घरमुंबईबाळासाहेबांसाठी राज-उद्धव येणार एकत्र, फडणवीसही व्यासपीठावर

बाळासाहेबांसाठी राज-उद्धव येणार एकत्र, फडणवीसही व्यासपीठावर

Subscribe

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याचे २३ जानेवारीला अनावरण

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक दादर येथे उभारण्याचे काम जरी रखडले असले, तरी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक आकर्षक पूर्णआकृती पुतळा मुंबईत श्यामाप्रसाद मुखर्जी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालया जवळील जागेत बसविण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची २३ जानेवारी रोजी जयंती असून यादिवशी या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.

यावेळी,राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादि काँग्रेसचे नेते शरद पवार, विधान सभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसेचे नेते राज ठाकरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी, आज विधान सभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे नेते राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत निमंत्रण दिले आहे.

- Advertisement -

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक दादर, शिवाजी पार्क येथील जुन्या महापौर निवासस्थानी उभारण्याचे स्वप्न शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आहे. मात्र शिवसेना – भाजप युतीची सत्ता असतानाही ते स्मारक उभारण्याचे काम शिवसेनेला काही अडचणीमुळे शक्य झाले नाही. अर्थात त्यामागे आणखीनही काही कारणे असू शकतील.

मात्र दुसरीकडे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा भव्य पुतळा मुंबईत दर्शनीय ठिकाणी उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला. मात्र त्यासाठी जागेचा शोध घेतल्यानंतर अखेर रिगल सिनेमा समोरील मोकळ्या जागेत बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारण्याचे नक्की झाले. पुन्हा जागेची अडचण आली आणि मग जागा बदलण्यात आली. रिगल सिनेमा समोरीलच श्यामाप्रसाद मुखर्जी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालया जवळील जागेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णआकृती पुतळा बसविण्यावर शिक्कामोर्तब झाले. आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची २३ जानेवारी रोजी जयंती असून यादिवशी या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

२३ जानेवारीला अनावरण

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे १७ नोव्हेंबर २०१२ रोजी निधन झाले. बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष यशोधर फणसे यांनी ऑक्टोबर २०१५ रोजी गटनेत्यांच्या बैठकीत मांडला. त्याला तत्कालीन महापौर स्नेहल आंबेकर यांनी मंजुरी देऊन पालिका आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवला होता. पालिका आयुक्तांच्या अभिप्रायानंतर हा प्रस्ताव महाराष्ट्र पुरातत्व कमिटीकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. पुरातत्व कमिटीने पुतळा उभारण्यास मंजुरी दिली. मात्र मुंबई अर्बन आर्टस् कमिशन यांच्याकडून पुतळा बसवण्यासाठी होकार मिळाला नव्हता. तसेच पुतळा उभारताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याने सदर प्रस्ताव राज्य सरकाराच्या गृह विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. पुतळा उभारण्यासाठी सर्व परवानग्या मिळाल्याने येत्या २३ जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा अनावरण केला जाणार आहे.

कसा असेल पुतळा

बाळासाहेब ठाकरे यांचा ९ फूट उंचीचा पुतळा अधिक २ फूट उंच हिरवळ (लँडस्केप) चबुतरा यांसह ११ फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुखांचा पुर्णाकृती पुतळा बनवण्याचे काम शिल्पकार शशिकांत वडके यांनी जोगेश्वरी येथील मातोश्री क्रिडा संकुलात केले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -