घरमुंबईरमाबाईनगरमधील रहिवाशांचा आंदोलनाचा इशारा

रमाबाईनगरमधील रहिवाशांचा आंदोलनाचा इशारा

Subscribe

घाटकोपर रमाबाईनगरमधील म्हाडाच्या संक्रमण शिबीर धोकादायक असल्याचे कारण देऊन पालिकेकडून चाळी रिकाम्या केल्या जात आहेत. यामुळे येथील रहिवाशांना भरपावसात रस्त्यावर येण्याची भीती वाटते. घरे खाली करण्यासाठी पालिकेने बळजबरी केल्यास त्यास प्राणपणाने विरोध केला जाईल, असा इशारा रमाबाई आंबेडकर गृहनिर्माण संस्थेचे सरचिटणीस चंदन निकाळजे यांनी दिला आहे.

आई खाऊ देईना आणि बाप भिक मागू देईना, अशी परिस्थिती घाटकोपर रमाबाईनगरमधील म्हाडाच्या संक्रमणवासियांची झाली आहे. या रहिवाशांना विकासकाने पर्यायी घरे दिलेली नाहीत. त्यातच धोकादायक असल्याचे कारण देऊन पालिकेकडून चाळी रिकाम्या केल्या जात आहेत. यामुळे येथील रहिवाशांना भरपावसात रस्त्यावर येण्याची भीती वाटते. घरे खाली करण्यासाठी पालिकेने बळजबरी केल्यास त्यास प्राणपणाने विरोध केला जाईल, असा इशारा रमाबाई आंबेडकर गृहनिर्माण संस्थेचे सरचिटणीस चंदन निकाळजे यांनी दिला आहे.

घाटकोपर रमाबाईनगर येथे म्हाडाच्या सिटीएस क्रमांक १९४ वरील १३.५ हेक्टर या भूखंडावर १८ वर्षांपूर्वी पोलीस कर्मचार्‍यांसाठी शांती सागर पोलीस वसाहत उभारण्यात आली आहे. वसाहत उभारताना म्हाडाच्या चाळी आणि झोपडीधारकांना या प्रकल्पात सामावून घेऊन पर्यायी घरे देण्याच्या अटीवर या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. वसाहत उभारताना पोलिसांसाठी ९९५ तर झोपडीधारक व संक्रमण शिबिरात राहणार्‍यांसाठी ७९७ अशी एकूण १७७२ घरे बांधायची होती. पोलिसांसाठी बांधायच्या ९९५ घरांपैकी फक्त ५४० घरे बांधण्यात आली.

- Advertisement -

इतर भूखंडांवर विकासकाने इमारती उभारल्या नसल्याने झोपडपट्टीधारक व म्हाडा संक्रमण शिबिरातील रहिवाशांना अद्याप घरे देण्यात आलेली नाहीत. गेल्या १८ वर्षात घरे मिळाली नसल्याने आजही झोपडीधारक आणि संक्रमण शिबिरातील नागरिकांना नरक यातना भोगाव्या लागत असल्याचे निकाळजे यांनी सांगितले. शांती सागर पोलीस वसाहतीमध्ये १७ ते १८ इमारती उभारल्या आहेत.

यानंतरही म्हाडाच्या चाळी आणि झोपडीधारकांना पर्यायी घरे देण्यात आलेली नाहीत, यामुळे रहिवाशांना मोडकळीस आलेल्या चाळींमध्ये रहावे लागत आहे. पोलीस वसाहत उभारताना म्हाडाच्या एक मजली असलेल्या तीस चाळी पाडण्यात आल्या. उरलेल्या ८४ ते ९३ अशा १० चाळी पालिकेने धोकादायक ठरवल्या आहेत. या चाळी खाली कराव्या म्हणून पालिकेने ३५४ ची नोटीस बजावून तगादा लावला आहे. दरम्यान याबाबत पालिकेच्या एन विभागाच्या सहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.

- Advertisement -

विकासकाच्या हितासाठी
येथील एका चाळीत १४ घरे या प्रमाणे १० चाळीत १४० घरे आहेत. या सर्व चाळी पालिकेने धोकादायक ठरवल्या आहेत. या चाळी रिकामी केल्यास पर्यायी घरांची व्यवस्था नसल्याने १४० घरांमधील कुटुंबाना रस्त्यावर यावे लागणार आहे. विकासकाच्या हितासाठी या इमारती रिकाम्या केल्या जात आहेत. यातून मलिदा लाटण्याचा प्रयत्न आहे. पर्याय दिल्याशिवाय घरे खाली करणार नाही. न्यायासाठी प्राणपणाने लढू.
-चंदन निकाळजे, सरचिटणीस, रमाबाई गृहनिर्माण संस्था

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -