घरमुंबईबंधार्‍याच्या पाण्यावर रब्बी हंगामातील पीक लागवड

बंधार्‍याच्या पाण्यावर रब्बी हंगामातील पीक लागवड

Subscribe

ओल्या दुष्काळामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, रब्बी हंगामातील पीक शेतकर्‍यांसाठी आधार ठरावे या हेतूने जिल्हा परिषदेने बंधारे मोहीम सुरू केली आहे. गावात प्रत्यक्ष जाऊन गावकर्‍यांसोबत लोकप्रतिनिधी आणि अधिकारी बंधार्‍यासाठी श्रमदान करत आहेत. शेतकर्‍यांनी बंधार्‍याच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामातील पीक घ्यायला सुरुवात केली आहे. शहापूरच्या अनेक शेतकर्‍यांनी बंधार्‍याच्या पाण्यावर हरभरा, मूग, वाल, उडीद, तसेच भाजीपाल्या मध्ये भेंडी, मिरची, आदी पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. त्यामुळे वनराई बंधारा अनेक शेतकर्‍यांसाठी वरदान ठरला आहे.

मुरबाड तालुक्यानंतर लगेचच जिल्हा परिषद लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी गुरुवारी शहापूर तालुक्याचा दौरा करत स्वतः श्रमदान करून तब्बल 51 वनराई बंधारे बांधले. गेली एक ते दीड महिना जिल्ह्याच्या पाचही तालुक्यांमध्ये वनराई बंधारे मोहीम सुरू असून शेतकर्‍यांनी बंधार्‍याच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामातील पीक घ्यायला सुरुवात केली आहेत.

- Advertisement -

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या संकल्पनेतून मिशन वनराई बंधारा ही मोहीम 2 ऑक्टोबर 2019 पासून जिल्ह्यात सुरू करण्यात आली. केवळ लोकसहभागातून साडेचार हजार वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने केला. शहापूर हा ग्रामीण आदिवासी तालुका आहे. या तालुक्यात भातशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, यंदाच्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात येथील शेताचे नुकसान झाले आहे. येथील अनेकांची उपजीविका शेती असल्याने हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांना वनराई बंधार्‍याच्या मुबलक पाण्यावर भाजीपाला लागवड करणे शक्य झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -