिल्यास प्रक्रिया शुल्क अधिक १००० रुपये दंड आकारला जाईल. दंडात्मक कारवाईपूर्वी संबंधित रक्तपेढीला नोटीस देऊन त्यांचे म्हणणे मांडण्याची एक संधी देण्यात येईल. रक्तपेढीकडून वारंवार मार्गदर्शक तत्वे, सूचनांचे उल्लंघन केल्यास अशा रक्तपेढ्यांचे परवाने रद्द करण्याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाला कळविण्यात येईल व अशा रक्त पेढ्यांचा परवाना अन्न व औषध प्रशासनाकडून रद्द करण्यात येईल.

रक्तसाठ्याची माहिती संकेतस्थळावर न दिल्यास दंड

ई रक्तकोष व राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संकेतस्थळावर रक्तसाठा व अनुषंगिक माहिती न भरल्यास प्रती दिन १००० रुपये याप्रमाणे दंड आकारला जाईल. राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संकेतस्थळावर रक्तपेढीकडून जी माहिती भरणे अनिवार्य आहे. अशी माहिती न भरल्यास अथवा भरलेली माहिती अद्ययावत नसल्यास त्यासाठी विहित कालावधी संपल्यानंतरच्या कालावधीसाठी ५०० रुपये प्रती दिन दंड आकारला जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -