घरगणपती उत्सव बातम्यालालबागच्या राजाचे मुखदर्शन आणि नवसाच्या रांगेत बदल

लालबागच्या राजाचे मुखदर्शन आणि नवसाच्या रांगेत बदल

Subscribe

करी रोड,चिंचपोकळी आणि भायखळा या स्थानकांवरचा गणेशोत्सवादरम्यान होणारा भार कमी करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे.

करी रोड,चिंचपोकळी आणि भायखळा या स्थानकांवरचा गणेशोत्सवादरम्यान होणारा भार कमी करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. यंदा करी रोड आणि चिंचपोकळी स्थानकांवर पर्यायी पूलसुद्धा उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या बंदोबस्ताबरोबरच रेल्वे पोलिसांची टीमही १० दिवस या ठिकाणी तैनात असणार आहे. नवसाच्या दर्शनासाठी करी रोड स्थानक आणि मुखदर्शनासाठी भायखळा स्थानकावर प्रवाशांनी उतरावे, असे आवाहन आम्ही केलेले आहे. मध्य रेल्वेकडूनही याविषयीच्या सूचना वारंवार देण्यात येतील. त्यामुळे गर्दीचे व्यवस्थापन करणे सोपे होणार आहे.

दरवर्षी गणपती उत्सवात लालबागच्या राजाचा उत्साह औरच असतो. राजाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी होते. कधी नव्हे त्या रेल्वे पोलिसांनी या गर्दीच्या व्यवस्थापनात मदतीचा हात देण्याचे आता ठरवले आहे. राजाच्या दर्शनासाठी येणारे भाविक आजवर मध्य रेल्वेच्या करी रोड आणि चिंचपोकळी स्थानकावर उतरत. आता व्यवस्थापनाच्या दृष्टीने भाविकांसाठी करीरोड आणि भायखळा ही दोन स्थानके निश्चित करण्यात आली आहेत. यावेळी प्रथमच याचे नियंत्रण रेल्वे पोलीस करणार आहेत.  यासंदर्भात रेल्वे पोलिसांनी स्वत:च तसा प्रस्ताव मध्य रेल्वेकडे दिला असून, रेल्वेनेही त्याला संमती दिली आहे. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत ही सेवा रेल्वे पोलीस अविरत राजाला वाहणार आहेत. गणपतीचे दहा दिवस रेल्वे पोलीस बंदोबस्त ठेवून राजाच्या भाविकांची काळजी घेतील. गर्दीच्या व्यवस्थापनाचा भाग म्हणून जीआरपी पोलीस येत्या दोन दिवसात रेल्वेतून येणार्‍या भाविकांना संदेश देणारे फलक दर्शन मार्गिकेपर्यंत पोहोचण्यासाठी लावणार आहेत.

- Advertisement -

व्यवस्थेची विशेष काळजी म्हणून राजाच्या नवसाचे दर्शन घेणार्‍यांसाठी करीरोड स्थानक निश्चित करण्यात आले असून, मुखदर्शनासाठी भायखळा स्थानक निवडण्यात आले आहे. राजाच्या दर्शनासाठी येणारे भाविक दरवर्षी करीरोड, चिंचपोकळी आणि भायखळा या स्थानकांवर मोठ्या संख्येने गर्दी करतात. वाढत्या गर्दीमुळे पोलिसांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. गर्दीला आवर घालता घालता पोलिसांना नाकीनऊ यायचे. ही अडचण नव्या गर्दी व्यवस्थापनातून दूर होईल, असा विश्वास जीआरपीचे उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना व्यक्त केला. रेल्वे पोलिसांच्या या व्यवस्थापनामुळे मुंबई पोलिसांवरचे मोठे ओझे कमी होईल, असे ते म्हणाले. ही व्यवस्था हाताळण्यासाठी रेल्वेचा मोठा फौजफाटा वापरात आणला जाणार आहे.

असे असेल रेल्वे पोलिसांचे व्यवस्थापन 

करी रोड, चिंचपोकळी आणि भायखळा स्थानकाच्या दरम्यान मध्य रेल्वेचे जीआरपी पोलीस या तिन्ही स्थानकांवर बंदोबस्ताला असणार आहे. चिंचपोकळी ते सायन यादरम्यानची सर्व स्थानके दादर जीआरपी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतात. या व्यवस्थापनात दादरचे पोलीस अधिक जबाबदारी उचलतील, असे दादर जीआरपी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी सांगितले. जी स्थानके मुख आणि नवस दर्शनासाठी निश्चित करण्यात आली आहेत. तिथून जाणार्‍या भाविकांना राजास्थळी पोहोचण्याकामी जीआरपी पोलीस मदत करतीलच, शिवाय रात्रभर गस्तही घालतील, असे पांढरे म्हणाले. मध्य रेल्वेच्या सीएसटी मुख्यालयात जीआरपी अधिकार्‍यांनी विशेष बैठक घेऊन स्थानकांवरील व्यवस्थेची माहिती रेल्वे अधिकार्‍यांना दिली. जीआरपीने हाती घेतलेल्या या मोहिमेला हिरवा कंदील दिलाच शिवाय याला शुभेच्छाही दिल्या. याकामी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा शब्दही दिला. महत्वाचे म्हणजे मध्य रेल्वेच्या संबंधित स्थानकांवरील ध्वनीक्षेपकांवरून राजाकडे जाण्याच्या व्यवस्थेची माहिती दिली जाणार आहे. शिवाय बंबार्डियर गाड्यांमधूनही घोषणा केल्या जातील, असे सांगण्यात आले. कोणत्या दर्शनासाठी कुठे उतरावे, हे आवर्जून जाहीर केले जाईल. करीरोड आणि भायखळा स्थानकांवर यासाठी सहा अधिकारी नेमण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. तर सुरक्षा आणि मार्गीकेदरम्यान १०० जीआरपी पोलीस  २४ तास नेमले जाणार आहेत.

- Advertisement -

सैनिक पुलाचा वापर करणार

करी रोड आणि चिंचपोकळी स्थानकांवर सैन्यदलाने उभारलेल्या पुलाचाही वापर केला जाणार आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाण्यासाठी एकच पूल उपलब्ध होता. मात्र दोन महिन्यात उभारण्यात आलेल्या सैनिक पुलाचा या गणेशोत्सवाला सर्वाधिक फायदा होईल, अशी आशा रेल्वे पोलिसांनी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -